काँग्रेस-सेनेचे 'ठरले'?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |




सशर्त पाठिंबा, जिल्हा परिषदांपर्यंत काँग्रेसला सत्तावाटप हवे


मुंबई (राजेश प्रभु साळगांवकर) : महाराष्ट्रात शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर सशर्त परवानगी देण्याची तयारी दाखवली आहे, अशी खात्रीलायक माहिती दै. 'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागली आहे. गांधी कुटुंबीयांच्या जवळच्या नवी दिल्ली येथील एका नेत्याने ही माहिती नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवसेनेला जानेवारी अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असे दिसते आहे.

 

मंगळवारी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी नवी दिल्ली येथे सोनिया गांधींची भेट घेतली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा, ही भूमिका सोनिया गांधींना पटवून देण्यात या नेत्यांना यश आल्याचे नवी दिल्लीतील या नेत्याने सांगितले. मात्र, सोनिया गांधींनी अनेक अटी घातल्या असून त्या शिवसेनेकडून पूर्ण करून घ्या, सर्व गोष्टींचा करार शिवसेनेकडून लिखित घ्या, असे सोनिया यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेले लोकसभेचे अधिवेशन, देशभरात विविध ठिकाणी असलेल्या पोटनिवडणुका, झारखंड विधानसभेची निवडणूक हे सर्व पार पडले की नंतरच शिवसेनेच्या सरकारचा शपथविधी होऊ शकेल, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

 

काँग्रेसला हवा जिल्हा परिषद नगर पंचायतीत सत्तेत वाटा

 

शिवसेनेने हिंदुत्व सोडण्याची दाखवलेली तयारी आणि पटकन केंद्रीय मंत्रिमंडळातून दिलेला राजीनामा यामुळे सोनिया सेनेवर विश्वास ठेवायला तयार झाल्या आहेत, असे कळते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर त्यांचा अजूनही विश्वास नसून राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत सत्ता स्थापन करू शकते, असे त्यांना वाटते. राष्ट्रवादीबाबत हा संशय काँग्रेस आणि शिवसेना दोघांनाही वाटत आहे, हे विशेष. त्यामुळेच सोनिया यांनी काँग्रेस नेत्यांना शिवसेनेशी बोलणी करण्यासाठी पवारांची मध्यस्थी न वापरता थेट ठाकरे यांच्याशी बोलणी करण्यास सांगितले आहे आणि केवळ राज्य सरकारला पाठिंबा देऊन न थांबता, थेट जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींपर्यंत सत्तेची वाटणी करून घ्यावी, त्याचा करारनामा लिखित करून घ्यावा, अशा सूचना राज्यातील नेत्यांना लिखित दिल्या आहेत. या सर्व राजकारणाचा फायदा महाराष्ट्रात राष्ट्रवादीमुळे आणि भाजपच्या झंझावातामुळे खिळखिळी झालेली काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी करावा, असे त्यांनी सांगितले आहे. जानेवारीपर्यंतच्या काळात काँग्रेसच्या ज्या विविध राज्य समित्यांनी आणि प्रकोष्ठांनी शिवसेनेसोबत सरकार बनविण्यास विरोध केला आहे, त्यांची समजूत काढली जाईल. त्याचबरोबर शिवसेनेसोबत सरकार बनविणे कसे आवश्यक आहे, याचे एक 'नरेटिव्ह' राष्ट्रीय पातळीवर तयार केले जाईल.

 

दिल्लीत दोन्ही काँग्रेसची तर मुंबईत शिवसेनेच्या आमदारांची बैठक

 

महाराष्ट्रातील सत्तापेचावर आणि संभाव्य सरकारवर चर्चा करण्यासाठी उद्या बुधवारी दिल्लीत दोन्ही काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यानंतर येत्या शुक्रवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे. शिवसेना आमदारांत आणि शिवसैनिकांत काँग्रेस महाआघाडीत सामील होण्यावरून अस्वस्थता आहे. त्यांची समजूत काढण्याचा उद्धव ठाकरे या बैठकीत प्रयत्न करतील, असे कळते. शिवसेनेमध्ये शरद पवार यांच्याबद्दल अविश्वास कालच्या पवार यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर वाढला आहे. त्यामुळे शिवसेनेनेही काँग्रेससोबत थेट बोलणी करण्याची भूमिका घेतली आहे. पवारांच्या माध्यमातून गेल्यास सोनिया यांची भेट उद्धव घेऊ शकणार नाहीत, असे काही काँग्रेस नेत्यांनी उद्धव यांना सांगितल्याचेही कळते. राज्यात पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री द्यायचा असेल तर राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस अधिक विश्वासार्ह आहे, असे शिवसेना नेतृत्वास वाटत असल्याची चर्चा नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@