सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |



राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबतचा तिढा अद्यापही कायम असून सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षांनी आपला स्वत:चा मार्ग निवडावा
, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज्य विधानसभेच्या निवडणुका शिवसेना- भाजप युती विरुद्ध काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा लढल्या गेल्या, त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा, आम्ही आमचा राजकीय निर्णय घेऊ, असे पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पवार यांनी काल दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान राज्यात सरकार स्थापनेबद्दल शिवसेनेसोबत एकत्र येऊन राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत सरकारस्थापनेबद्दलची शक्यता फेटाळून लावत महाशिवआघाडीच्या फूग्यातील हवा शरद पवार यांनी काढली. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या सत्तास्थापनेबद्दलच्या शक्यतेला आणि प्रस्तावित महाशिवआघाडीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे.

तर या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, राज्यातल्या राजकीय परिस्थितीची सोनिया गांधी यांना माहिती दिली असून, सरकार स्थापनेबाबत मात्र आमच्यात चर्चा झाली नाही, असे सांगितले. आघाडीतल्या इतर पक्षांना नाराज न करता त्यांची मतेही विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असं पवार म्हणाले. या बैठकीत येत्या एक - दोन दिवसात पुढील निर्णय घेण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

पवार आणि गांधी यांच्यात अपेक्षित चर्चा न झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता होती, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पवार यांची भेट घेतली. या बैठकीत राजकीय नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे नेते आज दिल्लीला जाऊन सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर एकही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे.

@@AUTHORINFO_V1@@