मुंबई : केईएम रुग्णालयाच्या ईसीजी यंत्रणेत बिघाड होऊन हात आणि कान भाजलेल्या प्रिन्स राजभर या बालकाच्या पालकांना १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर राजेश मारू याच्या वारसांनाही १० लाख नुकसानभरपाई, अधिष्ठातांच्या साहाय्यासाठी निवृत्त उपअधिष्ठाता, गरिबांसाठी अमृत औषध योजना असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
केईएम रुग्णालयात उपचार चालू असताना प्रिन्स २२ टक्के भाजला आहे. त्यात त्याला संसर्ग झाल्याने त्याचा हात कापावा लागला. कान आणि डोक्याचा भागही भाजला आहे. त्यामुळे त्या मुलाच्या पालकांना पालिकेने तातडीने १० लाख रुपये देण्याची मागणी स्थायी समिती बैठकीपाठोपाठ पालिका सभागृहात सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवकांनी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याच्या पालकांना पाच लाख रुपये देऊ केले होते. त्यांनी ते प्रशासनाकडे परत केले होते.बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत प्रिन्सच्या पालकांना दहा लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून पाच लाख रुपये त्याच्या आई-वडिलांकडे देण्यात येतील, तर पाच लाख रुपये प्रिन्सच्या नावावर ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहेत.
राजेश मारू याच्या वारसानाही १० लाख
नायर रुग्णालयात उपचार घेताना एमआरआय मशीनमध्ये अडकून वर्षभरापूर्वी राजेश मारू याचा मृत्यू झाला होता. त्याच्या वारसानाही १० लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालिका रुग्णालयांमध्ये ‘अमृत औषध योजना’
मुंबईतील महत्त्वाच्या आणि सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये ‘अमृत औषध योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेत ४० टक्के कमी दराने औषधे दिली जातात. देशभरातील एम्सच्या रुग्णालयांमध्ये अशी औषधे पुरविली जातात. जेनेरिक औषधांप्रमाणे ‘अमृत औषध योजना’ आहे. त्याचा गरीब रुग्णांना फायदा होणार आहे.