बोलिव्हियाचा मूळनिवासी सत्तासंघर्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019   
Total Views |



"देशामध्ये मूळनिवासींसोबत खूप भेदभाव होत असे. मी ज्यावेळी शहरातील शाळेमध्ये गेलो, तेव्हा मूळनिवासी रूपावरून मला कुरूप ठरवले गेले. ८०-९० वर्षांपूर्वी ‘आयमरा’ या मूळनिवासी समुदायाच्या लोकांनी शिक्षण घेतले, तर त्यांचे डोळे फोडले जात होते. जे लिहायला शिकत, त्यांची बोटे छाटली जात होती. ५० वर्षांपूर्वी मी शहरातल्या चौकातही जाऊ शकत नव्हतो. इतका वंशभेद देशात होता," असे बोलिव्हियाचे मूळनिवासी आणि तीन वेळा राष्ट्राध्यक्षपद उपभोगलेले एव्हो मोरालेस २००६ साली एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

हे वाचून वर्ण आणि वंशभेदाची गंभीरता जाणवते. पण, आपल्या इथे काही विघातकवृत्तीचे लोक वनवासी बांधवांसाठी ‘मूळनिवासी’ शब्द वापरतात. त्या शब्दाचा आणि दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियाचा दुरान्वयेही संबंध नाही. कारण, बोलिव्हियाचे ४१ टक्के लोक हे बोलिव्हियाचेच मूळ रहिवासी आहेत आणि बाकीचे लोक स्पेन देशाने लादलेल्या पारतंत्र्यामुळे वसलेले. त्यांचा आणि मूळ बोलिव्हियन लोकांचा सांस्कृतिक किंवा भाषिक, वांशिक संबंध नाही.

१५३८ साली स्पेनने दक्षिण अमेरिकेच्या बर्‍याचशा भूभागांवर सत्ता मिळवली. १८२५ साली या देशाला व्हेनेझुएलाचा सैन्यनेता सिमोन बॉलिव्हर यांच्या नेतृत्वाने स्वातंत्र्य मिळाले. सिमोन बॉलिव्हर यांच्या शौर्याची आठवण म्हणून देशाला ‘बोलिव्हिया’ नाव दिले. स्पेनने तेथील पुरातन संस्कृती क्रूरतेने मातीमोल करण्यात धन्यता मानली. पण, तेथील पुरातन संस्कृती जपणारे मूळ रहिवासीमात्र मुळापासून संपले नाहीत. तसेच आजही त्यांच्यासोबतचा भेदभाव संपला नाही हेच दृश्य आहे. १८२५ नंतर इथे ३५ ते ४० वेळा सैन्याच्या हस्तक्षेपाने सत्तांतर झाले. १९व्या शतकात इथे संविधानयुक्त शासन आले. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘मूळनिवासी’चा मुद्दा मांडत एव्हो मोरालेस बोलिव्हियाचे लोकप्रिय नेता बनले. त्यांनी तीनेवळा राष्ट्राध्यक्षपद उपभोगले. मात्र, संविधानानुसार चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी त्यांना मिळू शकत नव्हती. तरीसुद्धा त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकले. मात्र, बोलिव्हियाच्या जनतेला हे पसंत पडले नाही, या विरोधात जनता रस्त्यावर उतरली.

त्यात सैन्यही एव्हो मोरालेस यांच्या समर्थनार्थ नव्हते किंवा अमेरिकाही एव्हो मोरालेस यांच्या बाजूने उभी राहिली नाही. बोलिव्हिया हा खनिज संपत्तीने संपन्न देश. एव्हो मोरालेस यांनी चीनला येथील खनिज संपत्तीमध्ये उद्योगास वाव दिला. यातूनच चीनने प्रत्यक्ष द. अमेरिकेमध्ये चंचुप्रवेश केला. त्यामुळे अमेरिका एव्होवर नाराज आहे, तर सैन्याला भीती आहे की समाजवादाच्या आड साम्राज्यशाहीची मनीषा बाळगणार्‍या चीनला बोलिव्हियात पाय रोवायची संधी देणे, महागात पडू शकते. त्यामुळे सैन्याने एव्होंना राजीनामा द्यायला सांगितला. एव्होंनी राजीनामा दिलाही आणि ते मेक्सिकोमध्ये शरणार्थी म्हणून निघून गेले. त्याचवेळी देशाच्या माजी उपसभापती जेनिनो एनियास यांनी समर्थकांच्या मदतीने स्वत:ला तात्पुरते राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले. मात्र, जेनिनो यांनी २०१३ साली बोलिव्हियाच्या मूळनिवासीबद्दल वक्तव्य केले होते की, "मला बोलिव्हियाला सैतानी आदिवासी प्रथांपासून मुक्त असलेले पाहायचे आहे. शहरं ही आदिवासींसाठी नाहीत, तर त्यांनी त्यांच्या ‘चाको’ (आदिवासींच्या विशिष्ट वसाहती)मध्ये राहावे." त्यामुळे इथे बोलिव्हियाचे मूळनिवासी पुन्हा जेनिनोच्या विरोधात आणि एव्होंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

‘मूळनिवासी विरुद्ध इतर’ हा संघर्ष बोलिव्हियामध्ये रंगला असे दृश्य असले तरी अंतर्गत संघर्ष मात्रअमेरिका विरुद्ध चीन’ असाच आहे. एव्हो यांनी जिथे शरण घेतली, तो मेक्सिको देशही तसा चीनधार्जिणाच. मात्र, याचा जराही विचार न करता बोलिव्हियाच्या जनतेला सध्या ‘कौन बनेगा राष्ट्राध्यक्ष’च्या भूताने झपाटले आहे. बोलिव्हियाचे राष्ट्रगीताचे प्रमुख सार आहे - देश पारतंत्र्यात जाण्याआधी, गुलाम म्हणून जगण्याआधी मृत्यू येऊ दे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूची कामना करणारे बोलिव्हिया आज मात्र देशाच्या एकतेऐवजी नव्याने वर्णवंशभेदाचा चिखल उकरत आहे. याला जेनिनो यांचे वक्तव्य जितके जबाबदार आहे, तितकेच एव्हो यांची भूमिकाही जबाबदार आहे. वाद मूळनिवासी विरुद्ध नंतर स्थायिक होऊन देशाशी एकरूप झालेल्यांचा नाहीच, तर हा जागतिक सत्तासंघर्षाचा एक पैलू आहे, जो ‘मूळनिवासी विरुद्ध इतर’ म्हणून जगभर नाचवला जातो.

@@AUTHORINFO_V1@@