झाशीच्या राणीच्या शौर्याचे वर्णन हे शूरत्वाच्या शब्दांत बांधता येत नाही : प्रकाश पाठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |



नाशिक : “मातृशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. झाशीच्या राणीच्या शौर्याचे वर्णन हे शूरत्वाच्या शब्दांनी बांधता येत नाही,” असे सांगत चतुरस्त्र वक्ता प्रकाश पाठक यांनी यावेळी राणी लक्ष्मीबाई यांचे लढाईतील प्रसंग स्पष्ट केले. तसेच, यावेळी त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांची देशभक्ती विशद केली. स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्यावतीने आयोजित ‘अध्यात्मातील शौर्य व शौर्यातील आध्यात्मिक बैठक’ या विषयावरील व्याख्यान मालेप्रसंगी बोलत होते. श्री गुरू नानक देवजी यांचे ५५० वे प्रकाशवर्ष देखील समितीच्या माध्यमातून साजरे केले जात आहे. यावेळी कळवण येथील अरण्यकन्या आणि कल्याण वन परिक्षेत्राच्या वनाधिकारी कल्पना वाघेरे यांना ‘शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रा जोशी, प्रमुख पाहुण्या ज्योती ग्रोव्हर, प्रमुख वक्ते प्रकाश पाठक, चिटणीस विद्या चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाठक म्हणाले की, “भारतातील मातृशक्तीचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच, कल्पना वाघेरे यांनीही संघर्ष व समन्वय यांचा योग्य समतोल राखला आहे.” यावेळी पाठक यांनी संतांच्या विविध गुणांचे दर्शन घडवत संतांचे भारतात कसे महत्त्व आहे व भारत हा कसा संतांचा देश आहे, याबाबत सोदाहरण मांडणी यावेळी केली. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, संत ज्ञानेश्वर यांचे दाखले देत संतत्व व मातृत्व यांचे महत्त्व यावेळी त्यांनी विशद केले. शीख धर्माचे पौरुषत्वाचे उदाहरण देत विविध तीन टप्प्यांत गुरू नानक देव यांचा जीवनप्रवास व कार्यही त्यांनी विशद केले. गुरू नानक यांच्याबाबत ‘प्रकाशवर्ष’ हा शब्द का उच्चारला जातो, याबाबत सांगताना ते म्हणाले की, त्यांच्या जन्माच्या वेळी ज्योतिषी म्हणाले की, “गुरू नानक यांच्या जन्मामुळे प्रकाश दिसत आहे.” त्यामुळे त्यांचे ५५० वे जयंती वर्ष हे प्रकाशवर्ष म्हणून साजरे होत आहे.” या कार्यक्रमामध्ये ‘शौर्य पुरस्कार’ सन्मानपत्राचे वाचन रेखा दाणी यांनी केले.

 

जागतिक पातळीवर स्त्रिया या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. हे पाहून एक महिला म्हणून अभिमान वाटतो. स्त्रियांनी जिद्द आणि स्वतःप्रति विश्वास बाळगल्यास त्या जीवनातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात.

-कल्पना वाघेरेशौर्य पुरस्कारार्थी

दै. ‘मुंबई तरुण भारत’ मधील ‘माणसं’ या सदरात कल्पना वाघेरे यांच्या कर्तृत्वावर लेख प्रकाशित झाला होता. त्या अनुषंगाने ‘राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती’च्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली.

@@AUTHORINFO_V1@@