अष्टपैलू अश्विन

    19-Nov-2019
Total Views |
 
 
 

कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असणार्‍या अश्विनच्या नावावर विविध विक्रमांची नोंद असली तरी येथपर्यंत पोहोचण्यासाठी अश्विनने आपल्या कारकिर्दीत मोठा संघर्ष केला आहे. त्याच्या जीवनाविषयी...

 

इंदौर येथे नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोमिनुल-हकला बाद केल्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू सध्या चांगलाच चर्चेतआला आहे. भारतीय खेळपट्टीवर २५० विकेट्स पटकावण्याचा विक्रम करत अश्विन आता विश्वप्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुथ्थैय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांच्या यादीत सामील झाला आहे. ४२ कसोटी सामन्यांमध्ये २५० विकेट्स टिपण्याची किमया त्याने साधली असून एका नव्या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असणार्‍या अश्विनच्या नावावर विविध विक्रमांची नोंद असली तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी अश्विनने आपल्या कारकिर्दीत मोठा संघर्ष केला आहे.

 

रविचंद्रन अश्विनचा जन्म १७ सप्टेंबर, रोजी १९८६ साली एका तामिळ कुटुंबात झाला. चेन्नईमधील मामबलम येथे त्याचे कुटुंब वास्तव्यास असून येथेच त्याने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. रविचंद्रन अश्विन हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. खेळाची रूची जपण्यासोबतच उच्च शिक्षणासाठी त्याचा कुटुंबाचा आग्रह होता. क्रिकेटच्या खेळात प्रावीण्य मिळवण्यासोबतच उच्च शिक्षण घेणे या दोन्ही जबाबदार्‍या अश्विनने योग्यरित्या पार पाडल्या. शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवत अश्विनने अभियांत्रिकी महाविद्यालयातही प्रवेश मिळवला. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतानाच अश्विनने आपली क्रिकेटची रूचीही जपली आणि यात यशस्वीरित्या आपले करिअरही घडविले हे विशेष.

 

सध्याच्या घडीला अश्विन हा मोठा फिरकीपटू गोलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी रविचंद्रन अश्विन दाक्षिणात्य संघांतून सलामीचा फलंदाज म्हणून खेळत असे. क्रिकेटमध्ये सलामीचा फलंदाज फार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सलामीचा आणि महत्त्वाचा फलंदाज म्हणून कामगिरी बजावणारा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकीपटू म्हणून ओळखला जाऊ लागला. नवल वाटत असले तरी या मागे एक वेगळेच कारण आहे. वयाच्या सतराव्या वर्षी स्नायूंमध्ये संसर्ग झाल्याने अश्विन अंथरुणाला खिळला. आजारपणामुळे अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर तो जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दुरावला.

 

ऐन तारुण्यात त्याच्यावर ही वेळ ओढवल्याने तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल की नाही, असा प्रश्न उद्भवला. मात्र, आजारपणात खचून न जाता त्याने स्वतःला सावरत पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या अंतरानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना त्याने आपल्या खेळण्याच्या शैलीत काहीसे बदल केले. आपल्या प्रशिक्षकांशी चर्चा करत त्याने फिरकीपटू होण्यासाठी सराव सुरू केला. एका अनोख्या शैलीने फिरकी गोलंदाजी करणार्‍या अश्विनने यानंतर मैदान गाजवण्यास सुरुवात केली.

 

अश्विनकडे असणारा विशेष 'कॅरम बॉल' आणि 'दुसरा' या गोलंदाजीच्या शैली अनेक फलंदाजांना चकवा देत असे. त्याच्या या गोलंदाजीचे वैशिष्ट्य ओळखत प्रक्षिक्षकांनी त्याला तामिळनाडू संघातून रणजी सामन्यात खेळण्याची संधी दिली. येथे शानदार प्रदर्शन केल्यानंतर आयपीएलमधील 'चेन्नई सुपर किंग्ज' संघाच्या प्रशिक्षकांची नजर त्याच्यावर पडली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघात खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि अश्विनचे नशीबच पालटले. धोनीच्या सल्ल्यानुसार उत्कृष्ट गोलंदाजी करत २०१०च्या आयपीएल सामन्यांत सर्वत्र प्रकाशझोतात आला. आयपीएल स्पर्धेनंतर अश्विनला त्यानंतर झिम्बाब्वे(झिंबाब्वे) दौर्‍यादरम्यान भारतीय संघात संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. कसोटीसह एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून कामगिरी बजावू लागला.

 

अश्विनने आत्तापर्यंत ३७ कसोटी सामने खेळले असून तब्बल ४०० गडी बाद करण्यात यश मिळवले आहे. अनिल कुंबळे, कपिल देव, हरभजन सिंह या दिग्गज गोलंदाजानंतर ४०० विकेट्स बाद करणारा अश्विन हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय १०२ एकदिवसीय सामने त्याने खेळले असून त्याने १४२ विकेट्स घेतल्या आहेत. 'टी-२०' मध्येही त्याने अनेक सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली असून आयपीएलमधील 'किंग्ज इलेव्हन पंजाब' संघाचे नेतृत्वदेखील केले आहे. ३२ 'टी-२०' सामन्यांमध्ये अश्विनने ५२ विकेट्स मिळवल्या आहेत. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये चार शतके आणि ४५ अर्धशतके त्याच्या नावावर असून एकेकाळी आंतरराष्ट्रीय अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणूनही 'आयसीसी'ने त्याला गौरवले होते. २०१४ साली 'अर्जुन पुरस्कारा'ने त्याला सन्मानित करण्यात आले असून आगामी काळात तो आणखीन चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा!

 

- रामचंद्र नाईक

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.