लोका सांगे ब्रह्मज्ञान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019   
Total Views |


 


महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचे पडसाद अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय राजकारणातही उमटले. एकीकडे भाजपला सत्तेपासून लांब ठेवत तयार होणाऱ्या या तीनचाकी सरकारमुळे पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर आपसुक शिक्कामोर्तब केले, तर काही नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेण्याची आयती संधी साधली. योग्य वेळी, योग्य पाऊल उचलणाराच राजकारणात बाजी मारून जातो. देवेंद्र फडणवीस आणि भाजपनेही तसा निश्चितच अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे संख्याबळाअभावी फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला. यावरून ममता बॅनर्जी आणि हास्यास्पद म्हणजे कुमारस्वामींनी भाजपवर दोषारोपण करणे हे मुळातच 'लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' अशी गत म्हणावी लागेल. ममतादीदींनी 'छुपके छुपके सरकार' या शब्दांमध्ये फडणवीसांनी रामप्रहरी घेतलेल्या शपथविधीची संभावना केली. पण, काँग्रेस, भाजप अशा दोन्ही पक्षांबरोबर सत्तासोबत दीदींनीही केली. आपला पक्ष, आपले कार्यकर्ते सोयीनुसार काँग्रेसच्या दावणीलाही बांधले. त्यामुळे खरंतर ममता बॅनर्जी काय किंवा देशातील इतर पक्षातील नेते काय, याविषयी बोलण्याचा अधिकार सगळेच गमावून बसले आहेत. ममतादीदींनी 'छुपके छुपके' याच बंगालमध्ये चीटफंड घोटाळे केले. भरदिवसा भाजप-संघ कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या. राज्यात अनागोंदीला खतपाणी घातले. आज त्याच ममता बॅनर्जींच्या तोंडी राजकारणातील साधनसुचितेची भाषा निश्चितच शोभणारी नाही. लोकसभा निवडणुकीतून दीदींनी किमान धडा घ्यावा आणि विधानसभेमध्ये त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती त्यांच्यावर ओढवणार नाही, याचीच प्रार्थना करावी. फडणवीसांना शहाणपणाचे चार शब्द सांगणारे दुसरे दिग्गज म्हणजे कुमारस्वामी. कर्नाटकात काँग्रेसबरोबर सत्तेचा झांगडगुत्ता करून रडकुंडीला आलेले हे देवेगौडापुत्र. कर्नाटकात राजकीय नाट्य सुरू असताना काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना फडणवीसांनी मुंबईत आश्रय दिल्याचा यांचा राग. 'वेळ सगळ्यांवर येते' असा फडणवीसांना टोला हाणणाऱ्या कुमारस्वामींनी आपल्यावर इतकी वाईट वेळ का ओढवली, याचे चिंतन करावे.

 

ममतांची 'किशोर'नीती

 

राजकारणात आपणच सर्वज्ञानी, मी, माझा करिष्मा आणि माझे काम' असा जिथे तिथे 'मीपणा' मिरवणाऱ्या ममतादीदींनी नुकतीच सुप्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. यापूर्वी किशोर यांनी नरेंद्र मोदी, कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहारचे नितीशकुमार आणि आंध्रच्या जगनमोहन रेड्डींच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती. मोदींच्या २०१४च्या ऐतिहासिक विजयानंतर किशोर यांना 'राजकीय चाणक्य' संबोधत, अनेक राजकीय पक्षांनी त्यांची मदतही घेतली. मोदींनी मदत घेतली, नितीशबाबूंनी घेतली, मग ममतादीदींनी तरी का बरं मागे राहावं म्हणा... 'मा, माटी, मानुष'चा नारा देऊन सर्वसामान्य बंगाली जनतेची एकेकाळी मनं जिंकणाऱ्या दीदींना आता २०२१ची विधानसभा निवडणूक खुणावते आहे. लोकसभेत भाजपने बंगालमधून १८ जागांवर मजल मारत अभेद्य समजल्या जाणाऱ्या दीदींच्या गडाला जोरदार धक्का दिला. त्याचीच कुठे तरी धास्ती घेत, ममता दीदींनी हा 'किशोर'मार्ग पत्करायचे ठरवलेले दिसते. नेत्यांची भाषणं, आश्वासक जाहीरनामे आणि कार्यकर्त्यांचा फौजफाटा हे आजच्या जमान्यात राजकीय विजयाचे सर्वंकष निकष ठरू शकत नाहीत. कारण, निवडणुका जिंकण्यासाठी योग्य 'डेटा'ही तितकाच महत्त्वाचा. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन, दीदींनी आधुनिक, तळागाळातील प्रचारासाठी किशोर यांची चाणाक्ष बुद्धी वापरण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. कारण, सरळ आहे. दीदींना आता त्यांच्या आश्वसन आणि कृतीवर विश्वास राहिलेला नाही. भाजपच्या रामनामाने त्यांचे भान हरपले असून कुठल्याही परिस्थितीत हातची सत्ता त्यांना गमावायची नाही. त्यातच मोदी-शाहंविरोधात घेतलेले उभे वैर, रामनामाला केलेला तीव्र विरोध, मुसलमानांचे अतोनात लांगूलचालन हे सगळे मुद्दे त्यांच्या विरोधातच उलटू शकतात. याची पूर्ण जाणीव असलेल्या ममता म्हणूनच ताकही फुंकून पिताना दिसतात. त्याच रणनीतीअंतर्गत दीदींनी राजकारणाचा आता 'किशोर' मार्ग निवडलेला दिसतो. पण, २०१७ मध्ये याच किशोरांच्या बुद्धीने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसलाही तारले नव्हते, हे दीदींनी विसरून नये. कारण, 'जो दुसऱ्यावरी विसावला, त्याचा कार्यभार बुडाला.'

@@AUTHORINFO_V1@@