चमत्कारपर्वातील अर्धविराम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |



एक प्रकारे हल्ली सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या लढाईत फडणवीसांनी बॉम्बगोळाच टाकणारे ते वृत्त होते. त्यानंतर सुरु झालेल्या पळापळीतून माध्यान्हीच्या वेळी झालेल्या शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट झाले की, सत्तास्थापनेचे चमत्कारपर्व अद्याप समाप्त झाले नाही. फार तर त्यावर अर्धविरामाचे चिन्ह तेवढे उमटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत यापूर्वी लिहिलेल्या व शनिवारी प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाच्या सुरुवातीचे पहिलेच वाक्य होते, ‘शेवटच्या क्षणी काही चमत्कार घडला तरच, अन्यथा महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार बनण्याची शक्यता कुणालाही नाकारता येणार नाहीहे होते. शनिवारी सकाळी घडलेल्या अतिशय नाट्यमय घटनांनंतर जेव्हा मी लिहायला बसलो, तेव्हा मला वरील (चमत्कारपर्वातील अर्धविराम’) हा मथळाच योग्य वाटला. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार बनू शकते, असे कुणी म्हटले असते, तर त्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार झाले नसते. कारण, जनतेने भाजप-सेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला होता. पण, शरद पवार यांच्या असामान्य मुत्सद्देगिरीमुळे शुक्रवारी सायंकाळी तसे सरकार बनू शकते, यावर जवळपास एकमत झाले होते. इतकेच नाही, तर तथाकथित महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार हेही ठरले होते. पण, शुक्रवारच्या रात्रीपासून अशा काही वेगवान घटना घडत गेल्या की, शनिवारी सकाळी उठणार्‍या लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून समावेश असलेले सरकार स्थापन झाल्याचे वृत्त पाहता आले. एक प्रकारे हल्ली सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या लढाईत फडणवीसांनी बॉम्बगोळाच टाकणारे ते वृत्त होते. त्यानंतर सुरु झालेल्या पळापळीतून माध्यान्हीच्या वेळी झालेल्या शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट झाले की, सत्तास्थापनेचे चमत्कारपर्व अद्याप समाप्त झाले नाही. फार तर त्यावर अर्धविरामाचे चिन्ह तेवढे उमटले आहे.

शनिवारी प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाचा मथळा होता महाराष्ट्रात संधीसाधूंचे सरकार.तो वाचल्यानंतर मुंबईतील एका वाचकाने आता स्थापन झालेले सरकार तसेच नाही का?’ असा प्रश्न विचारला तेव्हा मी क्षणाचाही विलंब न लावता नाहीअसे उत्तर दिले. ते माझे मत आताही कायम आहे. कारण, राजकारणात केव्हाही, काहीही घडू शकते. जशास तसे वागणेही अपरिहार्य असते. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच शस्त्राचा वापर केला व प्राप्त परिस्थितीत तो क्षम्यही ठरु शकतो. पण, सर्वकाही पुढील काही दिवसात घडणार्‍या घटनांवरच अवलंबून आहे.

भाजप व राष्ट्रवादीचे सरकार बनल्याची वार्ता येताच त्यात शरद पवारांचा हात असण्याची शक्यता सर्वांनाच वाटली. कारण, दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीत भेट झाली होती. शिवाय शरद पवार यांच्या संमतीशिवाय अजितदादा पवार हे पाऊल उचलू शकत नाहीत, असा विश्वासही जनमानसात होता. पण, शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध वागतात हा पवारांबद्दलचा अनुभव असल्यामुळे यावेळीही तसेच झाले असावे, असा अंदाज व्यक्त होऊ लागला. मात्र, थोड्याच वेळात अजितदादांच्या निर्णयाला शरदकाकांचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असेही जाहीर झाले. पण, दुपारी साडेबारा वाजता चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही. पवारांनी मात्र अतिशय संयतपणे ही पत्रकार परिषद हाताळली आणि आपल्या बहुमताचा स्पष्ट निर्वाळा देऊन विधानसभेतील शक्तिपरीक्षेत ते स्पष्ट होईल, असा विश्वासही व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनीही त्याला दुजोरा दिला. याचाच अर्थ असा की, रात्रभर घडलेल्या घटना केवळ चमत्कारपर्वाच्या अर्धविरामाचा संकेत तेवढा देतात. कारण, येत्या ३० नोव्हेंबरपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपालांनी दिला आहे.

खरे तर शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर टीकास्त्र सोडणे अपेक्षित होते. पण, कोणत्या वेळी कुणाला लक्ष्य करायचे याचे अचूक भान त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी या पत्रकार परिषदेत केवळ अजितदादांना लक्ष्य केले. त्यांनी पक्षाच्या आमदारांची कशी कथित दिशाभूल केली हे दाखविण्यासाठी डॉ. राजेंद्र शिगणे, संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसारी या तीन आमदारांना पेश केले. दरम्यान अजितदादांना पक्षातून काढण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले. सर्वप्रथम अजितदादांचा समाचार घ्यायचा आणि नंतर पुढचे पाऊल टाकायचे अशी त्यांची ताजी रणनीती दिसते. ती विधानसभेचे अधिवेशन होईपर्यंत तरी कायम राहणार आहे.

या सगळ्या घडामोडी शिवसेना, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या आकलनापलीकडच्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवारांना ममम्हणण्यापलीकडे काही बोलू शकले नाहीत आणि संजय राऊत आपला प्रक्षोभ आवरु शकले नाहीत. या पत्रकार परिषदेतील काँग्रेसची अनुपस्थिती मात्र कथित महाआघाडीचा विकास खुटल्याचा संकेत देऊन गेली. कारण, शरद पवारांच्या रणनीतीबद्दल आधीपासूनच काँग्रेस साशंक होती. आता त्यांचा पुतण्याच काकांच्या विरोधात बंड करु शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आघाडीतून बाहेर पडला तर ते आश्चर्य ठरणार नाही. चमत्कारांच्या या मालिकेत आणखीही काही चमत्कार घडू शकतात व ते विधानसभा अधिवेशनातच पुढे येऊ शकतात अशी स्थिती आता तयार झाली आहे. कारण, राज्यातील राष्ट्रपती राजवट समाप्त झाली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. आता या सरकारला विधानसभेचे अधिवेशन बोलवावे लागेल. त्यात आमदारांचा शपथविधी पार पाडला जाईल व नंतर विधानसभाध्यक्षांची निवड केली जाईल. ती निवडणूक म्हणजेच शक्तिपरीक्षा मानली जाईल. महायुतीचा अध्यक्षपदाचा उमेदवार जर जिंकला, तर वेगळी शक्तिपरीक्षा घेण्याचे कारण राहणार नाही आणि हरला तर कदाचित अन्य कुणाला बहुमत सिद्ध करण्याची संधी तरी दिली जाईल किंवा विधानसभा विसर्जित तरी केली जाईल. प्राप्त परिस्थितीत कुणाही आमदाराला पुन्हा निवडणुकीस तोंड द्यावे लागणार नसल्याने ते सरकार पाडण्यास कितपत मदत करतील, हाही एक प्रश्नच आहे.

शक्तिपरीक्षेत काय घडते ते त्यावेळी कळेलच, पण रात्रीतून घडलेल्या घटनांमुळे एकीकडे शरद पवारांची व दुसरीकडे शिवसेनेची पुरती फजिती झाली, हे मात्र स्पष्ट झाले. विशेषत: शिवसेनेच्या तोंडचा घासच जणू काढला गेला असे चित्र त्यातून तयार झाले. शिवसेनेच्या सत्तालोभामुळे आणि काँग्रेसच्या धांदरटपणामुळे हे शक्य होत आहे असे दिसते.

राजकारण हा अशक्यतांचा खेळ आहे. त्यात फक्त विजय महत्त्वाचा असतो, बाकी सगळे क्षम्य असते, हा विचार आता आपल्याकडे रुढ झाला आहे.

खरे तर आपल्या लोकशाहीत जनादेश मोजण्याचे एकच साधन आहे व ते म्हणजे निवडणुकीत मिळालेल्या जागा. त्या जागांचा मिळालेल्या मतांशी संबंध असतोच असे मात्र नाही. तरीही जागांचा आणि मिळालेल्या मतांचा विचार करता, महायुतीला जनादेश मिळाला, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे महायुतीचे सरकार बनणे हेच स्वाभाविक होते. पण, त्यात मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या वाटणीचा विवाद निर्माण झाला, तो समंजसपणे सोडविण्यात महायुतीला अपयश आले, म्हणून या महाविकास आघाडीचा जन्म झाला होता, ही वस्तुस्थितीही कुणाची इच्छा असो वा नसो मान्यच करावी लागेल. महायुतीतील शिवसेनेने थोडा अधिक समंजसपणा दाखविला असता तर तिचे सरकार बनणे अशक्य नव्हते. पण, तिने पहिल्या दिवसापासूनच चर्चेची दारे बंद करुन टाकली व लगेच पर्यायांचा शोधही सुरु केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा फोन केल्यानंतर तो न उचलणे हे शिवसेनेच्या सौजन्याच्या कोणत्या व्याख्येत बसते, हे कळायला मार्ग नाही. पण, उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी वा पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या फोनची वाट पाहत होते, हे कालच स्वत: उद्धव ठाकरे यांनी मान्य केले. त्यामुळेच भाजपलाही पर्यायी रणनीतीचा वापर करावा लागला. तिचे चटके कुणाला बसतात याची त्याने आता चिंता करण्याचे कारण राहत नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या या नव्या रणनीतीमुळे शिवसेनेची हिंदुत्वाची भाषा किती दिशाभूल करणारी आहे हे स्पष्ट होऊन गेले. सत्तेसाठी सेना हिंदुत्व, राम मंदिर, मराठी माणूस, स्वाभिमान या सर्वांशी फारकत घेऊ शकते. मातोश्रींच्या अवमूल्यनासाठी ती काँग्रेस नेत्यांच्या दारात उभी राहू शकते हे सारे सिद्ध होऊन गेले. आता उद्धव ठाकरे वा संजय राऊत यांनी कितीही त्रागा केला तरी त्यांना ते हिंदुत्व, राम मंदिर, स्वाभिमान परत मिळू शकणार नाही हेच जणू शुक्रवारच्या घटनांनी दाखवून दिले आहे.

-ल. त्र्यं. जोशी

 

@@AUTHORINFO_V1@@