अर्जुनाचा सुवर्ण रथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |



संजयने मांड्या फोडलेल्या अवस्थेत दुर्योधनालापाहिले व त्यामुळे त्याला शोक अनावर झाला. त्याने हस्तिनापुरी प्रवेश करून धृतराष्ट्राला ही बातमी दिली. तो म्हणाला, "धृतराष्ट्र महाराज, आपण सर्वस्व हरलो आहोत. प्राक्तनाने आपल्यापासून सारे काही हिरावून घेतले आहे."


दुर्योधनाला पराभूत करून पांडव आपल्या शिबिरात परत आले. विजय संपादन केल्यावरती शत्रूच्या शिबिरात प्रवेश करावा, असा प्रघात असतो. त्यानुसार दुर्योधनाच्या शिबिरात प्रवेश करण्यासाठी पांडव निघाले. शंख व रणभेरीच्या दणदणाटात पांडवांनी दुर्योधनाच्या शिबिरात प्रवेश केला. श्रीकृष्णाला सर्वाधिक आनंद झाला. शिबिरात पोहोचल्यावर त्याने सर्वांना शांत होण्याची विनंती केली व नंतर अर्जुनाला तो म्हणाला, "अर्जुना, तुझे गाण्डिव धनुष्य व बाणांच्या भाता घेऊन पायउतार हो." तोवर श्रीकृष्ण रथातच बसून होता. अर्जुन रथातून खाली उतरल्यानंतर कृष्णाने हातातील लगाम सोडून दिला. चाबूकही फेकला आणि त्या रथातून खाली उतरला. तत्क्षणी ध्वजावरती आरुढ असलेला हनुमान आकाशात झेप घेऊन अदृश्य झाला. सर्व जण हे आश्चर्याने पाहत असतानाच तो रथ एकदम पेटला आणि काही क्षणात जळून राखेचा ढीग तिथे जमा झाला.

 

अर्जुनाला तर खूपच दु:ख झाले. तो श्रीकृष्णाला म्हणाला, "कृष्णा, मी हे काय पाहतोय? माझा सुवर्णरथ, जो खांडववन युद्धात मला अग्निदेवांनी बहाल केला होता आणि ज्याचं सारथ्य तू केले तो बहुमोल रथा असा अचानक जळून गेला? हे असं का?" श्रीकृष्ण स्वत: गंभीरच झाला होता तो म्हणाला," अर्जुना, त्या रथाचे उद्दिष्ट आता पूर्ण झाले आहे. आता त्याची काही गरज उरली नाही. या रथाने कितीतरी जहाल व भयंकर अस्त्रे झेलली आहेत, जी गुरू द्रोण व राधेय यांच्यासारख्या महान योद्ध्यांनी सोडली होती. त्यांनी सोडलेली ब्रह्मास्त्रेपण या रथाने सहन केली. शिवाय अश्वथामाने सोडलेली भीषण अस्त्रेदेखील या रथावर येऊन आदळली. खरंतर हा रथ इतके दिवस टिकून राहिला, हेच नवल आहे. तो केव्हाच जळून जायला हवा होता. केवळ मी या रथावरती बसून सारथ्य करत होतो म्हणून तो जळाला नाही. तुझं उद्दिष्ट साध्य झालं म्हणून मी हा रथ आता सोडून दिला. अर्जुना, या जगात प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट तिचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येते. ज्या क्षणी ती गोष्ट साध्य होते त्या क्षणी तिचे कार्य समाप्त होते. त्या क्षणी तिची गरजही संपते. अगदी माझ्या व तुझ्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. आपण सर्वांनाच एके दिवशी हे जग सोडून जायचे आहे. तेव्हा दु:ख करू नकोस. चल, आपली अजून काही उद्दिष्टे बाकी आहेत. ती साध्य करूया," असे बोलून श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे आला. त्याने त्याचे अभिनंदन केले. त्याला अलिंगन देऊन तो म्हणाला,"युधिष्ठिरा, युद्धात विजयी झाल्याच्या रात्री शत्रूच्या शिबिराबाहेर विजयी वीरांनी झोपले पाहिजे, असा पायंडा आहे. तुम्ही तो पाळा." युधिष्ठिराने होकार दिला. पुढे युधिष्ठिर म्हणाला, "कृष्णा, मला तुझ्या कृपेने जे हवे ते मिळाले आहे. आता गांधारीला खूप शक्ती अवगत आहेत. तिला आपल्या पुत्राच्या मरणाचे तीव्र दु:ख झाले असणार. जर तिला कळलं की, गदायुद्धाचे नीतिनियम न पाळता आम्ही ते खेळलो आणि जिंकलो तर ती आम्हाला नक्कीच शाप देईल. तेव्हा आधी तू तिच्याकडे जाऊन तिचे सांत्वन करावेस. आम्ही तिला भेटायला नंतर येऊ." यावर श्रीकृष्णाने स्मित करून म्हटले, "तू म्हणतोस तो योग्यच आहे. मी तिला आधी भेटतो व नंतरच तुम्ही यावे म्हणजे तुम्हाला शाप लागणार नाहीत."

 

संजयने मांड्या फोडलेल्या अवस्थेत दुर्योधनालापाहिले व त्यामुळे त्याला शोक अनावर झाला. त्याने हस्तिनापुरी प्रवेश करून धृतराष्ट्राला ही बातमी दिली. तो म्हणाला, "धृतराष्ट्र महाराज, आपण सर्वस्व हरलो आहोत. प्राक्तनाने आपल्यापासून सारे काही हिरावून घेतले आहे." वृद्ध धृतराष्ट्र राजा आपली पत्नी गांधारी आणि सुना यांच्या समवेत होता. सोबत विदूर काकापण होते. इतरही अनेक आप्तजन होते. संजय म्हणाला, "महाराज, युद्ध संपलं आहे. शल्याचा वध झाला आहे. शकुनी मारला गेलाय. शकुनीचा पुत्र उलूकही मारला गेलाय. भीमाने दुर्योधनाचा वध केला आहे." हे वृत्त ऐकताच धृतराष्ट्र बेशुद्ध झाला. विदूरही बेशुद्ध झाले. त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. गांधारीची पण शुद्ध हरपली. काही दासींनी भगीरथ प्रयत्न केले व काही काळाने सर्व सावरले. विदूर सर्वांचे सांत्वन करतच होते. इतक्यात श्रीकृष्णाने तिथे प्रवेश केला. प्रेमळ भाषेत तो त्यांच्याशी बोलला. तो गांधारीला म्हणाला, "माते, मी शांतता राहावी म्हणून शिष्टाई केली होती. परंतु, तेव्हा दुर्योधनाने माझे काही ऐकले नाही. उलट मला वैर करण्याचा बेत केला. तूही त्याला सत्य व सदाचरण पाळावे म्हणून उपेदश केला होता. तेव्हाही त्याने ऐकले नाही जे घडलं आहे, ते सत्य आहे. तेव्हा तू पांडवांना दोषी ठरवू नकोस. आपल्यामुळे तुम्हा सर्वांना दु:ख भोगावे लागले म्हणून युधिष्ठिर अतिशय दु:खी आहे. हे युद्ध होऊ नये म्हणून त्याने पण खूप प्रयत्न केले आहेत. हे तुलाही ठाऊक आहे. तेव्हा तू त्या पंडूपुत्रांवर दया कर. त्यांनी आयुष्यभर खूप दु:खं सोसली आहेत.तू त्यांना तुझी माया दे, ममता दे." कृष्णाच्या या बोलण्यामुळे धृतराष्ट्र आणि गांधारी दोघेही शांत झाली. गांधारी म्हणाली, "श्रीकृष्णा, तू म्हणतोस ते योग्यच आहे. दु:खामुळे माझी विचारशक्तीच नष्ट झाली होती. पण तुझ्यामुळे आता माझे चित्त थाऱ्यावर आले आहे. मी कुंतीच्या पुत्रांशी नक्कीच न्यायाने वागेन. मात्र, माझी सर्व मुलं मारली गेली आहेत. आता तुझ्याशिवाय माझं सांत्वन कोणीच करू शकत नाही."

 

- सुरेश कुळकर्णी

 
@@AUTHORINFO_V1@@