
मुंबई: मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत हात गमावलेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्स राजभरचा आज पहाटे मृत्यू झाला. त्याची प्रकृती गुरुवारी खूप खालावली होती. रक्तदाब खूप कमी झाल्यामुळे, रात्री २.३० वाजता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तो दगावला. गेले दोन आठवडे सुरु असलेला प्रिन्सचा हा जगण्याचा संघर्ष आज थांबला.
ईसीजी मशीनच्या आगीत होरपळला होता प्रिन्स...
चार महिन्याच्या प्रिन्सला हृदयविकारावरील वैद्यकीय उपचारांसाठी परळ मधील केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांदरम्यान ईसीजी यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने प्रिन्स होरपळला होता. ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा अपघात घडला. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी प्रिन्सला ईसीजी यंत्र लावले होते. या यंत्रामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तारांनी पेट घेतला. त्यामुळे प्रिन्सच्या खाटेवरील चादरीलाही आग लागली. यामध्ये त्याच्या खांदा, कान आणि कमरेचा भाग भाजला. आग आटोक्यात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले गेले होते. मात्र भाजल्यामुळे त्याचा हात आणि कान कापावा लागला होता. आणि अशा अवस्थेत प्रिन्सची जगण्याची धडपड सुरु होती.
प्रिन्सला ऑक्सिजनची पातळी अधिक असलेल्या व्हेण्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याची प्रकृती गुरुवारी आणखी खालावली होती. त्याचा कमी झालेला रक्तदाब वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयदोष नियंत्रण करणाऱ्या तीन औषधांनी स्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी दिली होती. मात्र रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने प्रिन्सची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात विद्युत उपकरणांचा सांभाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणात अद्याप दोषी कोण हे जरी सिद्ध झाले नसले, तरी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.