संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; कामकाज तहकुब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |


महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकुब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत, आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले.

आज सकाळी लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी, महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधल्या राज्यपालांच्या भूमिकेविरोधात हौद्यात येऊन, रालोआ सरकारविरोधात फलक दर्शवत घोषणाबाजी केली.

सभागृहात फलक झळकावण्याच्या काँग्रेस सदस्यांच्या कृतीविरोधात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. मात्र त्यानंतरही काँग्रेसचे सदस्य फलक झळकावत राहील्याने अखेर, सभागृहातून फलक हटवण्यासाठी बिर्ला यांनी मार्शलना पाचारण करावे लागले. यावेळी हलकी झटापटही झाली.

या सगळ्या गोंधळादरम्यानही बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यासाठी पाचारणही केलं. यावर काँग्रेसचे खासदार महाराष्ट्रातली सत्तास्थापनेची प्रक्रिया म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचे मत राहुल गांधी यांनी गोंधळातच मांडले.

दरम्यान गोंधळ न थांबल्यामुळे अखेरीस बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकुब केले. १२ वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही गोंधळ सुरूच राहील्याने दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकुब करण्यात आले.

राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांसह, डाव्या आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू, सभागृहात न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा घेतली जाऊ शकत नाही असे म्हणत, हा प्रस्ताव फेटाळला.

यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या जागेवरूनच घोषणा द्यायला सुरुवात केली. या गोंधळातच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपाला जनादेश दिला आहे, मात्र तरीही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापनेचा प्रयत्न करत असल्याचे मत व्यक्त केले. यादरम्यान गोंधळ सुरुच राहील्याने अखेरीस नायडू यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकुब केले.

@@AUTHORINFO_V1@@