सदा मयेकर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2019
Total Views |




ज्या वयात मुले भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ हेदेखील नीट शिकलेली नसतात, त्या वयात या चिमुरडीला भलताच काळाचा घाव सहन करायला लागणार होता.



सवयीने म्हणा किंवा स्वभावाने मी आमच्या चाळीतल्या मयेकरांच्या दारात उभा होतो
. सदा माझा लहानपणापासूनचा मित्र. शाळेतला ‘सदोबा’ हा एका शब्दात सांगायचा झाला तर ’खुशालचेंडू.’ सदाने कधी कोणाची भीड बाळगली नाही ना कोणाच्या म्हणण्याला कधी भीक घातली. त्याचा हा खुशालचेंडूपणा त्याच्या शारीरिक ठेवणीतसुद्धा चांगलाच उतरला होता. आता ’टग्या’ ही पुढची पायरी होती आणि ती तो गाठणार इतक्यात सदाच्या घरात काळ कोपला. तो असा कोपला की सदाचे आई-अण्णा दोघेही त्याने हिरावून नेले. मागे ठेवली ती पाच-सहा वर्षांची लहान बहीण. ज्या वयात मुले भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ हेदेखील नीट शिकलेली नसतात, त्या वयात या चिमुरडीला भलताच काळाचा घाव सहन करायला लागणार होता.



पण
‘सदोबा’चा ‘सदाभाऊ’ कधी झाला हे कोणालाच कळलं नाही. कदाचित गेलेल्या काळाने जाता जाता दिलेलं एक वरदान असावं. सदानं सगळंच अगदी छान निभवलं. स्वतः शिकला. शिकता शिकता नोकरी केली. लहान बहिणीलासुद्धा शिकवलं. हे सगळं करत असताना तो आई-बाप आणि भाऊ हे सगळेच ‘रोल’ अगदी लिलयेने ‘प्ले’ करत होता. आज मात्र त्याच्याकडे पाहून तो एखादी कैफियत मांडणार हे जोखायला काही दैवीशक्ती वगैरेची आवश्यकता नव्हती. ’‘काय म्हणतोस. बस चहा घेऊ थोडा.” त्याचा तो आर्त स्वर मला नाकारता आला नाही. मी बसलो. आत जाऊन त्याने चहा करून आणला. आपला कप हातातच धरून तो चहा प्यायचा आहे हे विसरून बोलू लागला. “चिमणेला बघायला उद्या स्थळ यायचं आहे. चांगलं मोठं प्रस्थ आहे. माणसंही चांगली आहेत. मुलालाही फोटो आवडलाय.” ’‘अरे, बेस्टच झालं की मग,” मी उद्गारलो. त्यावर काकुळतीनं तो बोलता झाला. “अरे छानच आहे रे.



तिच्या आयुष्याचं सोनच होईल
. आई-अण्णादेखील जिथे असतील तिथे सुखावतील.” ’‘अरे, मग झालं तरी काय तुला असा गळा काढायला?” मी आपला उगीच थोडासा हलका सूर पकडला. “खरं सांगू का रे... आई-अण्णा गेले आणि सदा कोण हे माझा मीच विसरलो. समोर होती लहान बहीण आणि मागे अप्रिय भूतकाळ. आयुष्यात एकच ध्येय ठेवून जगलो. चिमणेच्या आयुष्याचं भलं करायचं. काळाच्या घावाने झालेल्या जखमेची झळ तिला पोहोचवायची नाही. तसं करण्यात यशस्वी झालोही. पण, आता वाटतं यापुढे जगावं तरी कोणाकडे बघून. स्वतः साठी जगणं मी केव्हाच विसरलोय रे. चिमणेचं लग्न होणार या आनंदावर त्यापुढे माझं काय होणार, याच्या अंधाराने पार विरजण टाकलंय बघ.” एवढं बोलून तो एकटक शून्यात बघू लागला. तो तसा बघतोच इतक्यात त्याची लहान बहीण खालून आली आणि जोरात ’दादा!’ असं म्हणत तिनं त्याला मिठी मारली. लग्न या विचारानेच ती भारावून गेली होती. सदानेउसना आनंद चेहरावर आणत वेळ निभावून नेली.



पण येणारा काळ तो कसा निभावून नेणार होता हा एक मोठा प्रश्नच होता
. जितका त्याचासाठी होता तितका माझ्यासाठी. ही अशी लोकं मी अनेक वेळा पाहिली होती. दुसर्‍यांसाठी जगणारी, अख्ख आयुष्य त्यासाठी पणाला लावणारी, बहुतेकांच्या हाती शेवटी निराशाच येते. वैफल्य येतं. वाटतं आपलं स्वतःसाठी जगायचंच राहून गेलं. स्वतःसाठीजगणं आणि स्वार्थीपणाने जगणं यात एक ’फाईन लाईन’ असते. ती ज्याने ओळखली त्याला स्वानंदाची गुरुकिल्ली सापडलीच म्हणून समजा!




-डॉ. अमेय देसाई
@@AUTHORINFO_V1@@