सॉरी मोबाईल कट्टा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019   
Total Views |




आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही ऑक्सिजनइतकीच अपरिहार्य बाब. मात्र, मोबाईल हाती असल्याने प्रत्यक्ष संवाद खुंटत चालला असल्याचे अनेकदा सांगितले जाते. भाषणे, व्याख्याने, परिसंवाद या माध्यमातून मोबाईल वापराचे फायदे-तोटे जरी सांगितले जात असले तरी, कृती मात्र शून्यच असते. या सर्वांना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव हे अपवाद ठरले आहे. येथील तरुणांनी 'सॉरी मोबाईल कट्टा!' ची निर्मिती केली असून या माध्यमातून मोबाईल शिवाय जीवनातील काही काळ यापुढे व्यतीत करता येणार आहे. येथील युवक महिन्यातून एक दिवस दोन तास मोबाईलपासून स्वतःला यापुढे दूर ठेवणार आहेत. गावाचा विकास, गावातील विविध प्रकरणांची चर्चा, काही नियोजन, धोरण आखणी, विचारविनिमय यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून गावातील पार हा कायमच आपले स्थान टिकून होता. मात्र, हाती मोबाईल आल्याने हा 'पार' नजरेच्या 'पार' गेला आहे. त्यामुळे ग्रामविकासाची दिशाच हरवली असल्याचेदेखील बोलले जाते. हे सर्व विपरीत परिणाम लक्षात घेत, जायगावचे तरुण आता सरसावले आहेत. यावेळी या कट्ट्याच्या माध्यमातून हे तरुण एकमेकांच्या आयुष्यातील सुखदुःखाच्या बाबींवर चर्चा करणार आहेत. तसेच, गावात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचादेखील मागोवा घेणार आहेत. मोबाईलच्या अतिरेकाने गावोगावचे मुके झालेले पार म्हणजेच कट्टे पुन्हा बोलके करण्याचा या तरुणांचा हा उपक्रम आहे. यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी स्थानिक तरुणांना सोबतीला घेऊन 'सॉरी मोबाईल कट्टा' ही संकल्पना वास्तवात आणली आहे. या उपक्रमामुळे गावातील शेतीविषयक प्रश्न आपापसातील चर्चेच्या माध्यमातून तडीस जाण्याचीदेखील दाट शक्यता आता निर्माण झाली. मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानापेक्षा अनुभवाचे आदानप्रदान झाल्यावर प्राप्त होणारे ज्ञान हे नक्कीच फलदायी असणार आहे. त्यामुळे जायगावचा हा कट्टा राज्यातील शहरे आणि इतर गावे यांनादेखील 'सॉरी, नो मोबाईल प्लीज,' असे म्हणण्यास मार्गदर्शक ठरेल, हीच अपेक्षा.

 

अविश्वास की अगतिकता?

 

मागील दोन आठवड्यांत महाराष्ट्रात अनेकविध प्रकारचा राजकीय धुरळा उठल्याचे आपण सर्वांनीच पाहिले. शेवटी त्याची परिणती राज्यात सरकार स्थापनेच्या माध्यमातून झाली. सरकार स्थापनेसाठी जरी विविध प्रकारचे हातखंडे वापरले गेले, तरी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वापरण्यात आलेला हातखंडा हा त्यांच्या आमदारांप्रती अविश्वास आहे की, अगतिकता याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निश्चितच आहे. नाशिक जिल्ह्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक यश मिळाले. त्यातच कधी नव्हे तो देवळाली मतदार संघात सरोज आहिरे यांच्या रूपाने घोलप घराण्याची सत्ता संपुष्टात आली. सरोज आहिरे या उमेदवारीसाठी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा विजय हा 'जायंट किलर' असाच ठरला. आता जेव्हा राज्यात आमदार सुरक्षेचे धडे गिरविले जात होते, तेव्हा याच सरोज आहिरे यांच्या आई व भाऊ यांना नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन भेटले व "सरोज आहिरे या राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही ना, तुम्ही पण तसे त्यांना सांगा," अशा प्रकारची साद सरोज आहिरे यांच्या कुटुंबीयांना घातली. त्यामुळे राजकारण, सत्ता हा सर्वस्वी त्या उमेदवाराचा विषय असताना या सर्वात घरच्यांना मध्ये आणत त्यांना अशी साद घालणे, ही सत्तेची अगतिकता होती. आपल्या पक्षाचे आमदार आपल्याच पक्षात राहावे, अशी मनीषा बाळगणे काही गैर नाही. त्यासाठी प्रयत्न करणेदेखील गैर नाही. पण आपले प्रयत्न हे आमदार या व्यक्तीच्या चौकटीत राहून मर्यादित असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे कुटुंबातील सदस्यांना गळ घालणे, त्यांना देखील या सर्व सत्ताकारणाच्या प्रकरणात खेचणे हे कितपत संयुक्तिक आहे, हाच प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यावर, आमदार निवडून आल्यावर त्याच्यावर किमान विश्वास ठेवावा किंवा तसा दाखवावा, अशी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा केली जाते. मात्र, कार्यकर्त्यांच्या या कृतीने त्यांनी एकप्रकारे सरोज आहिरे यांच्याबाबत अविश्वासच दाखविला आहे काय, अशी शंका निर्माण होते.

@@AUTHORINFO_V1@@