ईशांत : एक लढवय्या खेळाडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



ईशांत शर्मा हा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्यासाठी त्याने आतापर्यंत आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष केला आहे. त्याच्या जीवनाविषयी...


कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या ऐतिहासिक 'गुलाबी' कसोटी सामन्यात पहिल्याच डावात पाच गडी मिळविल्यानंतर भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत आला. भारतीय खेळपट्टीवर पहिल्यांदाच झालेल्या 'गुलाबी' चेंडूच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक पाच बळी मिळवत ईशांत शर्माने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. 'लाल' आणि 'सफेद' चेंडूच्या तुलनेत अधिक 'स्विंग' होण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या 'गुलाबी' चेंडूने गोलंदाजी करताना ईशांत शर्माने पहिल्या डावात सर्वाधिक पाच आणि दुसऱ्या डावात चार गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली. गुलाबी चेंडूच्या पहिल्याच ऐतिहासिक सामन्यात ईशांत शर्माने केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत असून भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा ईशांत शर्मा पुन्हा एकदा प्रकाशात आला. तसेच त्याच्या या कामगिरीने भारतीय संघामध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मूळचा दिल्लीकर असलेला ईशांत शर्मा हा आजच्या घडीला भारतात सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्यासाठी त्याने आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष केला.

 

ईशांत शर्माचा जन्म २ सप्टेंबर, १९८८ रोजी दिल्ली येथे झाला. भारताच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीतच त्याचे बालपण गेले. ईशांतला लहानपणापासूनच शिक्षणापेक्षा क्रीडा प्रकारांमध्ये रूची होती. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याकडे त्याचे मन कधीच लागले नाही. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू होण्याचे लक्ष्य निर्धारित करत ईशांतने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या आठव्या वर्षांपासूनच यासाठी कसून तयारी करण्यास सुरुवात केली. आधीपासूनच इतरांच्या तुलनेत उंचीने अधिक असणाऱ्या ईशांतने क्रिकेटमध्ये फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवरच आपले लक्ष केंद्रित केले. घरापासूनच जवळ असणाऱ्या एका मैदानावर ईशांत शर्मा दररोज सरावासाठी जाई. या मैदानाच्या खेळपट्टीवरच सराव करत त्याने स्वतःलाघडवले. यावेळी ईशांतला कोणते विशेष प्रशिक्षणही मिळाले नव्हते. तरीदेखील ईशांतने स्वतःच अधिकाधिक सराव करत अनेक सामन्यांमध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली. अधिकाधिक वेगवान गोलंदाजी कशी करता येईल, यावरच भर देत ईशांत सराव करत असे. वेगवान गोलंदाजी करण्यात प्रसिद्ध असलेल्या ईशांतला सामन्यात संधी देण्यासाठी अनेक जण उत्सुक असायचे. दिल्लीतील विविध सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर अनेक प्रशिक्षकांनी ईशांतला क्लबमध्ये येऊन प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील नामांकित क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेणे, हे शर्मा कुटुंबीयांना कधीच परवडणारे नव्हते. पण, ईशांतने कुटुंबीयांजवळ क्लबमधील प्रशिक्षणासाठी हट्ट धरला. अखेर त्याच्या हट्टापायी कुटुंबीयांनी आर्थिक पदरमोड करत त्याला दिल्लीतील एका क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. कुटुंबाने आपला हट्ट पूर्ण करताच ईशांत आणखी मेहनतीने सराव करू लागला. त्याच्या गोलंदाजीचा वेग आणखीन वाढला.

 

काही वर्षे अशाच प्रकारे क्रिकेट खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका बड्या प्रशिक्षकाची नजर त्याच्यावर पडली आणि ईशांतला मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. २००६ साली इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या 'अंडर - १९' क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. पहिल्यांदा परदेशात क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याने ईशांतचा आनंद गगनात मावेनासा झाला. या संधीचे सोने करण्याचा निश्चय करत मैदानात उतरलेल्या ईशांतने इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करत निवड समितीवर एक वेगळीच छाप पाडली. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर ईशांतची वेगवान गोलंदाजी पाहून त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी देण्याचा निर्णय तत्कालीन निवड समितीने घेतला आणि ईशांतचे नशीबच पालटले. २००६-२००७ साली झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. या दौऱ्यात त्याला सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ईशांतने सराव सामन्यांदरम्यान प्रतिस्पर्ध्यांचे अनेक गडी बाद केले. त्यानंतर २००७ साली झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत ईशांत हा भारतीय संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून संघात आपले स्थान टिकवून आहे. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला ईशांत एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होईल, असा विचार स्वप्नातही केला नसल्याचे शर्मा कुटुंबीयच अनेकदा सांगतात. कोलकाता येथे झालेल्या भारतातील पहिल्याच 'गुलाबी' कसोटीतही ईशांतच्याच गोलंदाजीचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. आशिया खंडाच्या बाहेरील खेळपट्ट्यांवर सर्वाधिक बळी मिळवण्याचा भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रमही ईशांतने नुकताच मोडीत काढला. या कामगिरीमुळे त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात तो आणखीन चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वास भारतीयांना असून पुढील वाटचालीसाठी त्याला दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@