‘बाल संभाजी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |




‘छत्रपती संभाजी महाराज’ या सुप्रसिद्ध मालिकेतून बाल संभाजीची भूमिका साकारणारा आणि सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या बालकलाकार दीपेश मेदगे याचा हा अभिनयप्रवास...


अभिनयाची आवड जोपासणार्‍या अनेक कलाकारांनी मनोरंजनक्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे
. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात ते ‘स्टार’ ठरले. बालकलाकारांनीही या अभिनयाच्या मनोरंजक प्रवासात सदैव स्मरणात राहतील, अशा भूमिका निभावल्या. ‘छत्रपती संभाजी महाराज’ या गाजलेल्या मालिकेतील ‘बाल संभाजी’ची भूमिका साकारणारा दीपेश मेदगेही त्यापैकी एक... या मालिकेमुळे मुंबईकर दीपेश अल्पावधीत प्रसिद्धीझोतात आला. प्रेक्षकांनीही त्याच्या अभिनयाची वेळोवेळी दाद देत, बाल संभाजीवर कौतुकवर्षाव केला.



‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे दीपेशला अभिनयाचे बाळकडूही घरातूनच मिळाले. त्याचे वडील पूर्वीपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने दीपेशलाही अगदी लहान वयात अभिनयाची गोडी लागली. त्याचे वडीलही चित्रीकरणाला दीपेशला सोबत घेऊन जात. ‘लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन’च्या झगमगाटात दीपेशही चांगलाच रुळला. पुढे यातूनच त्याची अभिनयाची आवड वृद्धिंगत होत गेली. दीपेशने अभिनयाचा श्रीगणेशा शालेय जीवनातच केला. शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो आवर्जून सहभागी होत असे. दीपेशच्या अभिनयाची चमक त्याच्या शिक्षकांनीही ओळखली होती. दीपेश चौथीत असताना एका मराठी मालिकेत बालकलाकाराची छोटी भूमिका त्याच्या वाट्याला आली. या संधीचे मात्र दीपेशने सोने केले आणि त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली.



दीपेशला निश्चितच सुरुवातीला काही अडचणी आल्या
. मालिकेच्या चित्रीकरणाला भरपूर वेळ दिल्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला. मात्र, चिकाटी आणि मेहनतीने अभ्यास आणि अभिनयाचा दीपेशने योग्य समतोल साधला. दीपेश हा मुंबईच्या भांडुपमधील अमरकोर शाळेचा विद्यार्थी. त्याचे मराठी भाषेवरही तसे उत्तम प्रभुत्व. शाळेत नेहमी दीपेश प्रथम तीन क्रमांकांमध्ये असतो. सकाळी लवकर उठून तो शाळेत हजेरी लावतो व काही तासांनी चित्रीकरणासाठी रवाना होतो. शाळेच्या शिक्षकांचा या कामी त्याला फार मोठा पाठिंबा लाभला. शाळेचे प्राचार्य मारूती म्हात्रे यांनी दीपेशला चित्रीकरणासाठी विशेष परवानगी दिली असून त्यांना दीपेशचा खूप अभिमान आहे. शाळेचे नाव मोठे केल्याबद्दल दीपेशचा सत्कारही करण्यात आला आहे.



दीपेश तसा मध्यमवर्गीय कुटुंबातील
. त्याच्या घरी त्याचे आई, वडील आणि छोटा भाऊ असा चौकोनी परिवार. वडील नोकरीबरोबरच मराठी आणि हिंदी मालिकांमधून काम करतात. त्याची आई गृहिणी असून तिला गाण्याची आवड आहे. दीपेशच्या या यशात त्याच्या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे. कारण, दीपेश लहान असल्याने त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी खूप मेहनत घेतली. दीपेशच्या घरची आर्थिक बाजू बळकट नसूनही आपल्या मुलाचे अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी त्यागही केले. या क्षेत्रात मिळणारे यश दीपेशच्या डोक्यात जाऊ नये, यासाठी त्याच्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली. आजही दीपेश चाळीतील त्यांच्या छोट्याशा घरातच राहतो. इतकी प्रसिद्धी मिळूनही दीपेश अगदी सामान्य मुलांसारखाच वागतो, बोलतो. त्याला ‘छत्रपती संभाजी महाराज’ मालिकेने नवी ओळख दिली. त्याच्या नावलौकिकाने अनेक नामांकीत व्यक्तीही त्याच्या घरी आल्या.




दीपेशची निवड अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली होती
. दीपेश आणि अमोल कोल्हे हे मालिकेसाठी खास तलवारबाजी, घोडेस्वारी शिकले. ‘बाल संभाजी’ साकारण्यासाठी दीपेशने मराठी आणि संस्कृत भाषेवर विशेष मेहनत घेतली. तलवारबाजीच्या सरावावेळी तलवारही लागल्याची आठवण दीपेश सांगतो. मात्र, अमोल कोल्हे यांच्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला, हे सांगायला तो विसरत नाही. अमोल कोल्हे यांनीही दीपेशचे, त्याच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. दीपेशच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचे संस्कार केले. इतकेच नाही तर अभिनयामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून चक्क चित्रीकरणाच्या सेटवरच तो अभ्यास पूर्ण करतो.



दीपेश अनेक हिंदी
, मराठी मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्येही झळकला आहे. सध्या तो एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढ्या प्रसिद्धीनंतरही दीपेशला कोणताही गर्व किंवा बडेजाव नाही. आजही दीपेश शाळेत सामान्य विद्यार्थ्यांसारखाच वागत-बोलत असून, आपल्या मित्रांबरोबर मज्जा-मस्ती करतो. अभिनयामुळे दीपेशचे बालपण हरवणार नाही, याची त्याने स्वत: आणि त्याच्या पालकांनी घेतलेली खबरदारी सर्वार्थाने कौतुकास पात्र आहे. दीपेशला बालकलाकार म्हणून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याला चित्रपटक्षेत्रात मोठे नाव कमवायचे असून आपल्या आई-वडिलांचेही नावही मोठे करायचे आहे. त्यामुळे सध्या बालकलाकार म्हणून छोटा पडदा गाजवणारा दीपेश भविष्यात अभिनयक्षेत्रात एक मोठा अभिनेता म्हणून नावलौकीक प्राप्त करेल, यात शंका नाही. दीपेशला त्याच्या या अभिनयप्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराकडून अनेकानेक शुभेच्छा...!


-कविता भोसले

@@AUTHORINFO_V1@@