आजपासून रंगणार दिवस-रात्र कसोटीचा नवा अध्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |



मुंबई : भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये शुक्रवार २२ नोव्हेंबरपासून दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. प्रकाशझोतातील आणि गुलाबी चेंडूने खेळली जाणारी भारताची पहिली कसोटी म्हणून या सामन्याला वेगळे महत्त्व आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि अवघ्या महिनाभरातच दादाने दिवस-रात्र कसोटी खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या कसोटीच्या निमित्तानं पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी खेळणार आहेत.

 

दिवस-रात्र कसोटी ही गुलाबी चेंडूवर खेळवली जाते. भारत आणि बांगलादेश पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत असल्याने दोन्ही संघातील फलंदाजांचा कस लागणार आहे. भारतीय संघाच्या चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवला दुलीप करंडकात गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यासोबतच संधीप्रकाश, दव, सरावासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे भारतीय संघासमोरचे आव्हान नक्कीच सोपे नसेल.

 

दरम्यान, भारताने इंदूरच्या मैदानात रंगलेला पहिला कसोटी सामना १ डाव १३० धावांनी जिंकला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कोलकाता येथील सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तर दुसरीकडे बांगलादेश मालिकेत बरोबरीसाठी प्रयत्नात असणार आहे.

 

असा असेल सामना

 

- दुपारी १ वाजता सामन्याला सुरुवात

- पहिलं सत्र : दुपारी १ ते ३

- उपाहाराची वेळ : दुपारी ३ ते ३.४०

- दुसरे सत्र: ३.४० ते ५.४०

- चहापानाची वेळ : संध्याकाळी ५.४० ते ६

- तिसरे सत्र : संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत

@@AUTHORINFO_V1@@