ओळख परेडने बहुमत सिद्ध होत नाही : आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |



 

मुंबई : विरोधकांनी आपले विधानसभेत बहुमत आहे, हे दाखविण्याचा आटापिटा चालविला असून सोमवारी हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे विरोधकांनी आमदारांची ओळख परेडच आयोजित केली होती. मात्र, या ओळख परेडमध्ये केवळ १३० आमदार हजर राहिल्याचे प्रत्यक्ष तेथे हजर असलेल्या सूत्रांनी सांगितल्याने विरोधकांच्या १६२ आमदारांचा दावा खोटा ठरला आहे. दुसरीकडे या प्रकारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. आमदारांची ओळख परेड म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. "ओळखपरेड ही आरोपींची होते. पण आपल्याच आमदारांना आरोपी समजणे ही लोकशाहीचा अपमान आहे. हा जनतेचा अनादर आहे." अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्गत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

 

 

"ओळखपरेडमुळे विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाचे संख्याबळ ठरत नाही. अशा प्रकारामुळे आत्मबल गमावलेल्यांचा आत्मबल परत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी दिसला. आज महाराष्ट्र आणि मराठी माणसाने शरमेने मान खाली घातली असेल. बाळासाहेबांच्या नातवाने सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेतली. हे समस्त देशाने पहिले. शिवसेनेचे हिंदुत्व किती बेगडी आहे हे संपूर्ण देशाने पहिले." असा घणाघात त्यांनी केला. 'स्वत:चे आत्मपरिक्षण केले तर तिथे १४५ आमदार तरी होते का?' असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
भाजपने अल्पमतात असताना राज्यपालांची दिशाभूल करून सरकार बनवले, असे आता विरोधक सांगत आहेत. आपल्यासोबत १६२ आमदार आहेत, असे विरोधक सातत्याने माध्यमांना सांगत आहेत. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे सर्व आमदारांना एकत्र करत त्यांची ओळख परेड घेतली. मात्र, या ओळख परेडला अवघे १३० आमदार हजर झाल्याने विरोधकांच्या दाव्यातील हवाच निघून गेली. भाजप खासदार नारायण राणे यांनीदेखील विरोधकांच्या या ओळख परेडला अवघे १३० आमदार हजर राहिल्याचे सांगत या सर्व प्रकारावर जोरदार टीका केली.
@@AUTHORINFO_V1@@