कुणी खुपसला जनादेशाच्या पाठीत खंजीर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |

 
 
राजकारण बहुत करावे, परंतु कळोच न द्यावे
परपिडेवरी नसावे, अंत:करणें
धटासि आणावा धट, उद्धटासि उद्धटें
खटनटासि खटनट, अगत्य करी
जैसाचि तैसा भेटे, तेव्हा मज्यालसि थाटे
इतुके होये परि धनी कोठे, दृष्टीस न पडे
समर्थ रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी जे म्हटले होते, त्याचीच प्रचीती आज महाराष्ट्र घेतो आहे. राजकारणात आणि क्रिकेटमध्ये सगळेच अनिश्चित असते, असे मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते, त्याचाही अनुभव राज्यातील जनता घेते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी दुसर्‍यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन्‌ सर्वांनाच आश्चर्यचकित केले. राज्यातील राजकारणात आलेला हा मोठा भूकंप होता. या भूकंपाच्या हादर्‍यात अनेक जण जखमी झाले आहेत, काही जण गंभीर जखमी झाले आहेत, काही कोमात गेले आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत जे असे सांगत होते की सरकार आमचेच येणार आणि मुख्यमंत्रीही आमचाच होणार, त्यांच्या वाघाचा तर चक्क पोपट झालेला महाराष्ट्राने पाहिला. शुक्रवारपर्यंत अशी स्थिती होती की महाराष्ट्रात आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाआघाडीचे सरकार येणार. पण, पडद्यामागे काय चाललेय्‌ याचा थांगपत्ताही नसलेल्यांना, शनिवारी सकाळी घडलेल्या घटनाक्रमाने सत्तास्थापनेची दिवास्वप्न पाहणार्‍यांना जोरदार चपराक बसली. शनिवारी सकाळी अख्खा महाराष्ट्र टीव्हीच्या छोट्या पडद्यासमोर असल्याचे अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले.
 
 
21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. 24 ऑक्टोबरला निकाल लागले. महायुतीला 161 जागा मिळाल्या. सत्तास्थापनेसाठी हा स्पष्ट जनादेश होता. जनादेशाचा कौल लक्षात घेता तातडीने भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेत येणे अपेक्षित होते. पण, शिवसेनेने संपूर्ण निकाल हाती येण्यापूर्वीच आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पापकर्म सुरू केले होते. जे ठरलंय्‌ त्याप्रमाणे मुख्यमंत्रिपदच हवे होते, तर त्यासाठी भाजपा नेत्यांसोबत एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. पण, तशी कुठलीही चर्चा मित्र असलेल्या भाजपासोबत न करता ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढलेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यांना चोर-दरोडेखोर म्हणालेत, त्यांच्या कळपात शिवसेना जाऊन बसली. मग, शिवसेनेलाही चोर-दरोडेखोर म्हणायचे काय? या प्रश्नाचे उत्तर शिवसेनेला द्यावेच लागेल.
आता भाजपाने अजित पवारांना हाताशी धरून सत्तास्थापन केली म्हणून शिवसेना नैतिकतेच्या नावाने गळे काढते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असलेल्या राजकीय व्यासपीठावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. असे असतानाही भाजपाला बाजूला ठेवत शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न चालविला, ही कुठली नीतिमत्ता? शिवसेनेला नीतिमत्तेच्या बाता मारणे आता शोभणारेच नाही. महाराष्ट्रातील जनतेने 105 जागा भाजपाला दिल्या, 54 राष्ट्रवादीला दिल्या, 44 कॉंग्रेसला दिल्या, शिवसेनेला 56 आणि इतरांना 30 दिल्या. याचाच अर्थ असा की शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यास 232 विधानसभा मतदारसंघांनी नकार दिला. भाजपाच्या भरवशावर 56 मधील अनेक जागा जिंकणारी शिवसेना एका पत्रकार खासदाराच्या सल्ल्याने मुख्यमंत्रिपद मागते, ही कुठली नीतिमत्ता होती? जर शिवसेनेला मुख्यमंत्रिपदच हवे होते तर भाजपासोबत न लढता स्वतंत्रपणे निवडणुका लढवून स्वत:ची कुवत सिद्ध करायला हवी होती. पण, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या कुबड्या घेतल्या, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली, त्यांना चोर-दरोडेखोर म्हणून हिणवले आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की, भाजपाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर कुणी खुपसला, हे न समजण्याएवढी जनता आता दुधखुळी राहिलेली नाही.
 
 
 
विश्वासघात, खंजीर खुपसणे, रात्रीच्या अंधारात खेळ खेळणे असले शब्द शिवसेनेच्या तोंडी आताच शोभेनासे झाले आहेत. आम्ही पाठीमागून वार करीत नाही, जे काही करतो ते दिवसाउजेडी करतो, असे जे उद्धव ठाकरे पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले असताना बोलले, ते खरेच आहे. कारण, त्यांनी महाराष्ट्राने दिलेल्या जनादेशाच्या पाठीत उघड उघड खंजीर खुपसला आहे. राजकारणाचा गंधही नसलेल्या पत्रकाराच्या सल्ल्याने वागल्यास असेच होणार! शिवसेनेत अतिशय समर्पित असे नेते आहेत. त्यांना बाजूला ठेवत महाराष्ट्रातल्या राजकीय तमाशावर एकच माणूस बोलतो आहे आणि पक्षप्रमुख त्याला आवरत नाहीत. असा जो माणूस असतो ना तो सिंहासन नावाच्या सिनेमात शेवटच्या भागात वेडा झालेला दाखवला आहे. तसा प्रकार शिवसेनेच्या सिनेमात घडला नाही म्हणजे मिळवले!
बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्री सोडून कधीच कुठे कुणाला भेटायला गेले नाहीत. अटलजी असतील, अडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील, अन्य पक्षांचे मोठे नेते असतील, सगळे लोक बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जात असत. ही मातोश्रीची ताकद होती, प्रतिष्ठा होती. पण, आता केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या वेड्या अट्टहासापायी पक्षप्रमुख मातोश्रीचा उंबरठा ओलांडून कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरातांसारख्या छोट्या नेत्याला भेटायलाही हॉटेलात जाऊ लागले आहेत, जे शरद पवार मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांना भेटत, त्या पवारांच्या घराचे उंबरठे पक्षप्रमुख झिजवताहेत, हे दुर्दैवी चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, त्याचे काय? कशासाठी एवढी लाचारी पत्करत असतील पक्षप्रमुख? एकवेळ सत्तेला लाथ मारू पण, कुणाचेही उंबरठे झिजवणार नाही, अशी व्याघ्रगर्जना ज्यांच्याकडून अपेक्षित होती, ते असे म्यांऊ म्यांऊ करीत दारोदार भटकतील अन्‌ बाळासाहेबांचा बाणेदारपणा त्यांच्या पश्चात धुळीस मिळवतील, असा विचार कुणी स्वप्नातसुद्धा केला नव्हता.
नीतिमत्तेच्या बाता मारण्याचा अधिकार कुणालाच नाही. कॉंग्रेस-राकॉं-शिवसेना यांच्या म्हणण्याप्रमाणे जसा तो भाजपाला नाही, तसाच तो या तीनही पक्षांच्या अभद्र आघाडीलाही नाही. राजभवनाचा दुरुपयोग झाला असा आरोप करण्याचाही अधिकार कुणाला नाही. शरद पवार आधी ज्या कॉंग्रेसमध्ये होते, त्या कॉंग्रेसने घटनेची पायमल्ली करीत भाजपाची मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि उत्तरप्रदेशातील सरकारं कारण नसताना बरखास्त केल्याचा अनुभव देशाने घेतला आहे. ज्या महाराष्ट्रात 1993 साली दंगली झाल्या, मुंबईत बॉम्बस्फोट मालिका झाली, हजारो निष्पाप जीव गेले, त्यावेळी खरे तर सर्वात आधी महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे सरकार बरखास्त करायला हवे होते. पण, तसे न करता जिथे काहीही घडले नव्हते, कायदा-सुव्यवस्था उत्तम होती, तिथली भाजपाची सरकारं बरखास्त करण्यात आली होती. जरा भूतकाळात डोकावून पाहा अहमद पटेल! मग भाजपाच्या निलाजरेपणाबाबत बोला. 288 पैकी फक्त 44 जागा महाराष्ट्रातल्या जनतेने कॉंग्रेसला दिल्या असताना आणि विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असताना शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठींबा द्यायचा, ज्या शिवसेनेला कायम अस्पृश्य मानले त्या सेनेच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सामील व्हायचे, हा निलाजरेपणा नाही तर काय पटेलसाहेब? कशाला बाता मारता फालतुच्या? शरद पवार तर नेहमीच म्हणत होते की, जनादेश युतीला असल्याने महायुतीने सरकार स्थापन करावे. मग कशासाठी घडवून आणला महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तमाशा? का नाही केला जनादेशाचा सन्मान? कशासाठी दाखवले शिवसेनेला गाजर?
 
 
 
वसंतदादांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला होता, याचे महाराष्ट्राला विस्मरण झालेले नाही पवारसाहेब! भाजपात फूट पाडायला निघालेल्या पवारांच्या खानदानीतच भाजपाने फूट पाडली तर म्हणतात की हा सत्तेचा दुरुपयोग आहे. तुम्ही करता तेव्हा तो सदुपयोग असतो आणि भाजपाने केले तर दुरुपयोग? हा कोणता न्याय आहे, ही कोणती नीतिमत्ता आहे पवारसाहेब? जरा महाराष्ट्राला समजावून सांगा. शेतकर्‍यांना न्याय देण्याच्या गोंडस नावाखाली महाराष्ट्रातल्या जनतेला फसवायला निघाला होतात तुम्ही. प्रत्यक्षात काय झाले, महाराष्ट्र बघतोय्‌ उघड्या डोळ्यांनी! निवडणुकीचे निकाल लागून महिना पूर्ण होत असतानाही सरकार स्थापन होत नव्हते. शेतकरी आणि जनता हवालदिल झाली होती. यातून मार्ग निघणे आवश्यक होते, तो मार्ग देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने जो राजकीय तमाशा दाखवून महाराष्ट्राचे मनोरंजन केले, त्या तमाशावर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांच्या मदतीने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत पडदा टाकला, हे बरे झाले!
@@AUTHORINFO_V1@@