प्रेरणादायी आशा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019   
Total Views |



अदम्य आत्मविश्वास आणि कर्तृत्वाने समाजात स्वत:चे स्थान निर्माण करणार्‍या डॉ. आशा पाटील या एक संवेदनशील, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व... त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

काळ्या कुरूप कुब्जेला श्रीकृष्णाने स्पर्श केला आणि ती सुंदर झाली. एक ना अनेक समाजात स्त्रीसौंदर्याचे मापदंड अनावश्यकपणे बांधलेले. या मापदंडाचे चटके न जाणे कित्येक शतके आणि आजही स्त्री भोगत आली आहे. मानवतावादी असणार्‍या अनेकांना कदाचित हे खोटे वाटत असेल, पण नाही! हे समाजात सर्रास घडते. बहुसंख्य जणी आयुष्यभर आपल्या दिसण्याचे न्यूनगंड बाळगत जगतात. मात्र, त्यातल्या काही या सार्‍या भ्रामक कल्पनांचा भोपळा फोडतात आणि स्वत:च्या कर्तृत्वाचे विश्व निर्माण करतात. या अशा कर्तृत्व सम्राज्ञींचे नाव आठवताना डॉ. आशा रामगोंडा पाटील यांचे नाव घ्यावेच लागेल. मूळ जयसिंगपूर, शिरोळ तालुका कोल्हापूरच्या असलेल्या डॉ. आशा यांनी विज्ञान शाखेतील पदवी, समाजशात्रातील पदव्युत्तर शिक्षण तसेच, अनेक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी बीएड केले असून शैक्षणिक विषयामध्ये ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी संपादित केली आहे. एसएनडीटी विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाजकार्य विभागाच्या त्या प्रभारी संचालक आहेत. तसेच त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यही आहेत. प्रौढ शिक्षण, पर्यावरण सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक संदर्भ आणि कार्यासाठी डॉ. आशा यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये दौरे केले. त्यांना गिर्यारोहणाची आवडही आहे.

जैन समाजातील रामगोंडा पाटील आणि विमल पाटील या सुसंस्कृत आणि पापभिरू दाम्पत्याला चार मुले. त्यापैकी एक आशा. आशा यांना लहानपणापासूनच मैदानी खेळांची आवड. खो-खो, कबड्डी ४०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आणि थाळीफेक या खेळांमध्ये आशा यांना विशेष प्रावीण्य. त्यासाठी त्यांना अनेक पारितोषिकेही मिळाली. पण, आजूबाजूचे सामाजिक वातावरण असे की, घरी आईवडील जरी कौतुक करत असले तरी लोक म्हणायचे, ‘हे चषक आणि ढाली मिळवून तुला काय करायचे? भाकर्‍याच भाजायच्या आहेत.’ आशाच्या घरात सगळेच सुंदर आणि गोरे गोरे पान. त्या पूर्ण खानदानामध्ये आशाच तेवढ्या सावळ्या. सावळ्या रंगामुळे हिणवले जाणे हे त्यांच्या पाचवीला पुजलेले. सावळ्या रंगापुढे त्यांचे कलागुण, त्यांचे शालेय कर्तृत्व फिकेच असे. त्यातच खानदान पाटलांचे. त्यामुळे चौकटी ठरलेल्या. मुलीबाळींनी कसे वागायचे याचे संकेत ठरलेले. या संकेतांमुळे आशा यांच्या बालसुलभ मनावर उठलेला ओरखडा न विसरण्याजोगा. जवळच्या एका नातेवाईकाचे लग्न होते. सगळे लग्नाला गेले. तिसरीत असलेल्या आशांनीही हट्ट केला. मात्र, मुलींनी असे जायचे नसते हा घरात दंडक. तरीही आशा पाहुण्या नातेवाईकांसोबत लग्नाला गेल्या. आल्यावर आजीच्या हातचा खरपूस मार खाल्ला. दुसर्‍या दिवशी उकरड्याजवळ, रणरणत्या उन्हात उपाशी राहण्याची शिक्षा त्यांना मिळाली. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. इतक्यात आई कचरा टाकायला तिथे आली. तिचे डोळे पाण्याने भरलेले. कचरा टाकता टाकताच तिने पदराआड लपवलेली भाजी-भाकरी आशाला दिली.

त्या हे दृश्य कधीही विसरत नाहीत. हे दृश्य बदलायलाच हवे, असे त्यांनी मनात ठरवले. असे सगळे असले तरी आशाला आई-वडिलांनी नेहमीच प्रोत्साहित केले. रामगोंडा हे एका खाजगी कंपनीमध्ये दिवाणजी. पगार नावापुरता. अशा परिस्थितीमध्ये आशा यांना पहिली चप्पल इयत्ता आठवीमध्ये मिळाली. या अशा वातवरणामध्ये आशा यांनी खेळाची आवड जोपासली. जवळ जवळ सगळ्याच मैदानी खेळात त्या अव्वल होत्या. मात्र, ज्यावेळी जिल्हा पातळीवरील स्पर्धेत नामांकन होण्याची वेळ आली, त्यावेळी आशा यांना डावलले गेले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तयारी करणे गरजेचे होते. ज्या व्यक्तीची निवड झाली होती, ती संपन्न आणि उच्चशिक्षित घरातली होती. रंगरूप आणि गरिबी जगण्यात यश मिळवायचे असेल तर यांचाच विचार का व्हावा? पण, जराही न खचता परिस्थितीशी सामना करायलाच हवा, हे त्यांनी ठरवले. त्या दहावी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या घरातल्या दहावी उत्तीर्ण होणार्‍या त्या पहिल्याच व्यक्ती. पुढे त्यांनी विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले. बारावीपासून पदवीधारक होईपर्यंत त्यांना जवळ जवळ १५० स्थळे विवाहासाठी आली. प्रत्येक वेळी साडी नेसून पाटावर बसणे, चालणे, कांदेपोह्यांचा कार्यक्रमही झाला. पण, मुलीच्या रंगावरून टिपणी नोंदवत नकारच पदरी आला. लग्नाच्या बाजारातला हा रंगभेद शेकडोवेळा आशा यांनी अनुभवला. पण, त्यांनी ठरवले दुसर्‍याच्या अज्ञानाने आपली किंमत का ठरवावी? त्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. आपले कलागुण जोपासले. ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली. महाराष्ट्रभर सामाजिक, वैचारिक, वर्तुळात नाव कमावले. आशा यांना रंगाने हिणवणारे लोक आज आशा यांना मानाने सन्मानाने बोलावतात. आशा म्हणतात, “स्त्रियांना हिणवणारे वाईट नसतात. त्यांना त्या प्रकारचे संस्कार मिळालेले असतात. तसेच लहानपणी पचवलेल्या अपमानानेच स्वत:ची ओळख निर्माण करण्याची ऊर्मी मनात निर्माण झाली. आपली शक्ती आपण ओळखायला हवी. मला समाजात असे वातावरण निर्मिती करायची आहे की, जिथे माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून होईल.” महिला बालक आणि तृतीय पंथीयांसाठीही तन-मन-धन अर्पून काम करणार्‍या आशा, नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असतात. तरीही त्यांचे जगणे न्यूनगंडाने पछाडलेल्या कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा देणारे आहे.

@@AUTHORINFO_V1@@