भारतीय अर्थव्यवस्थेत गतीने विकास करण्याची क्षमता : बिल गेट्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : जगातील श्रीमंतांच्या यादीतील अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जनतेची गरीबी दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यासाठी सरकारने आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे.', असे ते म्हणाले.

 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी भारतातील आधार कार्ड प्रणाली, वित्तीय सेवा, फार्मा कंपन्या आदींबद्दल विशेष कौतूक केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट दिसून आले होते. त्यानंतर आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. बिल गेट्स म्हणाले, "मला सद्यस्थितीबद्दल काही माहिती नाही मात्र, येणारे दशक भारताचे असेल. या दरम्यान भारताची अर्थव्यवस्था तेजीत असेल, विकास करेल. वास्तविकतः या काळात अर्थव्यवस्था भरारी घेईल. "

 

'आधार'चे बिल गेट्सकडून कौतूक !

'भारताचे जागतिक पटलावर एक महत्व आहे. येथे बऱ्याच नाविण्यपूर्ण गोष्टी आहेत. देशातील 'आधार' आणि 'युपीआय'च्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो आणि व्यापक स्वरूपात नागरिकांनी याचा स्वीकार केला आहे. याचा आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळेल.', असे बिल गेट्स म्हणाले.

 

नंदन नीलेकणी यांच्यासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि 'आधार'चे शिल्पकार नंदन नीलेकणी यांचे कौतूक करताना बिल गेट्स म्हणाले, "मी नंदन नीलेकणी यांसारख्या व्यक्तीचे सहकार्य घेऊ इच्छितो. भारतात डिजिटल ओळखीच्या माध्यमातून वित्तीय सेवांचे आदान प्रदान केले जाते. मी ही गोष्ट शिकू इच्छूतो. जेणेकरून याचा उपयोग मी इतर देशांमध्ये करू शकेन. जेव्हा जागतिक पातळीवर भारताचा विचार केला जातो तेव्हा अन्य क्षेत्रांपेक्षा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो."

 

ठरले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

११० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह बिल गेट्स पुन्हा जागतिक श्रीमंतांच्या क्रमावारीत अव्वल ठरले आहेत. शुक्रवारी त्यांनी एमेझोनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकत पहिला स्थान पटकावले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७.८९ लाख कोटी रुपये इतकी आहे. जगातील दारिद्र दूर करण्यासाठी त्यांनी आजवर बिल-मेलेडो फाऊंडेशनसहीत ३५ अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती दान केली आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@