भारतीय गणितीशास्त्रातले वशिष्ठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर पटणा येथे उपचार सुरू होते. वशिष्ठ यांची भारताचे स्टिफन हॉकिंग अशी ओळख होती. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...


बिहारमधील भोजपुरी जिल्हा
. या जिल्ह्यातील आरा या शहरापासून १२ किलोमीटरच्या अंतरावर असणारे वसंतपूर हे गाव ओळखलं जातं ते ‘वशिष्ठ बाबू’ यांच्या नावाने. सामान्य गावकर्‍याला वसंतपूर विचारल्यास कदाचित त्याला ते सांगणं कठीण जाईल पण वसंतबाबूंचं गाव कुठे आहे, हे तो क्षणाचाही विलंब न करता सांगेल. हे तेव्हाच शक्य असतं, जेव्हा कोणीतरी गावकरी एखादं असामान्य काम करतो. १९४६ ला वसंतपूरमध्ये वशिष्ठ सिंह यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाल बहादुर सिंह आणि आई ल्हासा देवी. वडील पोलिस हवालदार होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. वशिष्ठ नारायण हे अभ्यासात अत्यंत कुशाग्र आणि वेगवान होते. त्यांच्या या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी नेतरहाट शाळेत प्रवेश मिळवला. या शाळेची ओळख अशी की, इथली मुलं बोर्डात टॉप करतात.



वशिष्ठ नारायण सिंह यांच्यासारख्या विद्यार्थ्यांनी हे वाक्य खरे ठरविले
. वशिष्ठांनी मॅट्रिक आणि इंटरमीजिएट परीक्षेत बिहारमधील टॉपर्सच्या यादीत आपले नाव झळकावले. नेतरहाट शाळेतील शिक्षण पूर्ण करून वशिष्ठ पटना सायन्स कॉलेजला रवाना झाले. या ठिकाणी त्यांनी बी.एस्सी. गणितातील ऑनर्समध्ये पूर्ण केली. याच ठिकाणी वशिष्ठ आणि गणिताचे कनेक्शन कायमचे जोडले गेले. येथेच वशिष्ठ नारायण सिंह यांची प्रोफेसर जॉन कॅली यांच्याशी भेट झाली. वशिष्ठ यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. कॅलिफोर्निया, बर्कले (युसीबी) विद्यापीठाचे प्राध्यापक जॉन कॅली गणिताच्या परिषदेसाठी पटना येथे आले. प्राध्यापक कॅली यांनी परिषदेतील उपस्थितांना गणिताचे पाच प्रश्न दिले. या परिषदेत वशिष्ठ नारायण सिंहही उपस्थित होते. वशिष्ठाने पाचही प्रश्न सोडवले आणि तेही वेगवेगळ्या प्रकारे. संख्या शास्त्रातील त्यांचा अभ्यास पाहून प्रोफेसर कॅली प्रभावित झाले आणि त्यांनी वशिष्ठ नारायण सिंह यांना अमेरिकेत बोलावले.



बिहारमधील या सामान्य मुलाने बर्कलेच्या दिशेने उड्डाण केले
. ही घटना बिहारसोबतच संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट होती. प्राध्यापक कॅली यांनी वशिष्ठ यांचे फ्लाइट तिकीट आणि शिष्यवृत्तीची व्यवस्था केली होती. प्रोफेसर जॉन कॅली यांच्या देखरेखीखाली वशिष्ठांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता - ‘Reproducing Kernels and Operators with a Cyclic Vector’. १९६९ पर्यंतचा हा सर्व घटनाक्रम. बिहारमधील वशिष्ठ नारायण सिंह आता डॉ. वशिष्ठ नारायण सिंह झाले. पीएचडी पूर्ण करताच डॉ. वशिष्ठ नारायण सिंह अंतराळ संशोधन संघटना ‘नासा’कडे वळले. १९६९ मध्येच नासाचे ‘अपोलो मिशन’ सुरू झाले. याच मिशनद्वारे मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. अपोलो मिशनदरम्यान एकदा संगणक बंद झाले तेव्हा वशिष्ठ नारायण सिंह यांनी गणिताचा उपयोग करून एक संख्या गणना केली. जेव्हा संगणक चालू झाले तेव्हा वशिष्ठ आणि संगणक यांनी केलेली सांख्यिकीय गणना समान होती.



या कामगिरीनंतर वशिष्ठ नारायण बिहारमध्ये सर्वपरिचित झाले होते
. त्यांच्या नावाची बरीच चर्चा गावात होत होती. १९७३त्यांचा विवाह झाला. काही दिवसांतच ते पुन्हा अमेरिकेत स्थायिक झाले. अमेरिकेत, त्यांच्या पत्नीला त्यांच्या वागणुकीत फरक जाणवू लागला. येथूनच कुटुंबीयांना वशिष्ठच्या मानसिक आजाराबद्दल माहिती मिळाली. काही दिवस अमेरिकेत राहिल्यानंतर वशिष्ठ यांना मायदेशी परतावे, असे वाटू लागले. अखेरीस १९७४मध्ये वशिष्ठ भारतात परतले. मायदेशी परतल्यावर ते आयआयटी कानपूर येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. कालांतराने ते ‘टीआयएफआर’ व त्यानंतर कोलकात्यात ‘आयएसआय’मध्ये रुजू झाले.



१९७६मध्ये त्यांच्या पत्नीने घटस्फोट दिला
. या कौटुंबिक धक्क्याने ते अधिकच खचले. त्यांनी खाणे-पिणे बंद केले आणि त्यांची मानसिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त हिंसक होऊ लागली. त्यांना काणके मेंटल असायलममध्ये पाठवले. याठिकाणी वसिष्ठ यांना ‘स्किझोफ्रेनिया’नावाचा आजार असल्याचे आढळले. गणितीय क्षेत्रात भारताचे नाव गाजविणारे वशिष्ठ आता एका वेगळ्याच परिस्थितीत जगत होते. मेंटल असायलममध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारू लागली. काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अंतिम संस्कारांसाठी वशिष्ठ यांना घरी आणण्यात आले. परंतु, यानंतर असायलममध्ये परत जाण्यास त्यांनी नकार दिला. वशिष्ठ नारायण आपल्या भावासोबत राहण्यासाठी पुण्यात गेले. १९८९मध्ये वशिष्ठ आपल्या भावासोबत तपासणीसाठी रांचीला जात असतानाच मध्येच कुठेतरी गायब झाले. खूप शोध घेतल्यानंतर तब्बल चार वर्षांनी ते एका कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ सापडले. त्यांच्या माजी पत्नीच्या गावानजीक त्यांचा शोध लागला. या प्रसंगानंतर मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक काळजी घेणे सुरू केले.



स्थानिक वृत्तपत्रांनी वारंवार या घटनेचा हवाला देत सरकारला मदत करण्यास भाग पाडले
. प्रथम बंगळुरुमधील एनआयएचएएमएस अर्थात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो-सायन्स’ येथे वशिष्ठ यांना हलविण्यात आले. त्यानंतर, दिल्लीच्या आयएचबीएएस येथे त्यांच्यावर उपचार केले गेले. २००९मध्ये उपचार घेऊन ते घरी परतले. गेल्या वर्षी बातमी आली होती की, प्रकाश झा वशिष्ठ नारायण सिंह यांच्यावर बायोपिक बनवतील. आइन्स्टाइनच्या सिद्धांताला आव्हान देणारा भारतीय गणितज्ञ अशी त्यांची ओळख. त्यांनी केलेल्या संशोधनावर आजही शास्त्रज्ञ काम करत आहेत. भारताच्या या महान गणितज्ञाचं १४ नोव्हेंबरला निधन झाले. या महान गणितज्ञाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ची भावपूर्ण श्रद्धांजली!

-गायत्री श्रीगोंदेकर

@@AUTHORINFO_V1@@