...असाही प्रेरणादायी प्रवास!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019   
Total Views |



डोंबिवली (रोशनी खोत) : सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात आपल्या करिअरच्या वाटा व्यापक असाव्यात, असे स्वप्न प्रत्येक तरुणवर्ग आपल्या उराशी बाळगत असतो. यासाठी ते प्रयत्नही करतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेत कितीही अडचणी आल्या, तरी आपले स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न हे थांबता कामा नयेत, असा संदेश डॉ. करुणा सूर्यकांत भोसले देतात. सध्या ठाणे शहरात राहणाऱ्या डॉ. करुणा सूर्यकांत भोसले यांची कहाणी अशीच आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनिअर होण्याची स्वप्ने पाहणार्‍यांपैकी याही एक. करुणा यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. मात्र, यासाठी लागणारी मेहनत, अभ्यास याची काहीही माहिती त्यांच्याजवळ नव्हती. तरीही स्वप्नांना साध्य करण्यासाठी त्यांनी वाटचाल सुरू केली. उल्हासनगर येथील बनसोडे या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या करुणा यांचे शालेय शिक्षण कल्याण येथील होली क्रॉस शाळेतून पूर्ण झाले. त्यांचे वडील देविदास बनसोडे हे एअर इंडियामध्ये कार्यरत होते. त्याचबरोबर ते एक सामाजिक कार्यकर्तेदेखील होते. करुणा यांना इंजिनिअरिंगची आवड होती. उच्च शिक्षणाचे स्वप्न आणि मुलगी म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या अशा दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागत होत्याच. २००२ मध्ये त्यांनी इंजिनिअरिंगच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयात प्रवेश घेतला. 'अपयशाशिवाय यशाची किंमत कळत नाही,' असे म्हणतात आणि तेच करुणासोबतही घडले. इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

 

इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष असतानाच म्हणजे २००५ मध्ये करुणा यांचा बदलापूर येथील डॉ. सूर्यकांत भोसले यांच्याशी विवाह झाला. त्यांना आईवडिलांप्रमाणेच पतीची आणि सासरकडील मंडळींचीही साथ मिळाली. डॉ. करुणा यांचे पतीदेखील उच्चशिक्षीत असून त्यांनी विधी विषयात पीएचडी केली आहे व ते सध्या देवजीभाई हरिया विधी महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. संदीप इनामदार यांच्या सेमिनारमधूनदेखील करुणा यांना शैक्षणिक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी 'मास्टर ऑफ इंजिनिअरिंग' पूर्ण करण्याचा निर्णय घेत के. के. वाघ इन्स्टिट्यूट (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) इथून त्यांचे एमईचे शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान, त्यांनी तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहप्राध्यापक म्हणून नोकरीही केली. करुणा यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षणाकडे वाटचाल करावी यासाठी डॉ. भोसले यांनी पुढाकार घेतला आणि करुणा यांनी त्यास सहमती दर्शवली. पीएचडी करण्यासाठी युरोप येथील टेक्निकल युनिव्हर्सिटी, सोफिया (बल्गेरिया) येथे झाली. यापुढे करुणा यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वैवाहिक जीवन, लहान मुले यांच्यापासून लांब तीन महिने युरोपमध्ये राहावे लागणार होते. बल्गेरिया येथून पीएचडीसाठी करुणा यांनी 'सायबर सिक्युरिटी' विषय निवडला. पीएचडी शिक्षणाकरिता करुणा यांना वर्षातले तीन महिने युरोपमध्ये राहावे लागत होते. त्यांची मुलगी स्वरा केवळ सहा महिन्यांची असतानादेखील करुणा यांना तीन महिने युरोप येथे राहावे लागले. अनंत अडचणी, जबाबदाऱ्या सांभाळत अखेर २०१९ मध्ये करुणा यांनी पीएचडी यशस्वीरित्या प्राप्त केली. डॉ. करुणा भोसले या सध्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळतच ठाणे येथे करुणा रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इंडिया याद्वारे नवतरुण विद्यार्थ्यांना सेमिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, परदेशी शिक्षणाचा देशाच्या विकासासाठी होणारा फायदा आणि सायबर सुरक्षा यांबाबत मार्गदर्शन करण्याचे काम त्या करतात.

@@AUTHORINFO_V1@@