इस्लामविरोधात नॉर्वेजियन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |



लार्स थॉर्सन या 'सायन'प्रमुखाने मोर्चामध्ये मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या कुराणाची प्रत जाळली व काही प्रती कचराकुंडीत फेकून दिल्या. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात अवमानकारक नारेबाजीही केली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या इस्लामसमर्थकांनी संतापून जात लार्स थॉर्सनची गचांडी पकडली व ठोशावर ठोसे लगवायला सुरुवात केली.


इस्लामचे वा मुस्लिमांचे नाव घेताच शब्दाचा कीस पाडणारे शब्दप्रभू, व्याख्याते, व्याकरणकार वा त्या धर्माचे अनुयायी वगळता इतरांना नेमके काय वाटते-आठवते? अर्थातच हा प्रश्न ज्याचा त्याने सोडवायचा असून त्याविषयी आपले मत बनवायचे आहे. परंतु, नॉर्वे या युरोपीयन देशातील जनतेच्या मनात मात्र इस्लामचे नाव घेताच अन्याय-अत्याचार आणि बेबंदशाहीच्याच भावना उमटत असल्याचे नुकतेच समोर आले. गेल्या शनिवारी नॉर्वेमध्ये 'स्टॉप द इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे' (सायन) नावाच्या संघटनेने देशातील वाढत्या मुसलमानीकरणाविरोधात मोर्चा काढला व त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला. लार्स थॉर्सन या 'सायन'प्रमुखाने मोर्चामध्ये मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या कुराणाची प्रत जाळली व काही प्रती कचराकुंडीत फेकून दिल्या. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात अवमानकारक नारेबाजीही केली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या इस्लामसमर्थकांनी संतापून जात लार्स थॉर्सनची गचांडी पकडली व ठोशावर ठोसे लगवायला सुरुवात केली. परिणामी, हा हाणामारीचा प्रसंग पाहून दोन्ही गटांत धुमश्चक्री उडाली, गोंधळ-गदारोळ माजला व त्यातूनच पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करत काहींना अटक केली-तुरुंगात डांबले. इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हवी की, कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथ, धर्मप्रतिकांची विटंबना फार काही समर्थनीय वा प्रशंसनीय कृती म्हणता येणार नाही. तसेच असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कायदेशीर-न्यायालयीन कारवाई होऊन त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. परंतु, मुळात नॉर्वेतील नागरिकांवर इस्लामविरोधी मोर्चा काढण्याची व मुस्लिमांविरोधात इतका आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ का आली असावी? तर याची बिजे मुस्लीम घुसखोरांना युरोपीयन देशांनी आपापल्या भूमीत आश्रय देण्याच्या निर्णयात असल्याचे दिसते. मध्य-पूर्वेतील इस्लामी देश, सीरिया, लिबिया, इराक वगैरेंमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून झगडे सुरू आहेत. हा संघर्ष इस्लामशी इस्लामचा असाच असून त्याला कारण 'कोण सर्वात कट्टर मुसलमान' हे आहे. दरम्यानच्या काळात संधी दिसली की, आपला स्वार्थ साधणाऱ्या अमेरिका, रशिया या बलाढ्य देशांनीही त्यात हस्तक्षेप केलाच, पण तो विषय वेगळा.

 

इथल्या अंतर्गत लढ्याची झळ सर्वसामान्य मुस्लिमांना, गरिबांना, महिलांना, बालकांना बसली व त्यांनी स्वदेशातून पळ काढला. जीव वाचविण्याच्या उद्देशाने मायभूमीतून परागंदा झालेल्या या मुस्लिमांनी जवळच्या युरोपीयन देशांत घुसखोरी केली. उल्लेखनीय म्हणजे युरोपातील जर्मनी, फ्रान्स, इटली आदी देशांनी उदारमतवाद, मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांच्यासाठी आपली कवाडे उघडली. त्यात नॉर्वेचाही समावेश होतो. केवळ हंगेरीने मुस्लीम घुसखोरांना आश्रय देणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली. दुसरीकडे, दाराशी आलेल्या शरणार्थ्याने घरात घुसताच दंडेली करावी आणि घरातल्या मूळ रहिवाशांवरच हल्ला करावा, तसे अनुभव नंतरच्या काळात या युरोपीयन देशांतील जनतेला आले. जर्मनी असो वा फ्रान्स वा इटली वा नॉर्वे इथे मुस्लीम निर्वासितांनी तिथल्या नागरिकांनाच चाकूने, बंदुकीने, भरधाव ट्रकखाली मारायला सुरुवात केली. युरोपातील मोकळेपणावर आक्षेप घेत मुली-महिलांनी कपडे कसे घालावे, कुठे यावे-जावे यावर सल्ले द्यायला व नंतर आपली मागणी थोपायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर ख्रिश्चनांच्या सणावारांच्या उत्सवात जात स्त्रियांवर बलात्कारही केले. परंतु, ज्यांना आपण आश्रय दिला, ते आपल्यावरच अशा घृणास्पद पद्धतीने उलटल्याचे पाहून तिथल्या मूळच्या लोकांचा राग अनावर झाला व त्यांनी विरोधाला सुरुवात केली. आणखी एक मुद्दा म्हणजे या सगळ्याला आर्थिक आयामही होता. म्हणजे मूळच्या रहिवाशांनी कर भरायचा व त्यावर पोसले जाणार घुसखोर! तसेच नोकऱ्या, रोजगार, नैसर्गिक साधनसंपत्तीशीही त्याचा संबंध होता. त्यातूनच मुस्लीम घुसखोरांना, निर्वासितांना, शरणार्थ्यांना आमच्या देशात प्रवेश देऊ नका, अशी मागणी तिथल्या जनतेने तिथल्या नेतृत्वाकडे केली. मात्र, उदारमतवाद आणि मानवाधिकाराची नशा चढलेल्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपलेच घोडे पुढे दामटले. आपण किती मानवतावादी आहोत, इतरांच्या वेदना, यातनांप्रति संवेदनशील आहोत, हे दाखविण्यासाठी त्यांनी अधिकाधिक मुस्लीम घुसखोरांना देशाच्या सीमा खुल्या केल्या. त्याच काळात संबंधित देशातील राष्ट्रवादी शक्तींना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळू लागला व काही ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेतून निवडूनही गेले.

 

खरे म्हणजे इथेच त्या-त्या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी ठोस निर्णय घेत मुस्लीम घुसखोरांवर अंकुश लावायला हवा होता, आपल्या जनतेची मागणी मान्य करायला हवी होती. परंतु, तसे काही झाले नाही आणि आता नॉर्वेसह या युरोपीयन देशांतील इस्लामविरोधी जनमत मोठ्या संख्येने एकवटल्याचे पाहायला मिळते. नॉर्वेतील शनिवारच्या मोर्चात सहभागी नॉर्वेजियनांनी इस्लामवर केलेले आरोपही वर उल्लेखल्यासारखेच आहेत. इस्लाम हिंसाचाराचा, द्वेषाचा धर्म असून मुस्लीम लोक वाईट कृत्ये करणारे असल्याचा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केला. तसेच इस्लाम हुकूमशाहीवादी धर्म असून ते जिथे जातात तिथल्या लोकशाहीची, कायद्यांची पायमल्ली करतात, असाही त्यांचा दावा आहे. उल्लेखनीय म्हणजे मोर्चेकऱ्यांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांना पूरक ठरेल, अशा कित्येक घटना इस्लामच्या जन्मापासून ते आजपर्यंत घडल्याचे, घडत असल्याचे सर्वांनीच पाहिले. परंतु, हे सगळे वास्तव दिसत असताना नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सॉलबर्ग यांनी देशातील वाढत्या मुस्लीमविरोधी घटनांच्या नियंत्रणासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली. आता सॉलबर्ग यांच्या या निर्णयाने आगामी काळात हा प्रश्न आणखीही चिघळू शकतो. कारण जनतेला जे पाहिजे ते नेतृत्व करत नाहीये तर आपलेच म्हणणे खरे करत आहे. दरम्यान, नॉर्वेमध्ये इस्लामविरोधी मोर्चा व त्यातील कुराण जळीतकांडानंतर पाकिस्तानने जळजळीत प्रतिक्रिया दिली. जगभरातील १.३ अब्ज मुस्लिमांच्या भावनांना यामुळे ठेच पोहोचली असून अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे त्याने म्हटले. जगभरातील इस्लामचे व मुस्लिमांचे आपण एकमेव तारणहार असल्याचे दाखविण्यासाठीच पाकिस्तानने हे वक्तव्य केले असावे. पण ज्या देशाला आपले अस्तित्व उरेल की नाही, आपले किती तुकडे होतील त्याचीच भ्रांत पडलेली आहे, त्या देशाने इतरांच्या प्रश्नांत नाक खुपसण्यासारखा विनोद दुसरा कुठला असेल? तसेच जर इस्लामची व मुस्लिमांची पाकिस्तानला इतकीच काळजी वाटत असेल तर तो देश चीनमधील उघुर मुस्लिमांच्या दमनाविरोधात का कधी बोलत नाही, तिथे का शेपूट घालतो?

 

दुसरीकडे युरोपीयन देशात एकदा घुसखोरी केली की, मुस्लीम कसे संघटित होतात, त्याची झलकही याच महिन्याच्या १० तारखेला फ्रान्समध्ये पाहायला मिळाली. देशातील वाढत्या इस्लामोफोबियाच्या विरोधात एकत्र आल्याचे म्हणत फ्रान्समधल्या मुस्लिमांनी मोर्चा काढला व मुस्लिमांना गुन्हेगार, दहशतवादी ठरवत भीती दाखवण्याचे बंद करा, असे सांगितले. पण मुळात प्रश्न असा आहे की, ज्यावेळी घुसखोर मुस्लिमांनी त्या त्या देशांत हल्ले केले, त्यावेळी हे सर्वच आंदोलक कुठे होते? त्यावेळी त्यांनी आपल्यातल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली का? तर नाही, त्यामुळे फ्रान्ससह जर्मनी, नॉर्वे आदी युरोपीयन देशांतील जनतेला सगळाच मुसलमान समाज हल्लेखोर वाटतो. पण तसा तो नाही, हे सांगण्याची व दाखवून देण्याची जबाबदारीही मुस्लीम समाजाचीच आहे. तरच हा संघर्ष थांबू शकतो; अन्यथा स्थानिक आणि घुसखोरांमधील हा लढा आणखी वाढतच जाईल व इतर देशांनी हंगेरीचे उदाहरण समोर ठेवून तसे न वागल्यास युरोपात अराजकही माजू शकते.

@@AUTHORINFO_V1@@