आता लढावेच लागेल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


 


महायुतीत भाजप जितक्या जागा लढली, त्याच्या प्रमाणात भाजपला यश मिळाले. आता जागाही भरपूर असतील आणि आव्हानेही. विधानसभेपूर्वी येणारी लढाई ही मुंबई महानगरपालिकेची असेल. तिथे भाजपला स्वत:ला सिद्ध करावे लागेल. हा संघर्ष करायला मिळाला म्हणून व त्याआधी शिवसेनेची धोंड नियतीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळ्यात नेऊन बांधली म्हणून भारतीय जनता पक्षाने परमेश्वराचे आभार मानावे व कडव्या लढाईसाठी तयार व्हावे.


खरा संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो, तीच व्यक्ती नशीबवान. गुजरातमधून दिल्लीला पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांच्या राजकीय संघर्षाचा तोच संदेश आहे. किंबहुना देदीप्यमान यश मिळविलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या यशामागे असाच भीषण संघर्ष असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या, त्यावर अखेर आज पडदा पडला. देवेंद्र फडणवीसांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि पूर्वीच्या 'महाशिवआघाडी'ला व आताच्या 'महाविकासआघाडी'ला सत्तेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सर्वात मोठा जनादेश मिळवून भारतीय जनता पक्ष लोकांच्या समोर आला होता. शिवसेना हा यातला प्रमुख भागीदार होता. विधानसभेची निवडणूक महायुतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचे तेच दावेदार होते. दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या जागा आधीपेक्षा कमी झाल्या. शिवसेनेच्याही कमीच झाल्या मात्र, राजकारणात कमी झालेल्या जागांचा म्हणूनही एक उपयोग असतो. शिवसेनेने तो पुरेपूर करून घेतला. जे सांगितले नव्हते, ते मागायला सुरुवात केली आणि पुढचा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर आहे. फडणवीसांनी आपले सरकार वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. ते तसे झाले नसते तर सहजासहजी सत्ता देऊन टाकणारा राजकीय विरोधक म्हणून फडणवीसांना कायमचे गृहीत धरले गेले असते. काही काळासाठी का होईना, पवारांच्या पक्षात फडणवीसांनी फूट पाडली, ही भीती राष्ट्रवादीला कायम सतावत राहील. जेव्हा जनतेने दिलेल्या जनादेशाशी प्रतारणा केली जाते, तेव्हा अशा गोष्टी घडणे अपरिहार्यच होते. भयग्रस्त आणि सतत परस्परांकडे संशयाने पाहणाऱ्यांचे सरकार आता महाराष्ट्रात विराजमान होणार आहे. या सगळ्यांचे आकडे इतके मजेशीर आहेत की, आपल्या ताटात किती आहे यापेक्षा शेजारच्याच्या ताटात किती आहे, हे पाहूनच ही मंडळी पंक्तीत जेवणार आहेत. भाजपला नैतिकता शिकविण्याचे सगळे प्रयोग या दरम्यान झाले. मूळ मुद्दा हा सरकार कसे टिकवायचे, हाच होता. ज्यांनी निवडणुकीपूर्वी युती केली, मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मिळविली आणि नंतर सरड्यालाही लाज वाटावी असे रंग बदलले त्यांच्याशी आपण कसे वागायचे? झाडामागून वालीचा वध करणारे प्रभू श्रीराम नैतिक की अनैतिक अशा प्रकारच्याच पेचाचा हा मुद्दा आहे. स्वत:ची हिंदुत्वाची प्रतिमा आरडाओरडा करून वारंवार अधोरेखित करणारे की हिंदुत्वाच्या अस्सल मुद्द्यांचे परिशालन करणारे हा भेद या निमित्ताने स्पष्ट झाला.

 

वस्तुत: या देशात दोनच प्रमुख विचारधारा आहेत. एक आहे हिंदुत्वाची आणि दुसरी आहे बिगर हिंदुत्वाची. भाजप आणि काँग्रेस असे हे द्वैत आहे. बाकी सगळे जमेल तसे आपापले स्वार्थ पाहात या दोन्ही गटांत विभागलेले असतात. शिवसेना नेमकी कुठे आहे आणि असेल ते या घटनेने स्पष्ट झाले. शिवसेनेचे आमदार निवडून यावे, यासाठी अनेक संघ कार्यकर्त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता काम केले होते. त्यात त्यांचा दोष नाही. हिंदुत्व हीच त्यांची यामागची भावना होती. हीच शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सोडविणाऱ्या भारतीय जनता पक्षासमोर शत्रू म्हणून उभी राहिली आहे. शिवसेनेचा आक्रमक आव इतका बेमालूम असायचा की, तेच खरे हिंदुत्व आहे, असे आपल्यालाही वाटायचे. या बेगडापासून खऱ्या हितचिंतकांचा भ्रमनिरास व्हायला हवा होताच, तो या मोसमात झाला. आक्रमक हिंदुत्वाच्या नावाखाली आपली फसवणूक केली जात होती, हे आता लक्षात यायला लागेल. 'मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे,' असा टोला मारणारे उद्धव ठाकरे मंदिरांच्या विरोधात कोर्टात उभे राहाणाऱ्यांचे अशील कसे झाले, ते काल पाहायला मिळाले. देशाचे राजकारण दोन पक्षांत विभागले जावे, ते लोकशाहीसाठी चांगले आहे, अशी चर्चा वारंवार होत असते. या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आहे. नव्या सरकारला शुभेच्छा आहेतच पण त्यापेक्षाही शुभेच्छांची गरज शिवसेनेला असेल. गेल्या सरकारात 'वर्षा' व नंतर 'मातोश्री' ही सत्तेची दोन महत्त्वाची केंद्रे होती. या सरकारचा केंद्रबिंदू 'वर्षा' किंवा 'मातोश्री' नसेल तर तो पेडर रोडवरचा 'सिल्व्हर ओक' असेल. हे सरकार शरद पवारांचे असेल आणि ते शरद पवारांच्या इशाऱ्यानेच चालेल. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला या दोन काँग्रेसच्या मागेपुढे धावताना सगळ्यांनीच पाहिले आहे. जेवढी वर्षे हे सरकार असेल तेवढे दिवस हेच घडताना दिसेल.

 

आता प्रश्न भाजपचा, तर आता उघड संघर्ष करण्याला महाराष्ट्र भाजपला पर्याय नाही. पवार मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्याने काय बोलायचे, हेदेखील ते ठरवतील, अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात होत असते. भाजपचे तसे नाही. एकापेक्षा एक सरस, आक्रमक आणि अभ्यासू विरोधी पक्षनेते भाजपने दिले आहेत. एक अत्यंत आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचे स्मरण करावे लागेल, कारण शरद पवारांचे कडवट विरोधक म्हणूनच त्यांनी आपले राजकारण केले होते. महाराष्ट्र भाजपच्या वाढीसमोरची सगळ्यात मोठी अडचण ही शिवसेनाच होती. समान विचारसरणीचा आव आणि आतला माल कसाही असला तरी हिंदुत्वाचे आकर्षक वेष्टन यामुळे लोक शिवसेनेला भाजपच्याच विचारसरणीचे मानत होते. आता सोनिया गांधींना स्मरून आदित्य ठाकरेंनीच शपथ घेतल्याने हा भ्रम दूर होईल. राजकीय पक्ष म्हणून भाजपसमोर आता मोठे आव्हान असेल, कारण उद्याच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येतील. महायुतीत भाजप जितक्या जागा लढली, त्याच्या प्रमाणात भाजपला यश मिळाले. आता जागाही भरपूर असतील आणि आव्हानेही. विधानसभेपूर्वी आता येणारी लढाई ही मुंबई महानगरपालिकेची असेल, तिथे भाजपला स्वत:ला सिद्ध करावे लागेल. हा संघर्ष करायला मिळाला म्हणून व त्याआधी शिवसेनेची धोंड नियतीने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या गळ्यात नेऊन बांधली म्हणून भारतीय जनता पक्षाने परमेश्वराचे आभार मानावे व कडव्या लढाईसाठी तयार व्हावे.

@@AUTHORINFO_V1@@