अभद्र आघाडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन राजकीय पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असतानाच, या अभद्र आघाडीला सत्तेचे निमंत्रण देण्यापासून राज्यपालांना रोखण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

 

जे राजकीय पक्ष राज्यात सत्तेसाठी एकत्र आले आहेत, ते निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. त्यांनी सरकार स्थापन केले, तर भाजपा-शिवसेना महायुतीला आपला कौल देणार्‍या जनतेचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे जनकौलाचा अनादर करून स्थापन होत असलेले हे सरकार घटनाबाह्य जाहीर केले जावे, अशी विनंती मुंबईचे रहिवासी सुरेंद्र इंद्रबहादूर सिंह यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

 

महाराष्ट्रातील नागरिकांनी भाजपा-सेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असल्याने, सरकार स्थापन करण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. जनतेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला असताना, ते सरकार कसे स्थापन करू शकतात, अशी विचारणाही याचिकाकर्त्याने केली आहे.

 

विशेष म्हणजे, या तीन पक्षांच्या महाआघाडीला अभद्र संबोधून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे हे पहिले प्रकरण नाही. गेल्या आठवड्यातही अशा प्रकारची याचिका दाखल झालेली आहे. प्रमोद जोशी यांनी ही याचिका दाखल केली होती, तथापि न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

 
 
@@AUTHORINFO_V1@@