'समुत्कर्ष अभ्यासिका' दिवाळी शिबीर २०१९

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |




बोईसर : दि. ७ नोव्हेंबर, २०१९ रोजी बोईसर पूर्वमधील लोखंडीपाड्यातील स्वामी विवेकानंद सेवा केंद्रात बोईसर विभागातील अभ्यासिका विद्यार्थ्यांचे दिवाळी शिबीर अतिशय जल्लोषात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अर्चना वाणी, महावीर सोलंकी, प्रकाश मोरे इ. मान्यवरांच्या हस्ते झाले. या शिबिरात बोईसर विभागातील सहा अभ्यासिकांचे एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी घोषवाक्य स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा तसेच समूह नृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये अतिशय आवडीने आपला सहभाग नोंदवला.

 

विद्यार्थ्यांसोबतच आशागड, गारगाव, हनुमाननगर, पाटीलपाडा, लोखंडीपाडा अशा वेगवेगळ्या गावांमधून पालकसुद्धा शिबिरासाठी उपस्थित राहिले होते. एकूण दिवसभर चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या सुप्त गुणांचे सादरीकरण सर्वांच्या समोर केले. दिवसभर झालेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विविध गावांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्तेच करण्यात आला. वर्षभरातील एकूण अभ्यासिकांची गुणवत्ता व मूल्यमापनाच्या अनुषंगाने पाटीलपाडा येथे चालणारी 'पाटीलपाडा प्राथमिक अभ्यासिका' ही या वर्षीची बोईसर विभागातील 'उत्कृष्ट अभ्यासिका' ठरली.

 

या शिबिरासाठी कांदिवली येथून पाल राजेंद्र महाविद्यालयाचे २८ स्वयंसेवक उपस्थित होते. त्याचप्रमाणे सफाळे विभागातील १५ स्वयंसेवक उपस्थित होते. याचप्रमाणे जि. प. शाळा लोखंडीपाडा येथील मुख्याध्यापिका गौरी राऊत, जि. प. शाळा दांडीपाडा येथील शिक्षिका संख्ये यांनीदेखील शिबिरात कथाकथन व समूह गायन स्पर्धेचे परीक्षण केले. यासोबतच पालघर जिल्हा प्रचारक सतीश कडू व 'अनुलोम' संस्थेचे भागसेवक पंकज भारवाड, पर्यावरणप्रेमी विलास शहापुरे आणि वैशाली शिंदे यांनीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे या उद्देशांना समोर ठेवून सदर दिवाळी शिबिराचे आयोजन 'सेवा सहयोग फाऊंडेशन'चे बोईसर-डहाणू विभागाचे समन्वयक अनिकेत गमरे यांनी केले होते.

@@AUTHORINFO_V1@@