गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थांची जबाबदारी महत्त्वाची : डॉ. मोहनजी भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


 


नागपूर : "उत्कृष्ट गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हीच गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने निर्भय आत्मविश्वास देणारे व्यक्तिमत्त्व तयार करणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबादारी आहे,'' असे प्रतिपादन डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे केले. नागपूरमध्ये झालेल्या 'इंटरनॅशनल प्रिंसिपल एज्युकेशन कॉन्फरन्स' (आयपीईसी) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

 

आपल्या भाषणातून त्यांनी शिक्षणपद्धतीबद्दल विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणवत्तेबद्दलचे महत्त्व अधोरेखित केले. ''विद्यार्थ्यांवर संस्कार होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कार हे घरातूनच होत असतात. मुलांचे प्रथम गुरू हे आई-वडीलच असतात. शाळेत जाण्यापूर्वी त्यांना प्राथमिक शिक्षण त्यांच्याकडूनच मिळते,'' असेही ते म्हणाले.

 

"प्रकृतीला नष्ट केले तर आपण नष्ट होऊ हे माहिती असतानाही लोक निसर्गाला हानी पोहोचवण्याचे काम करत असतात. आपापसात भांडल्यामुळे आपलेच नुकसान होत आहे, हे लक्षात येऊनही काही लोक भांडायचे थांबत नाहीत. स्वार्थ वाईट हे माहिती असूनही लोक स्वार्थ सोडत नाहीत. स्वार्थ सोडणे फार कमी लोकांना जमते,'' असे ते आपल्या भाषणात म्हणाले.  
 

यावेळी 'सुपर थर्टी' या संस्थेचे संस्थापक आणि प्रख्यात गणितज्ज्ञ अनंत कुमार यांना 'नचिकेत सर्वोत्तम पुरस्कार' सन्मानाने गौरवण्यात आले. कुमार म्हणाले, "शिक्षण हा एक उदात्त व्यवसाय आहे आणि शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. वंचित मुलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षिकांना हा पुरस्कार समर्पित आहे." या कार्यक्रमाला देशभरातील मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थिती दर्शवली. पुढील तीन दिवस ही परिषद सुरू राहणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@