अजित पवारांवरील कोणताही खटला मागे घेतलेला नाही : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : "अजित पवार यांच्यावरील कोणतेही खटले मागे घेतलेले नाहीत," अशा शब्दांत भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माध्यमांतील प्रपोगडावर उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाह यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शिवसेनेबाबत आपली मते मांडली.

 

"अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवडले गेले होते आणि त्यांना पक्षाने सरकार स्थापनेसाठी अधिकृत व्यक्ती म्हणून अधिकार दिले होते. राज्यपालांनीदेखील सरकार स्थापनेसाठी त्यांच्याशीच चर्चा केली होती. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखवली, त्या पत्रावरही अजित पवारांचीच स्वाक्षरी होती. नंतर आम्हाला त्यांनी जे पाठिंब्याचे पत्र दिले त्यावरदेखील अजित पवारांचीच स्वाक्षरी होती व त्यामुळेच भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला," असे यावेळी अमित शाह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

मुलाखतीला उपस्थित असलेल्यांपैकी एका व्यक्तीने अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्यांचे खटले मागे घेतल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अमित शाह यांनी, "अजित पवारांवरील कोणतेही खटले मागे घेतलेले नाहीत, हा सगळा माध्यमांनी पसरवलेला प्रपोगंडा आहे," असे प्रत्युत्तर दिले.

 

'मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला आश्वासन नाही'

"आम्ही शिवसेनेबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि दोन्ही पक्षांना एकमेकांची मते मिळाली. आमच्या युतीला बहुमत मिळाले, हा जनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. तसेच तत्पूर्वी कितीतरी प्रचारसभांमध्ये देवेंद्र फडणवीसच आगामी मुख्यमंत्री असतील, असे आम्ही सांगितले होते," असे म्हणत "पहिली अडीच वर्षेच नव्हे, तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला आम्ही कोणतेही आश्वासन दिले नव्हते," असेही शाह यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

मोदींचे छायाचित्र लावून 'ते' जिंकले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र, बॅनर, पोस्टर्स लावून निवडणुका जिंकल्या. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्ष प्रमुखांचे पुत्र आदित्य ठाकरेदेखील मोदींचे बॅनर लावूनच विजयी झाले, अशा शब्दांत अमित शाह यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच काही काही उमेदवारांनी तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच छायाचित्र लावले, आपल्या पक्षनेत्यांचेही त्यावर छायाचित्र नव्हते, असेही ते म्हणाले.

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@