समरसतेचा नंदादीप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019   
Total Views |



साहित्यातले माणूसपण जपत, समाजाच्या समरसतेसाठी अखंड कार्य करणारा, साहित्यिक म्हणून डॉ. ईश्वर नंदापुरे यांची ओळख आहे, त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धांदोळा...


"माणुसकी हाच धर्म आहे. या धर्माचा प्रसार करणे, जागृती करणे, हेच माझे ध्येय आहे." कालच समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. ईश्वर नंदापुरे म्हणाले. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये डॉ. ईश्वर नंदापुरे यांचे योगदान आणि महत्त्व मोठे आहे. त्यांनी ४ मराठी नाटके, ५ मराठी व एक हिंदी काव्यसंग्रह, 'झोत' हा लेखसंग्रह, 'निखारा' हा कथासंग्रह, 'बौद्ध साहित्य तत्त्वज्ञान- शिक्षण' व 'समरसता साहित्य- संकल्पना, प्रेरणा व स्वरूप' यांसह ५ समीक्षा ग्रंथ आणि सामाजिक विषयांवरील इतर अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले. कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण, वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण, समाजसेवा शाखेतील पदव्युत्तर शिक्षण, यासह डॉ. ईश्वर नंदापुरे यांनी 'मराठी दलित नाट्यसृष्टी : एक अभ्यास' या आणि 'गौतम बुद्धांच्या धम्मपदातील शैक्षणिक मूल्यांचा चिकित्सक अभ्यास' या दोन विषयांवर पीएचडी केली. समरस आणि मानवतावादी साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. अनेक साहित्य आणि सामाजिक संस्था, परिषदांमध्ये ते जबाबदारीने कार्यनिर्वहन करीत आहेत. डॉ. ईश्वर नंदापुरे यांना वारसा लाभला आहे, मानवी वेदनेच्या आणि भावनांच्या अनुभूतीचा. मानवी दुःख, वेदना त्यांच्या साहित्याचा गाभा आहे. मात्र, या साहित्यामध्ये कधीही आकस, द्वेष आणि विघातक फुटीरतेचा विद्रोह नाही, तर नंदापुरे यांचे साहित्य म्हणजे माणूसपण शोधणारे आणि जगवणारे साहित्य आहे.

 

भंडारा जिल्ह्यातील आकूट गावचे नंदापुरे हे कुटुंब. तुकाराम नंदापुरे आणि तुळसाबाई नंदापुरेंना सहा अपत्ये. त्यापैकी एक ईश्वर. तुकाराम यांची थोडीफार शेतीभाती. पण, त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा तो परंपरागत नाभिक व्यवसायावरच. त्यांनी घरातच केशकर्तनालय थाटलेले. १९५०चे ते दशक. गावातले सगळेच तुकाराम यांच्या घरी केशकर्तनासाठी यायचे. गावच्या थोरामोठ्यांशी तुकाराम यांचे सख्य. पण, त्यामुळे केशकर्तनाचा दर वाढवून मिळत नसे. घरात खायचे वांधेच. तुळसाबाई घरचे आटपून, रानात जाऊन लाकडं, गवत आणत. ते बाजारात विकत, तिकडून आले की शेतमजुरी करत. ईश्वरही वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी शेतमजुरी करू लागले. खायला दोनवेळचे अन्न मिळवणे म्हणजे जगणे हेच सूत्र. ईश्वरचे मामा-मामी शिक्षक. त्यांचे चांगले जगणे पाहून लहानपणी ईश्वर यांनी ठरवले की, आपणही शिक्षक व्हावे. पण, शिकणेही त्यांच्यासाठी दिव्यच होते. ईश्वर सांगतात,"चौथीमध्ये होतो. शाळेत परेड होती. सगळ्या विद्यार्थ्यांनी शर्ट इन करणे अनिवार्य होते. मीही उभा होतो. शिक्षक छडी घेऊन माझ्याकडे आले. कारण, मी समोरून शर्ट इन केला होता आणि पाठीमागून शर्ट खाली सोडला होता. शिक्षकांनी रागाने विचारले, "हे काय आहे?" ते मारणार, इतक्यात मी म्हणालो, "गुरूजी एकच शर्ट-पँट आहे. पॅँट मागून फाटली आहे म्हणून मी शर्ट इन केला नाही." अर्थात, त्या कोवळ्या वयातले ते अनुभव वेदनादायीच आहेत. त्यातच घरी कौटुंबिक हिंसेचे नित्यनवे प्रयोग होत. तुळसाबाई नावडती आहे, असे म्हणत तुकाराम त्यांना मारहाण करत असत. ईश्वर पाचवीत शिकत असतानाच तुकाराम यांनी दुसरे लग्न केले. घरात चोवीस तास रणकंदन सुरू झाले. त्या छोट्याशा गावात खूप कमी जण दहावी उत्तीर्ण झालेले. त्यात ईश्वरही होते, पण पैशाअभावी ते पुढे शिकू शकले नाहीत. आपण शिकू शकत नाही, या विचाराने त्यांना रडू कोसळले. ते त्यांच्या आजीने बघितले.

 

आजीने तिचे कानातले विकले आणि ईश्वर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी भंडाऱ्याला आले. इथेही ते केशकर्तनालयामध्ये काम करू लागले. काम करताकरता त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळाली नाही म्हणून दोन वर्षे ते घरातील केशकर्तनालयामध्ये काम करू लागले. पुढे ते नोकरीसाठी नागपूरला गेले. त्यांनी आपल्यासोबत आई आणि लहान भावंडांनाही नेले. ते शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. तिथेच त्यांच्याच समाजातल्या रजनीही शिक्षिका होत्या. पुढे रजनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ईश्वर यांनी पुढचे शिक्षण सुरू केले. पीएचडी करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा त्यांना सर्वार्थाने परिचय झाला. त्यातूनच मग शोषित-पीडितांसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. नागपूरमधील एकही समाज आंदोलन असे नाही की, ज्यामध्ये ईश्वर यांनी सक्रिय सहभाग घेतला नसेल. २००२ साली त्यांना समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला. त्यावेळी त्यांच्यासोबत चळवळी आंदोलनामध्ये काम करणाऱ्या, स्वतःला 'पुरोगामी' मानणाऱ्या बहुतेक सगळ्यांनीच त्यांच्यावर बहिष्कार टाकला. "तू जायचे नाहीस. गेलास तर संमेलन उधळून लावू," अशा धमक्याही दिल्या. आज आपण पाहतो की, स्वार्थासाठी लोक आपले विचार, भूमिका सातत्याने बदलतात. मात्र, ज्यावेळी 'समरसता' शब्द उच्चारणे म्हणजे बहिष्कृत होणे असा होता, त्या काळात ईश्वर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. साहित्याला झापडबंदतेची चौकट नसावी. जे सरस, सरल, सकस आहे ते स्वीकारावे, समाजाला समरसतेची गरज आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. आजही त्यांची ही भूमिका कायम आहे. आजही त्यांची समरसतेची तळमळ, कार्य अखंड सुरू आहे. डॉ. ईश्वर नंदापुरे म्हणजे समरसतेचा अखंड नंदादीपच होय.

@@AUTHORINFO_V1@@