माहितीच्या सुरक्षेसाठी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत साधने बनवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2019   
Total Views |






देशातील सर्वच विद्वानांना एकत्र करून मग ते आयआयटी असो किंवा इतर तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने देशाची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम
, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसुद्धा भारतात बनवण्याचे लक्ष्य ठेवून, ते जितक्या लवकर साध्य करता येईल तितका प्रयत्न करावा; अन्यथा नव्या युगातील माहितीयुद्धात किंवा ‘इन्फॉर्मेशन वॉर’मध्ये भारत नक्कीच मागे पडू शकतो.


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ११ आणि १२ ऑक्टोबरला भारताला भेट दिली होती. त्यावेळी एक दृश्य माध्यमांतून सातत्याने पाहायला मिळाले. त्यामध्ये असे दिसून आले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष ज्या गाडीमधून आले ती गाडी रणगाड्यासारखी दिसत होती. त्या गाडीविषयी कोणाकडेही फारशी माहिती उपलब्ध नव्हती. नंतर असे कळले की, ती गाडी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरिता खास चीनमधून विमानातून आणली होती. काहींना वाटले की, ही बुलेटप्रुफ गाडी असावी. अर्थात, इतक्या लांब चीनमधून बुलेटप्रुफ गाडी आणणे, हे काही फारसे हुशारीचे लक्षण खचितच नाही. त्यानंतर असे कळले की, या गाडीमध्ये प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साधने लावली होती, ज्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे इतर सहकारी हे काय बोलतात हे कोणालाही ऐकता आले नसते. त्यांचे बोलणे ‘इंटरसेप्ट’ करता आले नसते. त्यांचे सहकार्‍यांशी कुठल्याही प्रकारचे संभाषण हे कोणत्याही प्रकारच्या टेहळणी, ‘सर्व्हिलन्स सिस्टीम’मधून टेहळता आले नसते. जेव्हा राष्ट्राध्यक्षांसारखी महत्त्वाची व्यक्ती काही बोलते तेव्हा त्यात गोपनीयता पाळण्याची नितांत आवश्यकता असल्याची जाण चीन प्रशासनाला आहे. त्यामुळेच भारताने देऊ केलेली गाडी वापरण्यास नकार दर्शवत चीनच्या राष्ट्राध्यक्षांसाठी थेट चीनमधूनच गाडी मागवण्यात आली होती. म्हणजे राष्ट्राध्यक्षांची माहिती इतरांपासून लपवण्यासाठी हे सर्व प्रयत्न होते.



माहितीची सुरक्षा



चीनला माहितीच्या सुरक्षेचे किती महत्त्व वाटते
, हे यावरून लक्षात येते. आज चीनमध्ये त्यांचे स्वतःचे ‘सर्च इंजिन’ आहे. कारण, सोशल मीडियामुळे किंवा कॉम्प्युटरमधील सर्च इंजिनमुळे वापरकर्त्याची माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो. भारतात मात्र ‘गुगल’ आणि इतर सर्च इंजिन्स वापरतात. त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती परदेशात जाते. आपल्या कॉम्प्युटरवरही इतर देशातील ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ परदेशी असल्याने आपली माहिती सर्रास परदेशात जाते. अनेक सॉफ्टवेअर, अ‍ॅप्स परदेशातून आल्याने देशातील माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतिन यांनी असे म्हटले होते की, प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी माहिती हे सर्वात मोठे हत्यार असेल. त्यामुळे कुठलाही देश, कुठलीही महत्त्वाची व्यक्ती, महत्त्वाची संस्था नेमके काय करणार आहे, याची माहिती काढून त्यांनी काही करण्याआधीच आपण त्यांच्या विरुद्ध मानसिक युद्ध किंवा माहिती युद्ध पुकारू शकतो. आज चीनमध्ये कुठल्याही परदेशी सोशल मीडियाला परवानगी नाही. आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर किंवा युट्युब ही कोणतीही माध्यमे चीनमध्ये नाहीत, तर त्यांनी स्वतःची सोशल मीडिया साधने विकसित केली आहेत.



माहितीच्या सुरक्षेसाठी
मेक इन इंडिया’अंतर्गत सगळे काही



त्यामुळे एक सावध देश म्हणून माहितीच्या सुरक्षेसाठी
मेक इन इंडियाअंतर्गत माहिती व्यवस्था किंवा सर्च इंजिन्स भारताला बनवावी लागतील. कॉम्प्युटर करताही आपण स्वदेशी म्हणजे ‘भारत ऑपरेटिंग सिस्टीम’ बनवली पाहिजे आणि मायक्रोसॉफ्टचा वापर टाळला पाहिजे. सोशल मीडियावर वापरली जाणारी सर्च इंजिन्सही भारतीय बनावटीची असली पाहिजे. सोशल मीडियावर असलेली माहिती आणि त्यांचे सर्व्हर हे भारतात असले पाहिजे. सरकारी माहिती जिथे वापरली जाते त्या सर्व ठिकाणची सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, तिथे असलेली अ‍ॅप्स, सर्व्हर या सर्व गोष्टी भारतीय बनावटीची असली पाहिजे, तरच आपली माहिती देशामध्ये राहील आणि माहितीची सुरक्षितता जपता येईल. आपल्या देशाने असे नियोजन केले पाहिजे की, पुढील काही वर्षांत भारताची स्वतःची ‘भारत ऑपरेटिंग सिस्टीम’ तयार केली पाहिजे. सगळ्या क्षेत्रात आर्थिक, संरक्षण आणि इतर असो, त्यामध्ये आपली ऑपरेटिंग सिस्टीम वापरली तर आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतो. याशिवाय आपण कॉम्प्टर, मोबाईलमध्ये वापरले जाणारे स्विचेस किंवा हार्डवेअरही भारतात बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून माहितीची चोरी थांबवणे शक्य होईल.



माहितीच्या सुरक्षेसाठी
मेक इन इंडिया’ अंतर्गत साधने बनवा



काही दिवसांपूर्वी एक चिनी मासेमारी करणारा ट्रॉलर भारताच्या समुद्र हद्दीत अलिबाग जवळ आढळला होता
. अर्थात, हा ट्रॉलर काही मासेमारीकरिता आला नव्हता, पण तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर काही माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळेच आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या टेहळणी करणार्‍या बोटी, विमाने किंवा उपग्रह यांच्यावर काय कारवाई करता येईल, याचा विचार करावा लागेल.



सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदार नागरिक



आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आणि खूप स्वस्त दरात मिळत असणार्‍या इंटरनेट सेवेमुळे समाज माध्यमे आज एक मोठी ताकद झाली आहेत
. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे, समाजमध्यमांवर वाटेल तशा प्रतिक्रिया द्यायच्या. देशाच्या पंतप्रधानापासून कुणालाही वाटेल ते बोलायचे. आरोप करायचे, देशद्रोही प्रचार करायचा, ट्रोल करायचे असे वातावरण सध्या निर्माण होत आहे. अनेकदा अपप्रचार, बदनामीकरक मजकूर पसरवला जातो. रोज आपल्या फोनवर, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर या अनेक माध्यमातून नवनव्या संदेशाचा मारा होत असतो. आता सर्वोच्च न्यायालयानेही या माध्यमांच्या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिलेले आहेत.



सुजाण नागरिकांनी एकत्र यावे



जगभरात सध्या माहितीयुद्धामुळे विशेषतः समाज माध्यमांतून माहिताचा जगात प्रसार होतो आहे
. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण होत असून काय खरे आणि काय खोटे, हे कळण्यास मार्ग राहिला नाही. ज्यांना या माहितीयुद्धाचा अतित्रास होऊ लागला, असे नागरिक समाज माध्यमांना काही दिवस सुटी देण्याचा निर्णय घेतात. समाज माध्यमांवर सर्व भारतीय नागरिक येऊ शकत नाहीत. कारण, अनेकांकडे त्यासाठीची सुविधाच नाही. काहीजण इतके सक्रिय आहेत की, त्यांना त्याशिवाय काही काम आहे की नाही, असा प्रश्न पडतो. आज सोशल मीडियामुळे अनेक गोष्टींचा प्रसार सहजपणे होतो आहे. त्यावर काही चळवळीही जन्म घेत आहेत आणि व्यवस्थेच्या विरोधात जनमत संघटित करण्याची क्षमताही त्यात आहे. मात्र, ही दुधारी तलवार आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर काही गंभीर बाबींमुळे कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर या बँकेत खाते असणार्‍या नागरिकांना होणारा त्रास समजता येतो. पण, भारतातील बँकिंग व्यवस्थेवर सोशल मीडियावर जी चर्चा सुरू झाली, त्यामुळे बँकिंग व्यवस्थेविषयी नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यासंबंधी अफवा सुरू झाल्या आणि भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत आहे, तिला काहीही धोका नाही, असा खुलासा रिझर्व्ह बँकेला करावा लागला. काही बँकांच्या संदर्भात अशीच मोहीम काही नागरिकांनी चालविल्यामुळे त्या बँकांवर जाहीर खुलाशाची वेळ आली. या संकटासाठीही सुजाण नागरिकांना एकत्र यावे लागेल. ते सुजाण नागरिक आपणच आहोत, असे मानून अशा फॉरवर्डला तर आपण आपल्यापुरते रोखू शकतो. त्यातच सर्वांचे हित आहे.



काय करावे
?



कोणत्याही देशाची महत्त्वाची माहिती चोरण्याकरिता विविध पद्धतीने प्रयत्न सुरू असतात
. त्यासाठी नव्या नव्या पद्धती वापरल्या जातात, त्या कोणत्या नव्या पद्धती आहेत, त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यावर आपले प्रत्युत्तर एका निश्चित कालावधीमध्येच आपण द्यायला पाहिजे, तर आपल्या देशातील महत्त्वाच्या माहितीचे संरक्षण करू शकतो, नाहीतर आपली माहिती शत्रुदेशांकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. त्या माहितीच्या उपयोगातून शत्रुदेश ‘सायबर वॉर’ करून आपल्याला प्रत्यक्ष युद्धाआधी पराभूत करतील. देशातील सर्वच विद्वानांना एकत्र करून मग ते आयआयटी असो किंवा इतर तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने देशाची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसुद्धा भारतात बनवण्याचे लक्ष्य ठेवून, ते जितक्या लवकर साध्य करता येईल तितका प्रयत्न करावा ; अन्यथा नव्या युगातील माहितीयुद्धात किंवा ‘इन्फॉर्मेशन वॉर’मध्ये भारत नक्कीच मागे पडू शकतो.

@@AUTHORINFO_V1@@