त्या तिघी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |





फक्त ‘तीन स्त्रिया’ एवढीच त्यांची ओळख? नाही! त्या तीन शक्तीचे प्रतीक होत्या. त्या म्हणजे, सावरकरांच्या घरातल्या तीन अतिशय धैर्यवान स्त्रिया...


या एका कथेत कितीतरी उत्तर दडली आहेत
. दोन बायका एकत्र आल्या की भांडण नक्कीच! मग, या तर दोन नाही तीन आणि त्यासुद्धा ‘जावा.’ काही-काही नाती उगीच बदनाम आहे, त्यातले हे एक. प्रत्येक जावेला दुसरीबद्दल ईर्षा. हे नातंच शापित, पण प्रत्येक नियमाला अपवाद असतात. त्याचप्रमाणे या तिघी ठरल्या अपवाद. तीन जावा, का तीन बहिणी, का तीन मैत्रिणी इतका सुंदर प्रवास या नात्याने सावरकरांच्या घरात अनुभवला. तीन वेगवेगळ्या परिस्थितीतून, तीन वेगवेगळ्या घरातून एकत्र आल्या त्या थेट सावरकरांच्या घरात. तो काळही तसा कठीणच. परक्यांची राजवट. स्त्रियांसाठी तर अनंत अडचणींचा काळ. हाती सत्ता नाही, बाहेरही आणि घरातही, शिक्षण नाही, पण या तिघी अडाणी नव्हत्या. त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ समजला असं वाटतं. शिक्षण म्हणजे विचारांचे स्वातंत्र्य, शिक्षण म्हणजे असलेल्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार, शिक्षण म्हणजे असलेल्या परिस्थितीत हाती असलेल्या साधनांचा योग्य वापर करून काढलेला मार्ग, शिक्षण म्हणजे संस्कार झुगारून बंड पुकारणे नव्हे, तर संस्काराचा योग्य वापर करून केलेली सुधारणा. त्या तिघी खर्‍या सुशिक्षित.


एका स्त्रीच्या मानसिकतेतून जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतलं तेव्हा जाणवलं की
, हे तर मनाचा प्रत्येक कोपरा आतून ढवळून काढणार. आपण तयार केलेल्या आपल्याच प्रत्येक कृतीचा, आपल्याच विचारसरणीचा परत विचार करायला लावणार. स्त्री म्हणून किती अजून खोल असायला हवं, किती विशाल हृदय करायला हवं, किती समयसूचकता असायला हवी याचे अनेक कंगोरे जाणवले आणि शंभरदा तरी डोळे पाणवले. थोरली यशोदा, घराला आधार देणारी माऊली. धाकट्या दोघांची सहजच झालेली आई. देशाला पराजयाच्या सावलीतून बाहेर काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता सतत देशहित डोक्यात घेऊन चालणार्‍या थोरल्या सावरकरांची म्हणजेच गणेश सावरकरांची बायको. तिने घर बांधून ठेवले आपल्या साध्या सोप्या वागण्याने. एवढेच नाही, तर धाकट्या दोघींचा मोठा आधार झाली. ‘मोठेपण मागून मिळत नाही, तर ते स्वकर्तृत्वाने कमवावे लागते’ हे तिने दाखवून दिले.



विनायक सावरकर
, तल्लख बुद्धी, कवी मन आणि देश स्वातंत्र्याचे बाळकडूच जणू प्यायले होते. त्यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर! सगळ्यांना माहिती ती ’माई.’ काय असेल हो असेल या माईंची मानसिक अवस्था! नवरा तिकडे काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना या माऊलीला इकडे अन्न गोड लागेना. ते कष्टात आहे, मग मला सुखाची सय कशी गोड लागणार म्हणून स्वतः तसेच जीवन जगणारी. ‘प्रत्येक खंबीर पुरुषामागे एक खंबीर स्त्री असते’ याचे हे मूर्तिमंत उदाहरण. धाकटी शांताबाई! हिची तर अजूनच मजा. सावरकरांच्याच घरात लग्न करून जाईन म्हणून हट्ट केला. त्या विचारसरणीला, त्या वागण्याला शत शत नमन. थोरल्या दोघी कष्टात असताना आपण आनंदाचे क्षण कसे मोजणार म्हणून त्यांच्याच सहवासात तिने स्वतःला घडवले.



तेव्हा प्लेगची साथ पसरली होती
. ब्रिटिशांचा ससेमिरा, परपुरुषाची सावलीही नको अशा वातावरणात वाढलेल्या स्त्रियांना रोज घराची झडती सहन करावी लागे. आपल्या घरची लाज आणि घरच्यांची सगळी कामे त्यांनी सहज आपल्या आत दडवून ठेवली. इतकेच नाही तर मंदिर, प्रवचने, कीर्तन या नावाखाली समाजातल्या सगळ्या स्त्रियांना एकत्र आणलं. देशसेवेचे बीज प्रत्येक घरात रुजवले. या तिघींचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता आणि दुबळे पणाचे प्रतीकही नाही. स्त्री ही कायम दुबळी म्हणून उपेक्षित राहिली, त्याला हे चोख उत्तर आहे. त्याचबरोबर स्त्रीमुक्तीचे वाहणारे वारे यालासुद्धा सडेतोड उत्तर आहे. स्त्री कायम मुक्तच आहे, फक्त तिला स्वतःला त्याची जाणीव हवी. स्त्रीला शक्तीच्या रुपात पुजले जाते आपल्याकडे! मग या स्त्रीकडे केवळ भोगाची वस्तू म्हणून न बघता, तिला तिच्या कक्षा रुंदवायची संधी प्रत्येक घराने घेऊ दिली पाहिजे. एखादी कलाकृती ही केवळ कलाकृती न उरता त्याचा संदर्भ व्हावा, यासारखे त्याचे चीज नाही. ’त्या तिघी’ याचेच प्रतीक आहे.


मी न अबला

मी न दुबळी

मीच शक्ती

मीच भक्ती

जरी मी नाजूक

जरी मी हळवी

मीच आशा

मीच घडवी

हातात माझ्या

माझीच सत्ता

मीच बदलते

मीच कर्ता

भेटते नव्याने

जुन्याच जागी

माझ्या मनाची

माझीच ग्वाही...



त्या तिघी’चा आज एकपात्री नाट्यप्रयोग


शुभा साठे लिखित
त्या तिघीया कादंबरीवर एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. लेट्स टॉकआयोजित आणि अभिव्यक्त पुणेप्रस्तुत त्या तिघी - स्वातंत्र्यकुडांतील अज्ञात समिधाया एकपात्री नाटकाच्या प्रयोगाचे आज रविवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता विशाखा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे. या एकपात्री नाटकाची संकल्पना, संहिता लेखन व सादरीकरण अपर्णा चोथे यांनी केले असून दिग्दर्शन अजिंक्य भोसले, संगीत अजित विसपुते आणि नेपथ्य व वेशभूषेचे जबाबदारी अश्विनी चोथे-जोशी यांनी सांभाळली आहे. या एकपात्री नाटकासाठी प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.



-सोनाली तेलंग 
@@AUTHORINFO_V1@@