अभीष्टचिंतन : यशोगाथा अर्धशतकाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |



व्यक्तीचा अथवा एखाद्या संस्थेचा गौरव तिचे कार्यकर्तृत्व आणि तिचा समाजाला झालेला उपयोग यावर अवलंबून असतो. समाजामध्ये काही व्यक्ती केवळ समाजासाठीच जगतात.

 

आपणांपाशी होतील ज्या ज्या व्यक्ती।

तेणे हा श्रीपती अंलकारू ॥

 

या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार समाजाला बलवान करणे, ज्ञानवान करणे आणि त्यातच आपल्या जीवनाची कृतार्थता मानणे त्यांचे जीवनसूत्र असते. ही समाजकल्याणाची ऊर्मी प्रसंगपरत्वे, कालपरत्वे त्यांच्याठायी जन्म घेते आणि त्यांना विविध आव्हानांशी संघर्ष करण्याची शक्ती देते. जीवनात होणाऱ्या लढायांमध्ये ते विजयी होतात. जनकल्याणाच्या प्रगतीचा वारु अधिक वेगाने दौडू लागतो. याचे श्रेय त्या व्यक्तींना असते.

 

अशीच एक आगळीवेगळी व्यक्ती म्हणजे 'आदर्श शैक्षणिक समूहा'चे अध्यक्ष धनराजजी विसपुते अर्थात दादासाहेब! 'शुद्धबिजा पोटी, फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे धुळ्यातील म्हसदीमधील बापूसाहेबांच्या कुटुंबात २२ नोव्हेंबर, १९६७ ला दादासाहेबांचा जन्म झाला. दरम्यानच्या काळात शिक्षण घेतल्यानंतर २२ वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत त्यांनी नोकरी केली. पण, या काळात सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. दादासाहेब म्हणजे कर्तृत्वसंपन्न, ध्येयनिष्ठ व एक बहुअयामी व्यक्तिमत्त्व! याहीपेक्षा एक साधं, सरळ आणि लाघवी व्यक्तिमत्त्व! परिचयातील प्रत्येकाला आपलीशी वाटणारी व्यक्ती शैक्षणिक विकासाच्या ओढीपायी ११ नोव्हेंबर, २०११ ला त्यांनी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि खडतर परिश्रम व अढळ आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी अवघ्या दोन विद्यार्थ्यांनिशी स्थापना केली आदर्श शैक्षणिक समूहाची आणि सुरू झाला, एक आगळावेगळा यशस्वी प्रवास. अत्यंत उत्साही आणि कार्यतत्पर असणाऱ्या दादासाहेबांचा बोलण्यापेक्षा 'करून दाखवू' या वाक्यावर विश्वास होता. याच विश्वासाच्या बळावर भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आदर्श शैक्षणिक समूहाच्या धुळे, पनवेल-नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक, रत्नागिरी या सात जिल्ह्यांमध्ये ५० शैक्षणिक शाखा स्थापना केल्या, ज्या आज दिमाखात यशाची शिखरे पार करीत आहेत.

 

सामाजिक विकासाच्या ध्येयापोटी दादासाहेबांनी 'आदर्श बालवाडी प्रशिक्षण केंद्रा'चे सर्वप्रथम एक रोपटे लावले. त्यानंतर मातोश्री कमलाबाई विसपुते महिला वसतिगृह बीएड, एमएड, डीएड महाविद्यालय, नर्सिंग, फार्मसी, सिनीअर, प्राथमिक-माध्यमिक विद्यालय आणि फूडलॅब अशा विविध शाखांच्या माध्यमातून या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. पण, केवळ हेच आपले कार्यक्षेत्र नाही, तर याही पुढे जाऊन आपण काहीतरी केले पाहिजे, ही ऊर्मी त्यांना शांत बसू देत नाही आणि म्हणूनच विविध सामाजिक कार्याची ते प्रभावी आखणी करतात. स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, गरजूंना साहित्याचे वाटप, हेल्मेटवारी, कलामहोत्सव, क्रीडामहोत्सव अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे त्यांनी आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण स्वतःच्या सुखाच्या मागे धावत असताना दादासाहेब मात्र गेली ५० वर्षे सामाजिक विकासासाठी धावत आहेत. हीच त्यांच्या अर्धशतकाची यशोगाथा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या ध्यासपर्वाचा विचार करून शासन व सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. दादासाहेब शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, कृषी आदी क्षेत्रांमध्ये रचनात्मक काम करीत असल्याने सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ असलेले कार्यमग्न व्यक्तिमत्त्व आहे. अफाट जनसंपर्क, माणसे जोडण्याची आणि ती टिकवण्याची हातोटी, सर्वसामान्यांमध्ये मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव, समाजाप्रति असणारी संवेदनशीलता, डावपेच नसलेला मोकळाढाकळा स्वभाव, भाषेची व विचाराची शुद्धता, निगर्वी अशा विविध पैलूंनी युक्त असलेल्या दादासाहेबांचे अगदी लाघवी व्यक्तिमत्त्व आहे.

 

५० शैक्षणिक संस्थांचा मालक जेव्हा प्रत्येक कर्मचारी व विद्यार्थ्यांची आपलेपणाने चौकशी करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू आहे. समाजकार्य हे केवळ राजकारणात यश मिळविण्यापुरतेच मर्यादित नाही, तर समाजकार्याच्या विचारांना असलेला मूल्यांचा आधार व हेतू यावर श्रद्धा ठेवून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. दादासाहेबांची कार्यप्रणाली व कार्यविस्तार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच दादासाहेबांचे जीवन म्हणजे एक दीपस्तंभ आहे. आज त्यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यविषयी लिहिताना त्यांची सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती, माणुसकी, कार्यकुशल नेतृत्व, चैतन्यवृत्ती हे सारे पैलू लिलया डोळ्यासमोर आलेे. या यशस्वी अर्धशतकानंतर त्यांचे कार्य असेच सुरू राहील, यात तीळमात्रही शंका नाही. त्यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांना शुभेच्छा...!

 

शब्दांकनः

डॉ. सीमा कांबळे, प्राचार्य

बीएड - एमएड कॉलेज

९९२१७०९२०७

@@AUTHORINFO_V1@@