टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग ८)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2019
Total Views |






टिळक
-आगरकर यांच्यात सामाजिक प्रश्नांवरून मतभेद होते. यामुळे त्यांचे बिनसले, टिळकांना अशाच कारणांमुळे राजीनामा द्यावा लागला, हे आजवर अनेकांनी सांगितले. परिणामी, या राजीनाम्याबद्दल लोकांच्या मनात भ्रम तसाच राहिला. मूळ साधने तपासून इतिहासाचा सखोल अभ्यास केला तर हे राजीनामा प्रकरण समाजसुधारणेबद्दल असलेल्या वादाच्या फार पलीकडे गेल्याचे आढळते आणि वास्तव समोर येते. टिळक-आगरकरांची मैत्री, भांडणे, शेवटी आलेला कमालीचा कडवटपणा, याबरोबरच महाविद्यालयातील सहकार्‍यांची भांडणे, तात्त्विक वाद यासह अनेक घटनांचा परामर्श टिळकांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने गेल्या सात भागांमध्ये आपण घेतला. राजीनामा प्रकरणाच्या काही आणखी भावनिक, ऐतिहासिक आणि दुर्लक्षित असलेल्या मुद्द्यांचा परामर्श घेणारा हा अखेरचा आठवा भाग...



१८८४च्या सुमारास सोसायटीमध्ये भांडणाला सुरुवात होऊन हळूहळू त्याचे स्वरूप जास्तच गुंतागुंतीचे झाले
. टिळकांना राजीनामा द्यावा लागला. शिक्षणक्षेत्रातील या ११ वर्षांच्या दमदार काळात टिळक सर्वार्थाने अनुभवसंपन्न झाले. माणसांचे बरे-वाईट अनुभव त्यांना आले. तडजोडी करताना सुरुवातीला त्रास झाला, पण तडजोडी कराव्या लागतात याची जाणीवही त्यांना याच काळाने करून दिली. टिळकांच्या पाठोपाठ पाटणकरांनीसुद्धा लगेचच राजीनामा दिला. धारप आणि नामजोशी यांचीही संस्थेत राहण्याची फारशी इच्छा नव्हतीच, पण उपजीविकेचा प्रश्न सोडवण्याचे दुसरे साधन त्यांच्याकडे नसावे. हे दोघे संस्थेत राहिले आणि टिळकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गंगाधर वामन लेले, पुरुषोत्तम रघुनाथ लिमये, धोंडो केशव कर्वे आणि दिनकर त्र्यंबक चांदोरकर यांना संस्थेचे आजीव सदस्यत्व देण्यात आले, तेव्हा सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात आला नाही.



डेक्कन सोसायटीच्या पोटनियमाप्रमाणे सर्वांनी मान्यता देणे गरजेचे असतानाही हे नियम धाब्यावर बसवण्यात येऊ लागले
. टिळकांच्या कार्यकाळात असे एकदाही झाले नव्हते, हे विसरायला नको. टिळकांच्या सोसायटी सोडून जाण्यानंतर आजीव सभासदांच्या निवडीवरून बरेच नियम बदलण्यात आले. त्याला नामजोशी आणि धारपांनी वेळोवेळी विरोध केला. संस्थेच्या मूळ तत्त्वांची सातत्याने आठवण करून दिली. पण, दुर्दैवाने टिळकांच्या नंतर केळकर, धारप आणि नामजोशी यांच्या मताची दखल घेणेही कुणालाही महत्त्वाचे वाटले नाही. असल्या गोष्टीवरील चर्चा म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे, असे त्यांना वाटत होते. उलट आपल्याला हवे तसे निर्णय घेताना विरोधकांचा जाच होऊ नये म्हणून गोखले, आपटे आणि आगरकरांनी पोटनियम आपल्याला हवे तसे बदलून घेतले. मूळ तत्त्वांपासून आपण फारकत घेत आहोत, त्यामुळे असे बदल करणे संस्थेच्या हिताचे नाही असे सांगणारी बरीच पत्रे आली. परंतु, त्यांना मात्र केराची टोपलीच दाखवण्यात आली.



धारपांची प्रकृती अनेकदा बिघडत असे
. आपल्या प्रकृतीमधील या बिघाडामुळे त्यांनी १८९३ साली सोसायटीचा राजीनामा दिला आणि ते निवृत्त झाले. पुढे लगेचच जानेवारी १८९४ मध्ये त्यांचे निधन झाले. या काळातच नामजोशी यांचे नाव आजीव सभासदांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. टिळकांच्या सोबतीने संस्थेचे दुसरे संस्थापक म्हणजे नामजोशी. टिळक संस्था सोडून गेल्यानंतर संस्थेत सर्वात वडील आणि ज्येष्ठ. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी उपस्थित असलेल्या त्रिमूर्तींपैकी आद्य संस्थापक विष्णुशास्त्री केव्हाच परलोकवासी झालेले. टिळक राजीनामा देऊन बाहेर पडले होते आणि आता त्यांच्या सोबत असलेले नामजोशी यांना मात्र काढून टाकण्यात आले होते. ज्या तिघांनी संस्थेची सुरुवात केली, त्या तिघांचाही संबंध आता संस्थेपासून कायमचा संपला होता. टिळक आणि इतर सदस्य संस्थेच्या बाहेर गेल्याने आगरकर, गोखले, आपटे यांना दु:ख होण्याऐवजी हवे तसे करण्याची सर्वार्थाने मोकळीक मिळाली. संस्था पूर्णपणे नव्या सभासदांच्या ताब्यात गेली.



गेली अनेक वर्षे सोसायटीच्या सभासदांमध्ये जी अंतर्गत धुसफूस सुरू होती
, तिच्याबद्दल जाहीररित्या बोलण्याचे प्रसंग टिळकांवर अनेकदा आले. पण, टिळक त्यावर लिहिणे, बोलणे टाळत असेच दिसते. टिळकांनी जो राजीनामा डेक्कन सोसायटीला दिला, त्या व्यतिरिक्त त्यांनी आणखी एक राजीनामा लिहिला होता, असेही म्हणतात. त्या राजीनाम्याला मात्र कधी त्यांनी प्रसिद्धी दिली नाही. सोसायटीच्या प्रश्नाबद्दल असो किंवा एखादा सामाजिक प्रश्न असो, गोखले आणि आगरकर कसलीही पर्वा न करता उघडपणे टिळकांना बोलत. पण, टिळकांनी त्याचे भांडवल करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आतल्या आत टिळकांचा संताप होई, त्यांची प्रतिक्रिया कधी त्यांच्या वागण्यातून उमटेसुद्धा. पण, सोसायटीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येईल असे वर्तन त्यांनी कधीही घडू दिले नाही. राजीनाम्याच्या पूर्वीही टिळक जाहीररित्या काही बोलले नाहीत आणि राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी यावर फारसे वाद माजवले नाहीत. पण, सोसायटीबद्दल टिळकांना वाटत असलेली माया, कधीही सरली नाही. पुण्यात सोसायटीशी संबंधित एक प्रकरण घडून गेल्यानंतर २१ ऑक्टोबर, १८९१च्या ‘केसरी’त टिळकांनी लिहिले, “आज ११ वर्षे जी संस्था इतक्या थाटाने आमच्या शहरात चालली आहे, तिच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये उत्पन्न होणे चांगले नाही व त्याबद्दल दोन्ही पक्षांनी आपल्याकडून होईल तितकी खबरदारी घेतली पाहिजे. न्यू इंग्लिश स्कूलाची वाढ अद्याप पुरी झाली नाही. फर्ग्युसन कॉलेज पूर्ण होऊन स्कूल व कॉलेज दोघांसही बोर्डिंगे अद्याप जोडावयाची आहेत. या गोष्टी सिद्ध होण्यास लोकांचा शाळेवरील भरवसा कायम राहिला पाहिजे.”



१८९३ साली न्यू इंग्लिश स्कूलमधून १७
शिक्षकांना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि पुण्यातल्या बहुतांश वृत्तपत्रांनी यावर टीका केली. टिळकांच्या ‘केसरी’ने मात्र यावर फारशी टीका न करता मौन बाळगले. सामोपचाराच्या भाषेत टिळकांनी लिहिले, “अजून हा तंटा शिक्षक व सुप्रीटेन्डंट यांजमध्ये आहे. त्याचा शाळेच्या सर्व चालकांशी संबंध आणून जोडणे रास्त होणार नाही. एका ग्रामस्थ बंधूने म्हटल्याप्रमाणे पूर्वाश्रमीचा ओढा अजून आम्हास या शाळेकडे ओढीत असल्यामुळे आम्ही या दोन पक्षांना अप्रिय पण पथ्यकर उपदेश केला आहे. कसेही करून आपसात तडजोड करावी यातच दोन्ही पक्षांची शोभा व लोकांचा आनंद आहे.” धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहाबद्दल आगरकरांनी टिळकांना बरेच टोमणे मारले होते. त्यावर १४ मार्च, १८९३च्या ‘केसरी’त टिळकांनी लिहिले, “आमचे प्रिय बंधू ‘सुधारककार’ यांस ‘केसरी’ची व विशेषतः टिळक यांची एकदा बोलणे फोल झाले, असे गाण्याचा प्रसंग आला असूनही अद्याप काहीतरी कुरापत काढावीशी वाटते हे पाहून आम्हास आश्चर्य व दु:ख होते. ‘केसरी’च्या एडिटरास सुबुद्धपणे आग्रही ठरवून फर्ग्युसन कॉलेजात गणिताची बिनवारस झालेली खुर्ची रा. रा. कर्वे यांनी चालवली, असाही ‘सुधारककारां’नी उल्लेख केला आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या गणिताच्या खुर्चीस कशामुळे वैधव्य प्राप्त झाले व रा. रा. कर्वे यांस त्या खुर्चीशी कशाकरिता पुनर्विवाह करावा लागला, याची हकिकत ‘सुधारक’च्या विद्वान पण असभ्य एडिटरास व त्याच्या काही सद्व्यसनी साथीदारांस पूर्णपणे माहीत आहे. ती येथे देऊन आम्ही पुण्यातील एका उपयुक्त संस्थेबद्दल लोकांचा इतक्यात वाईट ग्रह करू इच्छित नाही. मग आमच्या बंधूनी हलकटपणा करण्याचा असाच ग्रह धरल्यास कदाचित त्याचा थोडासा तरी खुलासा करणे आम्हास भाग पडेल.”



पुढील काळात १८९५ साली वर्ष प्रतिपदेच्या दिवशी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा जो समारंभ झाला
, त्यातील मुख्य भाषणात गोखले संस्थेच्या वाटचालीबद्दल बोलले. परंतु, संस्थेच्या स्थापनेबद्दल बोलताना, ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि दोघे गृहस्थ यांनी संस्था स्थापन केली,’ असं म्हणत टिळक आणि नामजोशी यांचा उल्लेख टाळला. या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ६० हजार रुपये नामजोशींनी स्वतः धडपड करून मिळवले होते. साठ हजार म्हणजे थोडीथोडकी रक्कम नव्हती, त्या काळात इमारतीच्या बांधकामाचा अर्धा खर्च या रकमेनेच भागला. याकडेही गोखल्यांनी दुर्लक्ष केले. नामजोशींचा उल्लेखही त्यांच्या भाषणात नव्हता. टिळकांनी यावर टीकात्मक भूमिकातून काहीही लिहिले नाही. २ एप्रिल, १८९५च्या ‘केसरी’त टिळक लिहितात, “या वादात आम्ही पडू इच्छित नाही. फर्ग्युसन कॉलेजचा कधीतरी समग्र इतिहास लिहिण्याचा प्रसंग आल्यास, त्यात आजपर्यंत लोकांना न समजलेल्या बर्‍याच गोष्टी घालाव्या लागतील. कॉलेजची इमारत उघडण्याच्या समारंभाच्या वेळी किंवा त्याची हकिकत देतेवेळी वादग्रस्त विषय पुढे आणू नयेत, असे जे गव्हर्नर साहेबांनी म्हटले आहे, तेच आम्हासही ग्राह्य आहे.” टिळकांनी हेही लेखन बरेच संयमाने केले आहे असेच जाणवते.



टिळकांना सोसायटीविषयी किती आपुलकी आणि जिव्हाळा वाटत होता
, याचे कित्येक संदर्भ ‘केसरी’- ‘मराठा’च्या अंकात विखुरलेले आहेत. संपूर्ण अंक वाचायचे ठरवले तर आजही ते सापडतील. ज्या सहकार्‍यांच्या साथीने आपल्या जन्मभरासाठी उराशी बाळगलेल्या ध्येयाच्या पूर्ततेची स्वप्ने टिळकांनी पाहिली, त्याच लोकांसोबत कटू प्रसंगांना टिळकांना सामोरे जावे लागले. भांडणे झाली, वाद झाले, अखेर शैक्षणिक कारकिर्दीपुरता टिळकांना या सार्‍यांचा निरोप घ्यावा लागला. परंतु, मनात कटू भाव टिळकांनी कधीही ठेवले नाहीत. नंतरच्या काळात सोसायटीमधील एकेका सहकार्‍याचे मृत्यू टिळकांना अनुभवावे लागले. डेक्कन सोसायटीतल्या आपल्या एकेकाळच्या या सुहृदांबद्दल लिहिताना टिळकांच्या लेखणीच्या अश्रूंचे बांध फुटले, कित्येक आठवणी त्यांच्या लेखणीतून पुन्हा जीवंत झाल्या, त्यांना लिहाव्या लागलेला एकेक मृत्युलेख त्यांनी काळजावर मोठा दगड ठेवून लिहिला आहे की काय, असे आजही वाचतांना जाणवते. एरवी टिळकांच्या कठोर स्वभावाविषयी वाचलेली, ऐकलेली सगळी वर्णने त्यांचे हे मृत्युलेख वाचल्यावर फोल आहेत की काय, असे वाटल्यावाचून राहत नाही. अतिशय मृदू आणि कोमल भावनांचा एक उत्कट आविष्कार या लेखनात जाणवतो. कितीही भांडणे झाली, वाद जुंपले, खडाजंगी झाली तरी एकत्र एका ध्येयाने घालवलेले ते तारुण्याचे दिवस, त्या दिवसांच्या आठवणी टिळकांना अस्वस्थ करून गेल्या हे मात्र नक्की. बेचैन अवस्थेत त्यांनी हे लेखन केले. आगरकरांचा मृत्युलेख लिहिताना टिळकांमधला वज्रपुरुष एकाएकी ढासळला, कोसळला.



त्यांनी खुद्द कबुली दिली
, “...त्यांचा व ‘केसरी’च्या एडिटरचा जो निकटचा संबंध जडला होता, त्यामुळे त्यांचा मृत्युलेख लिहिण्याचे दुर्घट काम ‘केसरी’च्या हातून कसे काय निभावेल याची ‘केसरी’स बरीच शंका वाटत आहे. आपल्या आयुष्यातील उमेदीची पहिली १०-१२ वर्षे आपले इष्ट हेतू तडिस नेण्याकरिता केवळ आपण आरंभिलेल्या कार्यापासून होणार्‍या परिणामावर नजर देऊन दुसर्‍या कोणत्याही गोष्टींकडे व संकटांकडे लक्ष न देता खर्ची केली, त्यापैकी एकास अकाली मृत्यूने ओढून नेल्यामुळे दुसर्‍याचे मन विषाद आणि दु:ख यांनी भरून अगदी वेडावून जाणे स्वाभाविक आहे. पण, त्याहून अधिक दु:खकारक गोष्ट ही होय की, ज्या महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याचा प्रि. आगरकरांनी व आम्ही निश्चय केला होता, त्यांच्यापुढे ही दुःखाची कहाणी सांगण्याचा आमच्यावर अकल्पित प्रसंग यावा! पहिल्यापासून एक उद्देश मनात ठेवून तो सिद्धीस नेण्याच्या साधनांचा विचार करण्यात व ती प्राप्त करून घेण्यात, कित्येक वर्ष एकमेकांस जी सुखदु:खे अनुभवावी लागली, त्यांच्या पुन्हा पुन्हा स्मरणाने आमचे चित्त अगदी उदास व अस्वस्थ होऊन आयुष्याची अशाश्वतता आमच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहत आहे!” सोसायटीमधील सहकार्‍यांसोबत आत्यंतिक मतभेद असूनही त्यांच्या यशाचे, बुद्धिमत्तेचे कौतुक टिळकांनी मुक्तकंठाने केले, तर संस्थेच्या मूळ हेतूंना दूषणे लागतील असे काही घडले तर वेळोवेळी सावधपणाच्या सूचना द्यायलाही टिळक विसरले नाहीत. टिळकांनी लिहिलेला एकेक मृत्युलेख खास वाचनीय आहे, त्यांच्या भावनांचे अस्सल रूप प्रगट करणारा आहे.



‘मृदूनि कुसुमादपि’ असा एक नवा ‘टिळक’ दाखवणारा आहे. डेक्कन सोसायटीची ओढ दाखवणारा आहे.
गेली ११ वर्ष या शिक्षणसंस्थेच्या वास्तूने ध्येयवादी तरुणांनी घेतलेल्या शपथा मोठ्या कौतुकाने मनात साठवून ठेवल्या होत्या. मात्र, काही काळातच गोल पगडीधारकांची विद्वत्तापूर्ण भांडणेही याच इमारतीला बघावी लागली. हे आवेश पाहून सोसायटीची वास्तू शहारली, तिलाही हादरे बसले. स्वतःच्या तत्त्वांसाठी सर्वशक्ती पणाला लावणारी अशी तत्त्वनिष्ठ माणसे आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाहीत याची चाहूल त्या इमारतीलाही लागली असावी का? पण, अखेरीस टिळकांना निरोप घ्यावा लागलाच. डेक्कन सोसायटीसोबतचा टिळकांचा संबंध कायमचा संपला. आता मात्र खर्‍या अर्थाने ‘टिळक पर्वा’ची सुरुवात झाली.



-पार्थ बावस्कर
@@AUTHORINFO_V1@@