प्रतीक्षा ‘सुंदर नारायणाची’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019   
Total Views |



भारतीय समाजव्यवस्थेत आध्यात्मिक अधिष्ठानाचे अपरंपार महत्त्व आहे. हे आध्यात्मिक अधिष्ठान वृद्धिंगत करण्यासाठी तसेच भारताचा हा अनमोल ठेवा जतन व्हावा, यासाठी विविध मंदिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. नाशिकनगरी ही एक तीर्थक्षेत्र असून येथे असणाऱ्या मंदिरांना स्वतःचा एक इतिहास आहे. त्याचबरोबर शहरातील आणि जिल्ह्यातील बहुतांश मंदिरे ही पुराणकालीन आहेत. त्यामुळे अशा मंदिरांची देखभाल होणे, त्यांची वेळोवेळी डागडुजी होणे आणि हे सर्व करत असताना मंदिराचे पुरातनसौंदर्य तसेच अबाधित राहावे, अशी भाविक व नागरिक यांची अपेक्षा असते. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि भरवस्तीत असणारे रविवार कारंजा परिसरातील ‘सुंदर नारायण मंदिर’देखील त्यातीलच एक. जवळपास सतराव्या शतकात हे मंदिर स्थापित झाल्याचे समजते, तर काही नागरिकांच्या मते, हे मंदिर त्याकाळी उत्खननात सापडल्याचेदेखील सांगितले जाते. एवढ्या मोठ्या कालखंडात बदलणारे पर्यावरणीय वातावरण, विविध प्रकारची नागरी स्थित्यंतरे यामुळे या मंदिराचे भक्कमीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपूर्वी या मंदिराचे पुरातन दगड बदलण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. मात्र, हे काम अखंडितपणे सुरू असल्याचे दिसून येत नाही. कंत्राटदार आणि नागरिक यांच्यातील अनुक्रमे ठरलेले काम आणि अपेक्षा यावरून मतभेत होत असल्याने या कामात वारंवार खंड पडत आहेत. मात्र, असे असले तरी, ‘सुंदर नारायण मंदिर’ ही नाशिकच्या अनेक प्रमुख ओळखींपैकी एक महत्त्वपूर्ण अशी ओळख आहे. त्यामुळे या मंदिराच्या कामाबाबत तातडीने असा कायमस्वरूपी तोडगा काढून काम व्हावे हीच अपेक्षा नाशिककरांची आहे. नुकतेच येथे ‘हरिहर भेट महोत्सव’ पार पडला. अत्यंत चैतन्यमय असणारा हा महोत्सव मंदिराच्या अर्धवट कामाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच मन विषण्ण करणारा असाच वाटला. ‘सुंदर नारायणा’चे सुंदर मंदिर आणि त्या पार्श्वभूमीवर ‘हरिहर भेट’सारख्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन होत असे. हे चित्र आता नाशिककर नागरिकांना नेमके कधी पाहवयास मिळणार याचीच आस लागलेली आहे.

बोलक्या इतिहासाचा सप्ताह

इतिहास म्हणजे सत्याचा प्रकाश’ असा सुविचार प्रचलित आहे. वर्तमानातील घटनांवर प्रकाश टाकत त्याला इतिहासाची जोड दिल्यास भविष्याचा अचूक वेध घेणे शक्य होत असते. त्यामुळे आपला इतिहास हा आपला गौरव असतो. असा समृद्ध इतिहास देशाच्या भावी पिढीला समजावा, नव्हे तो प्रत्यक्ष अनुभवता यावा, पाहता यावा आणि त्या इतिहासतील सामग्रीशी मानसिक जाणिवांच्या स्तरावर संवाद साधता यावा यासाठी नाशिकमध्ये प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाच्यावतीने ‘जागतिक वारसा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा सप्ताह नाशिककर नागरिकांसाठी ‘बोलक्या इतिहासाचा सप्ताह’ ठरला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारवाडा येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककर नागरिकांना शिवाजी महाराज यांच्या काळातील वापरण्यात आलेले होण, शिवरायांनी विविध युद्ध प्रसंगी वापरलेली शस्त्रास्त्रे यांचा दुर्मीळ खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रदर्शनाची विशेषत: ही आहे की, या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे कोणाकडून शिवरायांचे चरित्र, त्यांचे जीवन, त्यांच्या काळातील विविध सामुग्री यांची माहिती घेण्याऐवजी या प्रदर्शनाच्या माधमातून शिवरायांसंबंधी असणारा गौरवशाली इतिहास या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आला आहे. त्यामुळे भावी पिढीचा इतिहासाशी थेट संवाद होण्याचे व्यासपीठ म्हणून हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरत आहे. पुरातत्त्व खात्यामार्फत आयोजित असल्याने प्रदर्शनातील मांडण्यात आलेल्या सामुग्रीची शाश्वातता नक्कीच आहे. या सप्ताहानिमित्त एरवी पुस्तकातच बघावयास मिळणारी नाणी, होन, शिल्प, उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तूंचे प्रदर्शन प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण नाण्याने अभिषेक करण्यात आला होता. ते ‘होन’ नाणेदेखील या प्रदर्शनाचे प्रमुख ठरत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून येथे विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. प्राचीन नाणे अन् शस्त्र याची माहिती घेत असताना विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धनीती अन् त्यात वापरले जाणारे शस्त्र याची माहिती करून घेतली. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रदर्शनांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणारा इतिहास हा निश्चितच बोलका असून अशा प्रयत्नांची गरज आगामी काळ नक्कीच प्रतिपादित करीत आहे.

@@AUTHORINFO_V1@@