सरसंघचालकांनी घेतली ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षितांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |



नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी वनवासी कल्याण आश्रमाच्या येथील प्रांत कार्यालयास भेट देऊन कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दीक्षित यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ९२ वर्षीय बाळासाहेब दीक्षित हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे याच कार्यालयात त्यांचा निवास आहे.

 

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आपल्या नियोजित प्रवासानिमित्त बुधवारी रात्री उशिरा नाशिक शहरात दाखल झाले. सरसंघचालकांच्या नाशिक शहरातील विविध बैठका व महत्त्वपूर्ण भेटींना गुरुवार सकाळपासून प्रारंभ झाला. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या येथील प्रांत कार्यालयास भेट दिली. सायंकाळी ५ वाजता त्यांचे कृषिनगरमधील कार्यालयात आगमन झाले. आगमनानंतर त्यांनी सर्वप्रथम संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांची सदिच्छा भेट घेतली.

 

बाळासाहेब दीक्षित यांच्या खोलीत दाखल झाल्यानंतर डॉ. मोहनजी भागवत यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या खोलीतील विविध पुस्तके पाहून या वयातही बाळासाहेबांचे अफाट वाचन पाहून डॉ. भागवत यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी बाळासाहेबांनी सरसंघचालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. सुमारे दहा मिनिटे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बाळासाहेबांसोबत हितगुज केले.

 

ही भेट झाल्यानंतर सरसंघचालकांनी कार्यालयात आलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या विविध कार्यकर्त्यांचा परिचय करून घेतला. यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांच्यासमवेत संघाचे प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, रोहित रिसबूड तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके, क्षेत्र संघटनमंत्री संजय कुलकर्णी, डॉ. बाबुलाल अग्रवाल, प्रा. काका देशमुख, किशोर सूर्यवंशी, संजय शहा, प्रशांत पाटील यांच्यासह कल्याण आश्रम व संघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बाळासाहेबांचे ज्येष्ठ संघ प्रचारक म्हणून योगदान महत्वाचे

९२ वर्षीय बाळासाहेब दीक्षित संघाचे असून ज्येष्ठ प्रचारक असून ६५ पेक्षा अधिक वर्षांपासून ते संघ प्रचारक या नात्याने कार्यरत आहेत. १९७८ साली महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य सुरू झाल्यानंतर या कार्याची सुरुवात व संपूर्ण महाराष्ट्रात या कार्याचा विस्तार करण्यात बाळासाहेब दीक्षित यांचे योगदान खूप मोठे मानले जाते. अनेक वर्षे धाराशिव-लातूर जिल्ह्यातदेखील प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यालयात त्यांचा निवास आहे.






 

@@AUTHORINFO_V1@@