हा विजयही महत्त्वाचाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2019
Total Views |



बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला
. बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या या एकतर्फी विजयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. बांगलादेशविरुद्धचा हा विजय भारतासाठी फार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण, एकेकाळी दुबळा मानला जाणारा बांगलादेशचा संघ हा आता पहिल्यासारखा राहिला नसून तो सध्याच्या घडीला कडवी झुंज देणार्‍या प्रतिस्पर्ध्यांपैकी एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंदूर येथे झालेल्या कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशने भारताविरोधात उत्कृष्ट कामगिरी केलेली नसली तरी अलीकडच्या काळात बांगलादेशने अनेक एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये भारताला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले आहे. २००७ सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलामीच्या सामन्यातच पराभव स्वीकारावा लागल्याने बाद फेरीही गाठता आली नव्हती. दुबळ्या मानल्या जाणार्‍या बांगलादेशकडूनचा पराभव हा भारतीय संघाच्या जिव्हारी लागण्यासारखा होता. २००७ नंतर २०१२ साली मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपले १०० वे शतक बांगलादेशविरुद्धच ठोकले. भारताच्या दृष्टीने तो सामना ऐतिहासिक होता. मात्र, त्या सामन्यात २८९ धावा केल्यानंतरही बांगलादेशविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता. ऐतिहासिक सामना असूनही भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली होती. इतकेच नव्हे तर २०१५ साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने २-१ असा विजय मिळवत इतिहास रचला होता, तर २०१६ साली झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्येही बांगलादेशने भारताला विजयासाठी मोठा संघर्ष करण्यास भाग पाडले होते. यासोबतच २०१८ साली झालेल्या ‘निढास’ तिरंगी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताला विजयासाठी झुंजवले होते. त्यामुळे हे सर्व कटु प्रसंग पाहता बांगलादेशविरोधातील प्रत्येक विजय भारतासाठी महत्त्वाचा आहे. कसोटी सामन्यातील या विजयामुळे ‘आयसीसी टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिप २०१९-२१’ स्पर्धेत भारताची दावेदारी आणखी प्रबळ झाली आहे.


...ही तर आनंदाची बाब

इंदूर येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयात जलदगती गोलंदाजांचा सर्वात मोठा वाटा राहिला आहे. यासाठी जलदगती गोलंदाजांचे कौतुक करावे तितके कमीच. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय खेळपट्ट्या या मुख्यतः गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात. अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांना अधिक वाव असतो. फलंदाज धावांचा डोंगर उभारतात. गोलंदाजांना मात्र बळींसाठी संघर्ष करावा लागतो. अशा प्रतिकूल खेळपट्ट्यांवर बळी घेणे हे गोलंदाजांसाठी नेहमी आव्हानात्मक असते. भारतीय गोलंदाजांनी इंदूरमधील सामन्यात हे आव्हान योग्यरित्या पेलले आणि प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. यासाठी ते कौतुकास पात्र आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय खेळपट्ट्या जशा फलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात, तशा त्या फिरकी गोलंदाजांसाठीही मदतशील राहिल्याचा इतिहास क्रिकेटविश्वात आहे. फिरकी गोलंदाजांच्या मदतीने भारताने अनेक सामन्यांत विजय मिळविला आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांपुढे खेळणे, हे परदेशांतील खेळाडूंपुढे मोठे आव्हान राहिले आहे. फिरकी गोलंदाजांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघालाही कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी धूळ चारत निर्भेळ यश मिळवले आहे. फिरकी गोलंदाजांवरच भारतीय संघाची मदार असे गणित मानले जायचे. मात्र, इंदूर येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात फिरकी गोलंदाजांपेक्षा जलदगती गोलंदाजांनी अधिक बळी घेतले. या सामन्यात २० पैकी १४ गडी हे वेगवान गोलंदाजांनी तर ६ गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केले. वेगवान गोलंदाजांमुळे मिळालेला हा विजय भारतीय संघासाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे. तेज गोलंदाज ‘फॉर्मात’ येणे ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब असून याचा भारताला आगामी ‘पिंक टेस्ट’ मध्ये फायदा होण्याची चिन्हे वर्तविण्यात येत आहे. अनेक क्रिकेट जाणकारांच्या मते गुलाबी चेंडूच्या सामन्यांतही भारतीय गोलंदाज उत्तम कामगिरी करत भारताला विजय मिळवून देतील. कोलकात्यात होणारी दिवसरात्र कसोटी ही भारतासाठी ऐतिहासिक कसोटी असून या सामन्यात भारताला विजय मिळेल, अशी अपेक्षा तमाम भारतीयांना आहे.

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@