वन्यजीवगुन्ह्यांचा शोधकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019   
Total Views |

 

 
शहरी भागात रुजलेले तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अविरत झटणाऱ्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या येऊर क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्याविषयी...


मुंबई (अक्षय मांडवकर) -  या वन अधिकाऱ्याने ज्या ज्या वनपरिक्षेत्रांत काम केले, त्या ठिकाणाहून वन्यगुन्ह्यांचा समूळ नाश झाला. त्यांनी अवैध वृक्षतोड, वन्यजीवांची शिकार आणि तस्करीला चाप लावला. धडाडी, निष्ठा आणि चिकाटीने आपले काम केले. मानवी हस्तक्षेपाने गुरफटलेल्या संरक्षित वनांचे रक्षण करणे म्हणजे सहजसोपी गोष्ट नव्हे. मात्र, या माणसाने सुयोग्य व्यवस्थापन व हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवत ठाण्याच्या येऊरच्या जंगलातील अतिक्रमण व शिकारीवर लगाम लावला. या जंगलाला मद्यपानाच्या पार्ट्यांची लागलेली कीड मुळासकट उखडून टाकली. सध्या ते ठाणे आणि आसपासच्या परिसरातील वन्यजीवांच्या गंभीर तस्करींच्या प्रकरणांची उकल करत आहेत. असा वन्यजीवगुन्ह्यांचा शोधकर्ता म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार.

 
 

 
 
 
 
 
अहमदनगरच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात पवार यांचा दि. १६ एप्रिल, १९८० रोजी जन्म झाला. शालेय शिक्षण गावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बीड गाठले. तिथे बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नोकरी करण्याऐवजी त्यांना सेवा देण्यामध्ये रस होता. त्यामुळे त्यांची पोलीस खात्यामध्ये भरती होण्याची इच्छा होती. त्यासाठी भरती प्रक्रियेत ते सहभागी झाले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. २००१च्या दरम्यान वन विभागाच्या 'वनपाल' पदासाठी भरती प्रक्रिया खुली झाली. निसर्गाची सेवा करण्याच्या हेतूने पवारांनी या प्रक्रियेत अर्ज दाखल केला. केवळ सात पदांसाठी ही भरती प्रक्रिया असल्याने निवडीबाबत त्यांच्या मनात धाकधूक होती. पण, नियतीच्या मनात पवारांनी वनसेवेमध्ये आपली सेवा द्यावी, अशीच इच्छा होती. २००२ साली ते वन विभागात 'वनपाल' या पदावर रुजू झाले.
 
 
 

 
 

पवारांची सर्वात प्रथम नियुक्ती झाली ती म्हणजे त्यावेळी जंगलमाफियांनी वेढलेल्या तानसा अभयारण्याच्या वनपरिक्षेत्रात. त्यावेळी तानसामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू होती. वसई-ठाण्यातील जंगलमाफिया लपतछपत या संरक्षित वनातील उभी झाडे आडवी करत. साग, खैर अशी मोठी किंमत मिळणाऱ्या झाडांची कत्तल होई. ट्रक भरून तोडलेल्या झाडांची वाहतूक या जंगलातून होत असे. पवारांची नियुक्ती झाल्याबरोबर या प्रकरणाची उकल करण्यास सुरुवात केली. यामध्ये आडकाठी घालून जंगलमाफियांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत वरिष्ठांनी त्यांच्यावर तानसामधील वेलोंडा या सर्वात 'आव्हानात्मक' वनपरिक्षेत्राची जबाबदारी सोपवली. 'आव्हानात्मक' या अनुषंगाने की, त्याठिकाणी जंगलमाफिया वनाधिकाऱ्यांनाही न जुमानता वृक्षतोड करत. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून पवारांनी हा संपूर्ण परिसर दिवसरात्र एक करून पिंजून काढला. त्या परिसरात छुप्या पद्धतीने वस्ती करून जंगलमाफियांवर नजर ठेवली. महत्त्वाचे म्हणजे, नीडरपणे वृक्षतोड करणाऱ्यांची धरपकड केली. तानसामध्ये २००२ ते २००४ दरम्यान वाखणण्याजोगे काम केल्यानंतर पवारांची बदली शहापूरमध्ये झाली. याठिकाणी त्यांनी १० वर्षं सेवा बजावली. त्यावेळेस शहापूरमध्ये हरणांची शिकारी खुलेआमपणे सुरू होती. मोठ्या प्रमाणात शिकार केलेली हरणे शहापूरबाहेर जात. अशावेळी संघटनात्मकपणे काम करणे अपेक्षित होते. त्यासाठी पवारांनी वनकर्मचाऱ्यांच्या तुकड्या कामाला लावल्या. त्या माध्यमातून हरणांच्या शिकारीवर नियंत्रण आणले आणि या परिसरातील शिकारीचे जाळे उद्ध्वस्त केले. २०१४ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची पदोन्नती झाली. वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून पवारांनी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या येऊर वनपरिक्षेत्राची जबाबदारी स्वीकारली.

 
 

 
 
 

ठाणे शहराला लागून असलेले येऊरचे जंगल अतिक्रमणाच्या वाळवीने अगदी पोखरलेले. शिवाय त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्याने विशेष प्रसंगी जंगलात बिनदिग्गत मद्यपान होत असे. पवारांनी या समस्यांना हेरले असून त्यावर अजूनही काम करत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये येऊरमधील काही अतिक्रमण हटवण्यात त्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, वर्षाअखेर किंवा एखाद्या विशेष प्रसंगी येऊरमध्ये होणाऱ्या मद्यपानाच्या पार्ट्यांवर लगाम लावण्यात त्यांना यश मिळाले आहे. हे सर्व काम त्यांनी ठाण्यातील पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पूर्ण केले आहे. सध्या पवारांनी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील वन्यजीव तस्करीची प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांनी किमान १२ वन्यजीव तस्करीची प्रकरणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उघडकीस आणली आहेत. यामध्ये खवले मांजरापासून बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणांचा यात समावेश आहे. या कामामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क निर्माण झाला असून अशा प्रकरणांची गुप्त माहिती लोकांकडून त्यांना सहजरित्या मिळते. "वन्यजीव तस्करीची प्रकरणे अतिशय संवेदनशील असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील एखाद्या प्रकरणाची माहिती मिळाल्यास संबंधित अधिकारी वा यंत्रणेपर्यंत ती पोहोचती करण्याचे काम मी करत असल्याचे," पवार सांगतात. "शिवाय या प्रकरणांचा तपास करताना लोकांचा आमच्यावर विश्वास निर्माण झाल्याने त्यांच्याकडून बरीच गुप्त माहिती मिळते," असेही ते म्हणाले. शहरी भागात रुजण्याच्या प्रयत्न करणारे तस्करांचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी झटणाऱ्या राजेंद्र पवार यांना दै. 'मुंबई तरुण भारत'कडून भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा...!

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@