छोटीसी आशा : 'हॅप्पीवाली फीलिंग'चा आगळावेगळा बालदिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



आपण अनेकदा पाहतो मॉल, चित्रपटगृह आणि गार्डनच्या बाहेर अनेक चिमुरडी आपले बालपण बाजूला ठेवून काम करत असतात आणि आपण कधीच आतमध्ये जाऊन यांचा अनुभव घेऊ शकणार नाही, असे म्हणत निराश होऊन जगत असतात. पण अशाच चिमुकल्यांना या बालपणाच्या आनंदावर तुमचादेखील हक्क आहे, या आशेचा किरण दाखवणारा अनोखा उपक्रम अशा मुलांसोबत मुंबईत साजरा करण्यात आला.


एखाद्याच्या स्वप्नपूर्तीचे कारण होण्यात जगावेगळं सुख आहे आणि आज ते सुख अनुभवले. २२ बेघर चिमुकल्यांची आम्ही एक दिवसीय सहल काढली आणि एका दिवसामध्ये त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या आशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सर्व मुलांना नवी मुंबई - वाशी 'इनऑर्बिट मॉल'मधील 'टाईमझोन गेमिंग सेंटर'मध्ये खेळ खेळायला नेले. त्यानंतर चित्रपटगृहामध्ये त्यांच्या सोबत 'खारी बिस्कीट' चित्रपट पाहिला आणि मग पोटभर खाऊन कोपरखैरणे निसर्ग उद्यानात मन भरून मैदानी खेळांचा बेधुंद आनंद लुटला. या सगळ्यात नवी मुंबई पोलीस दलाचे सचिन हिंदळेकर आणि 'टीम टाईमझोन' तसेच युवराज अतिग्रे व 'टीम कार्निव्हल सिनेमा' यांचे लाखमोलाचे सहकार्य लाभले. तर सुरुवात करेन संकल्पनेपासून. दर महिन्यात एका अनाथाश्रमात, बालकाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन तेथील लहान-थोरांसोबत विविध खेळ खेळायचे आणि आनंद लुटायचा, हे आमचं ठरलेलं समीकरण. मग हा तर नोव्हेंबर महिना. याच महिन्यात 'बालदिन' असतो. त्यामुळे चिमुकल्यांसोबत बालदिन काहीतरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा हा निश्चय पक्का होता. मग सहज विचार आला, अनाथाश्रमातील मुलांना तरी सातत्याने भेटायला बरीच सारी मंडळी येतात, कधी कधी आश्रम समिती तिथल्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाते. पण मग त्या मुलांचं काय, ज्यांना आई-वडिलांचं प्रेम तर भेटलंय, पण नशिबाने जन्म अशा वस्तीत झाला आहे जिथे राहण्यासाठी घर नाही, झोपण्यासाठी अंथरूण नाही, खाण्यासाठी पोटभर अन्न मिळत नाही. ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी विकून, मंदिराबाहेर गाई चरून ज्यांचे पालक आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि रात्री फुटपाथवर किंवा ब्रिजखाली झोपतात. या मुलांच्यादेखील छोट्या-छोट्या आशा असतील! जसे की, आपले पण खूप लाड व्हावेत, आपण गार्डन, मॉल किंवा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा आणि मग ठरलं चिमुकल्यांच्या याच साऱ्या इच्छा आपण एका दिवसासाठी तरी पूर्ण करायच्या.मी या एक दिवसीय सहलीचं नियोजन पत्रक जवळच्या पोलीस चौकीत जाऊन सादर केलं. मग सगळ्या पालकांना जाऊन सदर सहलीचं नियोजन सांगितलं.

 

सुरुवातीला आपल्या पोटचा गोळा संपूर्ण दिवसासाठी आमच्या हाती सोपवायचा, हे ऐकून काही आई-वडिलांचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता, पण त्या सगळ्यांशी माझी ओळख असल्याने आणि या संकल्पनेला पोलिसांची अनुमती असल्याचे पाहून त्यांनी मला यासाठी संमती दिली. आणि मग आशेची किरणं पसरवत त्या दिवसाचा सूर्य उगवला. भल्या पहाटेपासून सगळी चिमुकली तयार होऊन आमची वाट पाहत बसली होती. नियोजित स्थळावरून शिस्तबद्ध पद्धतीत त्यांना एकत्र करण्यात आले आणि मग संपूर्ण दिवस आम्ही त्यांच्यासोबत निरागस आनंद लुटला. त्या मुलांच्या डोळ्यांत मॉलमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवताना पाहिलेली चमक, चित्रपटगृहात मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहतानाचा त्यांचा तो हसरा चेहरा, पावभाजी पार्टीतला उनाड कल्लोळ आणि गार्डनमधल्या मैदानी खेळात लुटलेली मस्ती-मज्जा याचे वर्णन शब्दांमध्ये होणे नाही. या एका दिवसात संमिश्र आनंद या चिमुकल्यांसोबत संपूर्ण टीमने लुटला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या एकंदरीत दिवसात कोणत्याही मुलाला कसलाच त्रास टीममेंबरने होऊ दिला नाही. उलट रात्री प्रत्येक मुलाला आपापल्या कुटुंबात परत सोडताना गौरी नावाची छोटीशी परी रडतच पुन्हा मला बिलगली आणि म्हणाली, "दादा पुन्हा ये." तिच्या या एका मिठीत तिने जणू सगळ्या मुलांच्या आनंदाची पोचपावती आणि पुढील उपक्रमाची छोटीशी आशा माझ्याकडे पोहोच केली.

 

 
 

मान्य आहे, आपण सगळेच आपापल्या वैयक्तिक जीवनात इतके व्यस्त असतो की, या पद्धतीत प्रत्येकालाच एक पूर्ण दिवस अशा सगळ्या गोष्टींसाठी देणं शक्य होत नाही, पण दिवसातला काही वेळ तरी आपण प्रत्येकजण देऊच शकतो आणि एखाद्याच्या डोळ्यात चमकणाऱ्या छोट्याशा आशेच्या पूर्तीचे कारण तर नक्कीच बनू शकतो. शेवटी इतकेच सांगेन, आयुष्य खूप सुंदर आहे. ते बेधुंद जगलं पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारी मोठी मोठी 'हॅप्पीवाली फीलिंग' अनुभवली पाहिजे. अशा मुलांसोबत मुंबईत साजरा करण्यात आला. या एका दिवसात असे अनेक किस्से घडले घडले जे माझ्या आणि मुलांच्या कायमस्वरूपीसाठी लक्षात राहतील. तसंच माझ्यासारख्या टीममधल्या प्रत्येक सदस्याला खूप सुखद अनुभव आले. शेवटी इतकेच सांगेन, आयुष्य खूप सुंदर आहे. ते बेधुंद जगलं पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारी मोठी मोठी 'हॅप्पीवाली फीलिंग' सगळ्यांनी अनुभवली पाहिजे.

 

- विजय माने

@@AUTHORINFO_V1@@