अपराध माझा असा काय झाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |




अपराधी भावनेने पछाडलेली व्यक्ती आपण केलेली चूक सुधारण्यासाठी विधायक मार्गाची कास धरते. वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रेरणा या भावनेच्या अनुभवातूनच लोकांना मिळते. अपराधीपणाच्या भावनेत आपल्या स्वतःपेक्षा आपण केलेल्या कृतीबद्दलचा आक्षेप व्यक्तीला असतो. त्यामुळेच या कृतीला आपण कशा पद्धतीने सुधारले पाहिजे, यावर व्यक्तींचा भर जास्त असतो.



माणूस आणि त्याच्या भावना हा जितका मनोरंजनात्मक
, तितकाच तो गुंतागुंतीचा विषय आहे. आपल्या भावना या आपण काय आणि कसे विचार करतो, यावर अवलंबून असतात. शिवाय आपल्या या भावनांचा परिणाम आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेवरही होत असतो. आपण अनेक गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्या मनात भावनांचे अनेक तरंग उठत असतात. कधी आपण दुसर्‍यांना दोष देतो वा कधी परिस्थितीला दोष देतो. कधी आपला राग स्वतःवर असतो, तर कमी आपण दुसर्‍यांवर राग धरतो. कधी आपल्याला पूर्वी झालेल्या गोष्टींबद्दल भीती वाटते, तर कधी भविष्यात काय होईल, या गोष्टींमुळे भीती वाटते. भावना जितक्या तीव्रतेने माणसाला जाणवतात, तितक्या त्या अगम्यसुद्धा असतात. यात अपराधी वाटणे, ही अशी एक भावना आहे.



‘अपराधी भावना’ ही हवी असलेली भावना आहे का नको असलेली भावना आहे. याचा सहज उलगडा होत नाही. सर्वसाधारण मानसिक सल्ला दिला जातो की, अपराधी न वाटता जगणे भाग्याचे वा फायद्याचे असते. तसे बारकाईने पाहिले, तर अपराधीपणाची भावना व्यक्तीच्या नैतिक मूल्यांवर, भिडस्त स्वभावावर, सामाजिक मूल्यावर आणि धार्मिक भावनांवर अवलंबून असते. शिवाय अपराधी मन आपल्या आयुष्यात त्याक्षणी काय भूमिका घेते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सिग्मंड फ्रॉइड या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने अपराधीपणाची भावना ही सर्वसामान्य मानवी भावना आहे, असे नमूद केले आहे. पण, त्याचवेळी त्यांनी असेही म्हटले आहे की, अपराधी भावनेचे जर व्यवस्थित निराकरण झाले नाही, तर व्यक्तींच्या मनात अनेक द्वंद्वयुक्त प्रसंग निर्माण होतात आणि मानसिक संतुलन बिघडते.



अपराधीपणाच्या भावनेभोवती का कोण जाणे
, पण नकारात्मक वलय आहे हे खरे. कारण, ही भावना नैतिक भावना म्हणून समजली जाते. तिच्यामुळे माणसे अनेक चुकीच्या विशेषतः सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने चुकीच्या किंवा विघातक गोष्टी करायचे टाळतात. ही भावना शेवटी आपले कर्तव्यदक्षता आणि आपली समाजविषयक जबाबदारी यावर परिणाम करते. जेव्हा व्यक्तीच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते, तेव्हा त्यांना आपण काहीतरी प्रचंड चूक केली आहे, याची जाणीव झालेली असते. खरेतर या जाणिवेने त्यांचेच मन त्यांना खात असते. अशा प्रकारच्या अपराधी भावनेने पछाडलेली व्यक्ती आपण केलेली चूक सुधारण्यासाठी विधायक मार्गाची कास धरते. वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रेरणा या भावनेच्या अनुभवातूनच लोकांना मिळते. अपराधीपणाच्या भावनेत आपल्या स्वतःपेक्षा आपण केलेल्या कृतीबद्दलचा आक्षेप व्यक्तीला असतो. त्यामुळेच या कृतीला आपण कशा पद्धतीने सुधारले पाहिजे, यावर व्यक्तींचा भर जास्त असतो.



सिग्मंड फ्रॉइड म्हणतात त्याप्रमाणे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला अपेक्षित अशा विचारांनी वा कृतीने नैतिक हनन झाले तर
, अपराधी असल्याची भावना निर्माण होते. साहजिकच हे विचार व कृती विधायक पातळीकडे नेण्याचे काम मन करते. अपराधीपणाची भावना ही भावनांमधील तडजोड करणारी भावना आहे. कारण, या भावनेमुळे व्यक्ती स्वत:च्या कृतीकडे व भावनांकडे विश्लेषणात्मक दृष्टीने पाहण्याचे वा त्यांचे सिंहावलोकन करण्याचे ठरविते. अर्थात, हे ठरविण्यामागे प्रौढ प्रगल्भता गरजेची आहे. शिवाय परानुभूती व अपराधी वाटणे यामध्ये विशेष नाते आहे. सुदृढ नात्यांमध्ये ‘मी व माझे’ यापलीकडे जाता येणे व दुसर्‍या व्यक्तीचे विचार समजून त्यांच्या भावनांची पार्श्वभूमी उमजून घेता येणे, ही मोठी गोष्ट आहे. कारण, परानुभूती मानवतावादी आणि समाजाभिमुख कृती करण्यासाठी व्यक्तीला प्रेरित करते. थोडक्यात, ज्यांना आपल्या चुकीच्या कृतीमुळे अपराधी वाटते, त्या व्यक्तींना परानुभूती वाटल्यामुळे त्या इतरांशी व समाजाशी विधायकदृष्ट्या जोडल्या जातात. त्यांच्यात परोपकार करण्याची वृत्ती अधिक प्रमाणात दिसून येते.

(क्रमश:)
-
डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@