पितो मुंबईचे पाणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019   
Total Views |



मी चार गावचं पाणी पिऊन राहिलो,” असे वैदर्भीय साच्यातील स्वानुभवाची प्रशंसा करणारे तिरकस वाक्य ऐकून-वाचून तसे परिचयाचेच. पण, आता खरोखरीचकोणत्या गावचे पाणी पितो?’ असा प्रश्न कोणी विचारलाच तर बिनधास्त, अभिमानाने सांगा, “आम्ही मुंबईचे पाणी पितो.” कारण, देशातील स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या बाबतीत आपली मुंबई देशात अव्वल ठरली आहे. काही मुंबईकरांना हे वाचून आश्चर्याचा कदाचित धक्का बसेलही, पण मुंबईकरांनो, आकडे हेच सांगतात. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स’ (बीआयएस) च्या अहवालातून नुकतीच मुंबईकरांसाठी ही खुशखबर समोर आली. २१ मोठ्या शहरांपैकीबीआयएसच्या सर्व निकषांवर मुंबईतील पाण्याचे नमुने अव्वल ठरले, तर राजधानी दिल्लीचे पाणी सर्वाधिक निकषांची पूर्तता करण्यास अपयशी ठरले. ‘बीआयएसने शुद्ध पाण्यासाठी एकूण २८ निकष निर्धारित केले आहेत. यामध्ये पाण्यातील क्षार, धातू अशा विविध निकषांचा समावेश आहे. पण, दिल्लीच्या विविध विभागांतून गोळा केलेले ११ पाण्याचे नमुने निकषांच्या कसोटीवर खरे उतरले नसून २८ पैकी १९ निकषांवर दिल्लीचे पाणी सर्वाधिक कमी दर्जाचे ठरले आहे. मुंबईखालोखाल हैदराबाद, भुवनेश्वरचेही पाणी स्वच्छ ठरले असून केवळ एकेका निकषावर अनुत्तीर्ण ठरले आहे, तर भोपाळ, बंगळुरू, लखनऊ, देहरादून, चेन्नई, कोलकाता या शहरातील पाण्याचे १० नमुनेहीबीआयएसच्या मूल्यांकनावर अपयशी ठरले आहेत. मुंबईचे पाणीबीआयएसच्या निकषांवर सरस ठरल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका अभिनंदनास निश्चितच पात्र ठरते. कारण, मुंबईमध्ये तब्बल दीडशे किमी दूरवरूनही शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. जपानच्या टोकियोनंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमाकांचा पाणीपुरवठा करणारे मुंबई हे महानगर. पण, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे या महानगराची तहान भागविणे, हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी दमणगंगा-पिंजाळसारखे प्रकल्पही दृष्टिक्षेपात आहेत. पालिका, सरकारचे आपापल्या पातळीवर जलसंचय, जलसंवर्धनाचे प्रयत्न सुरू असले तरी मुंबईकरांनीही पाण्याचा तितकाच काटकसरीने वापर करायची गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकतात. तेव्हा मुंबईकरांनो, मुंबईच्या या जलक्षमतेचा, जलदर्जाचा सन्मान राखूया आणि पाण्याचा जपून वापर करूया.

केजरीवालांना पाजले पाणी!

बीआयएसच्या अहवालानंतर दिल्लीचे राजकीय वातावरणही एकाएकी उकळू लागले. दिल्लीला बदनाम करण्यासाठी हा केंद्र सरकारचाच डाव असल्याचे आम आदमी पक्षाने उच्चरवाने सांगितले. पण, ‘बीआयएसने खुद्द केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या बंगल्यातून, कार्यालयातूनही पाण्याचे नमुने गोळा केले होते तेहीबीआयएसच्या निकषांवर पात्र ठरले नाहीत. पण, केजरीवालांना जिथे-तिथे फक्त राजकारणच दिसून येते. या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या केजरीवालांना मात्र रामविलास पासवान यांनीच पाणी पाजले. “दिल्लीमध्ये पिवळे, हिरवे, निळे अशा सगळ्याच रंगाचे पाणी विविध ठिकाणच्या नळांमधून येते. तेव्हा केजरीवालांना विश्वास नसेल तरबीआयएससोबत राज्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन कुठल्याही प्रयोगशाळेतून त्यांनी पाण्याची तपासणी करून घ्यावी,” असे जाहीर आव्हानच पासवान यांनी केले. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून भाजपनेआपसरकारला जणूअशुद्धठरवण्यासाठीच हा सगळा प्रकार केल्याच्या आरोपांत कदापि तथ्य दिसून येत नाही. आधी दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाचा प्रश्न देशभरातच नाही, तर जगभरात गाजला. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार फटकारल्यानंतरही दिल्ली सरकारनेसम-विषमव्यतिरिक्त प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनाही केल्या नाहीत. त्यामुळे दिल्लीतील पोलिसांना राज्य सरकार अंतर्गत आणण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या केजरीवालांनी, त्यांच्या अखत्यारित असलेल्या हवा, पाणी, कचरा यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यावा. प्रत्येक गोष्टीत केवळराजकीय द्वेषापोटीआपला बदनाम करण्याचा डावअशी घासून गुळगुळीत विधाने करण्यापूर्वी दिल्लीची आरोग्य पातळी सुधारण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. कारण, जनतेला फुकटची खैरात वाटून मतांची कमाई करण्याचे दिवस आता गेले. केजरीवालांसाठी निश्चितच दिल्लीच्या निवडणुका यंदा सोप्या नसतील. केजरीवालांच्या, आपच्या आमदारांच्या कृत्यांतून, त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, हे नक्की!

@@AUTHORINFO_V1@@