शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी, मच्छीमार मात्र वाऱ्यावर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2019
Total Views |

 

 
 मच्छीमार बांधव हवालदील 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, 'क्यार' व 'महा' चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत अद्याप कोणतेही भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांकडून मिळलेले आर्थिक मदतीसंदर्भातील निवेदन प्रशासनापर्यंत पोचते केले आहे. यावर अजूनही निर्णय झालेला नाही.

 

गेल्या दोन आठवड्यांपासून अरबी समुद्रातील चक्रीवादळांमुळे राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, मच्छीमारांना सहन कराव्या लागलेल्या नुकसानाची भरपाई देण्याबाबत हालचाल झालेली नाही. दहा दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीला धडकलेल्या 'क्यार' चक्रावादळापासून मासेमारी बंद आहे. तसेच आता 'महा' वादळामुळे मच्छीमारांना ४ आॅक्टोबरपर्यत खोल समुद्रात उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीच्या ऐन हंगामात मासे पकडता येत नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे मासेमारीच कमी झाल्याने त्याचा परिणाम मत्स्यउत्पादनाच्या निर्यातीवर पडला आहे.

 
 

लागोपाट आलेल्या दोन वादळांमुळे प्रत्येक मच्छीमाराच्या किमान मासेमारीच्या तीन फेऱ्या वाया गेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मच्छीमाराचे अडीज ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. २४ आॅक्टोबर पासून मासेमारी बंद असली तरी, बोटींवर काम करणाऱ्या खलाशांना (कर्मचारी) पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सिंधुदुर्गचे मच्छीमार अक्षय हरम यांनी सांगितले. राज्याला मत्स्यउत्पादामुळे साडे तीन ते चार हजार कोटी रुपयांचा फायदा होतो. असे असताना कठीण प्रसंगात राज्य शासनाकडून मच्छीमारांचा विचार न होणे दुदैवी असून प्रशासनाने शेतकऱ्यांबरोबरच मच्छीमारांच्या नुकसानीचा आढावा घेऊन आर्थिक मदत देण्याची मागणी नाखवा यांनी केली आहे. मच्छीमारांकडून नुकसान भरपाईच्या बाबतीत प्राप्त झालेल्या निवेदनांना प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिली. मात्र,त्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याची त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मच्छामारांना मदत करण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

 
 

मत्स्यउत्पादनाच्या निर्यातीत घट

वादळाच्या परिणाम मासेमारीवर पडल्याने बंदरावर माशांची आवक कमी झाली आहे. परिणामी त्याचा प्रभाव निर्यात होणाऱ्या मत्स्यउत्पादनावर पडल्याची माहिती सुमद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे राजकुमार नाईक यांनी दिली. माकुळ, बांगडा, तारली या मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या माशांच्या उत्पादनावर परिणाम पडल्याचे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@