विमानांच्या उड्डाणात घारींचे सर्वाधिक अडथळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |

 


लोणावळा : भारतीय वायुदलासह मुंबईतील 'छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळा'वरून उड्डाण करणार्‍या विमानांना धडकणार्‍या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक संख्या घारींची असल्याची माहिती समोर आली आहे. २०१० ते २०१८ या कालावधीत देशभरात वायुदलाच्या विमानांना ७७ वेळा घारी धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. वरकरणी ही संख्या लहान वाटत असली, तरी यामुळे उड्डाणे रद्द करावे लागल्याने किंवा विमानांमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही यंत्रणांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

 

विमानांना पक्षी धडकण्याच्या घटनेला 'बर्ड हझार्ड' असे म्हटले जाते. 'भारतीय वायुदल' आणि 'नागरी उड्डाण मंत्रालय' सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 'बर्ड हझार्ड' घटनांच्या तपासणीबरोबरच त्याविषयी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी गांर्भीयाने काम करते. वायुदलामध्ये 'बर्ड हझार्ड' या विषयावर काम करण्यासाठी 'पक्षीशास्त्र सेल' आहे. प्रत्येक आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळाची याविषयावरील एक समिती आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) लोणावळ्यात 'मध्य-आशिया हवाईमार्गावरील स्थलांतरित पक्षी आणि पाणथळ जागा' या विषयावर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. बुधवारी पार पडलेल्या या परिषदेच्या तिसर्‍या दिवशी 'बर्ड हझार्ड' या विषयावर चर्चासत्र पार पडले. या सत्रात भारतीय वायुदलाच्या 'पक्षीशास्त्र सेल'ने सादरीकरण केले. यावेळी त्यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार वायुदलात गेल्या आठ वर्षात (२०१० ते २०१८) 'बर्ड हझार्ड'च्या सर्वाधिक घटना घारींमुळे घडल्याचे निदर्शनास आले आहे. यापाठोपाठ गिधाड, गाय बगळा, भिंगरी, पाकोळी, टिटवी, करवानक, कबुतर, चंडोल या पक्ष्यांबरोबर वटवाघुळ या उडणार्‍या सस्तन प्राण्याचा समावेश आहे. जून, २०१९ मध्ये अंबाल येथे वायुदलाच्या विमानाला कबुतरांचा थवा धडकल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

 

 
 

'बर्ड हझार्ड'च्या घटनांमध्ये बर्‍याच वेळा पक्षी विमानाच्या यंत्राला धडकून जमिनीच्या दिशेने फेकला जातो. अशावेळी त्याचे पंख किंवा रक्त यंत्रामधील पात्यांमध्ये आणि आजूबाजूला पसरते. यावरून पक्ष्याच्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी वायुदलाच्या 'पक्षीशास्त्र सेल'ने गेल्या काही वर्षांपासून गुणसूूत्र (डीएनए) चाचणीची शास्त्रीय पद्धत अवलंबल्याची माहिती अधिकार्‍यांनी 'बीएनएचएस'च्या सत्रामध्ये दिली. वायु दलाबरोबरच नागरी उड्डाणासाठी देशातील सर्वात व्यस्थ असणार्‍या मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळालादेखील 'बर्ड हझार्ड'च्या घटनांना समोरे जावे लागते. मुंबई विमानतळावर गेल्या चार वर्षात (२०१५ ते २०१८) 'बर्ड हझार्ड'च्या सर्वाधिक घटना घारींमुळे घडल्याची माहिती 'बीएनएचएस'चे साहाय्यक संचालक राहुल खोत यांनी सत्रामधील सादरीकरणात दिली. मुंबई विमानतळावरील 'बर्ड हझार्ड'च्या घटनांच्या सर्वेक्षणाचे काम 'बीएनएचएस' करते. विमातळावर वाढणार्‍या गवतात आणि वस्त्यांमधून विमातळाच्या सीमेकडील भागात फेकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे पक्षी आकर्षित होत असल्याचे खोत यांनी सांगितले. शिवाय 'नागरी उड्डाण मंत्रालया'च्या नियमानुसार 'बर्ड हझार्ड'ची घटना घडल्यास किंवा तशी शक्यताही वाटल्यास विमानांना पुन्हा उतरविणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अशा घटनांमुळे विमानसेवा कंपन्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे खोत म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@