द किंगडम ऑफ इस्वातिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019   
Total Views |



बहुपत्नीत्व पद्धतीला किंवा उम्हलांग सेरेमनीतील अर्धनग्न परेड किंवा राणी निवडीच्या पद्धतीला सोडण्याची हिम्मत राजा मस्वातिनीमध्ये नसेल कदाचित. पण, तरीही मानवी मूल्यांसाठीची क्रांती तिथेही होईल, हे नक्कीच.


आजही राजेशाहीची झूल मिरवणारा आफ्रिका खंडातील 'द किंगडम ऑफ इस्वातिन' देश. देशाचे पूर्वीचे नाव स्वाझीलँड. या देशाचा इतिहास पाहिला तर जाणवते की, इथेही ब्रिटिशांनी पारतंत्र्य लादले होतेच. १९६८ साली हा देश स्वतंत्र झाला. शोबुझा द्वितीय याचे स्वाझीलँडच्या लढ्यात मोठे योगदान होते. तो शाही घराण्यातलाच होता. त्यामुळे स्वाझीलँडला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शोबुझा देशाचे प्रमुख झाले. मात्र, ८० च्या दशकात त्याने स्वाझीलँडमध्ये राजेशाही पद्धत लागू केली. या राजाला ७० राण्या आणि २१० मुले होती. त्यांचाच मुलगा मस्वातिनी तृतीय. तर, सध्या राजा मस्वातिनी तृतीयच्या विरोधात जनक्षोभ निर्माण होत आहे. कारण जनतेच्या मते राजा मस्वातिन जनतेच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत ऐषोआरामात राहतो. देश अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असताना या देशाच्या राजाने-मस्वातिनी तृतीयने आपल्या पत्नींसाठी शंभर कोटीच्या गाड्या खरेदी केल्या. 'जनता उपाशी आणि राजा तुपाशी' असलेच आक्रित आहे इथे. इस्वातिन देशाची परिस्थिती काय, तर देशात ६९ टक्के जनता अक्षरशः गरिबीने गांजलेली तर ६३ टक्के जनता दररोज केवळ ८० रुपयांमध्ये कुटुंब चालवते. देशात ४० टक्के लोक बेरोजगार आणि जवळजवळ १/४ लोक एड्सग्रस्त. या अशा देशाच्या राजाचे राहणीमान अत्यंत विलासी. वर्ष २००९ मध्ये 'फोर्ब्स'ने प्रकाशित केलेल्या यादीमध्ये मस्वातिनी तृतीय जगभरच्या श्रीमंतांमध्ये १५व्या स्थानावर होता. त्याच्याजवळ पाच लाख डॉलरच्या मेबॅक कारसहित ६२ आलिशान गाड्या होत्या. हो, या गाड्यांचा फोटोसुद्धा कुणी काढायला बंदी आहे.

 

असो, या देशात आजही बहुपत्नीत्व पद्धती कायदेशीर आहे. याच देशात राजा मस्वातिनी याने २०१३ साली १८ वर्षांच्या मुलीशी आपला १५वा विवाह केला. राजा मस्वातिनी यांना पारतंत्र्याच्या आठवणी नको आहेत. त्यामुळे त्याने देशाचे पुरातन 'स्वाझीलँड' नाव टाकून देशाला 'इस्वातिन' नाव दिले. मात्र, या देशातील जनतेला काही पारंपरिक रूढी नको असतानाही त्या त्यांच्यावर अजूनही कायम आहेत. अर्थात, जगभरात जे होते तेच तिथेही आहे. या देशातील महिलांचा 'उम्हलांगा सेरेमनी' या समारंभाला विरोध आहे. तर आपले वैशिष्ट्ये जपण्यासाठी अजूनही मोठा गट या उम्हलांगा सेरेमनीचे समर्थन करते. या सेरेमनीचे स्वरूप पाहिले की वाटते, स्त्रीला किमान माणूस समजण्याची तरी या लोकांनी तसदी घ्यावी. विवाह हा कोणत्याही युवक-युवतीच्या मनातील हळवा कोपरा. आपला जोडीदार कोण असावा, याचेही रेशीमभाव जगाच्या पाठीवर प्रत्येक तरुणाईने जपलेले. मात्र, इस्वातिन देशामध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये लुदजिजिनी या गावामध्ये उम्हलांगा सेरेमनी आयोजित केली जाते. यामध्ये देशातील सुमारे १० हजारच्यावर कुमारिका युवती आणि बालिकाही सामील होतात. या समारंभात युवती पंख आणि डोक्यावर मुकुट घालून 'रीड' नावाचे पारंपरिक नृत्य करतात. आठ दिवस हा समारंभ चालतो, या समारंभातच हजारो युवती पारंपरिक गीत गात, नृत्य करत राजासमोर परेड करतात. पण हे नृत्य किंवा परेड करताना या हजारो मुली अर्धनग्न असतात. त्यांनी केवळ स्कर्ट परिधान केलेला असतो.

 

काही जण म्हणू शकतात की, परंपरा आहे, त्यामुळे असेल असे. पण तरीही हजारो युवतींच्या देहाचे असे प्रदर्शन खुलेआम मांडले जाते. वर राजासमोर ही अर्धनग्न परेड होत असताना राजाला जी युवती आवडेल, राजा तिच्यासोबत लग्न करतो. (मात्र, राजपत्नीचा मान मिळणार तो पहिल्या दोघींनाच.) तसेच जी कुमारिका युवती या परेडमध्ये सहभागी होण्यास नकार देईल, तिच्या पालकांना भरपूर दंड भरावा लागतो. राजेशाहीचे इतके विद्रूप व हिडीस रूप आजही जगात आहे. मस्वातिनी राजाने १५ विवाह केले. त्यापैकी आठव्या राणीने आत्महत्या केली, तर बाराव्या राणीला तिचे दुसऱ्यावर प्रेम जडले म्हणून राजानेच अदखलपात्र केले. बहुपत्नीत्व पद्धतीला किंवा उम्हलांग सेरेमनीतील अर्धनग्न परेड किंवा राणी निवडीच्या पद्धतीला सोडण्याची हिम्मत राजा मस्वातिनीमध्ये नसेल कदाचित. पण, तरीही मानवी मूल्यांसाठीची क्रांती तिथेही होईल, हे नक्कीच. आशा करू की क्रांती होण्याआधी राजा मस्वातिनी तृतीय नकारात्मक प्रथांना तिलांजली देतील.

@@AUTHORINFO_V1@@