या बांधावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |

 
कशाही गोष्टींची सवयच होऊन जात असते. किती लवकर सवयींचे व्यसन होईल, याचा काहीच नेम नसतो. नेम वरून तुम्हाला बाण अन्‌ मग पुन्हा बाणाचा नसत्या ठिकाणी लागलेला नेम आठवत असेल तर त्यात आमचा काहीही दोष नाही. आम्ही थेट अर्थाने नेम हा शब्द वापरला आहे... तर, मंडळी सवय आणि व्यसन यात फार काही अंतर नसते. मग ती माणसं असो की निसर्ग असो. निसर्ग आणि पर्यावरणालाही काही सवयी लागत असतात आणि त्यांचे व्यसन होत असते. व्यसन ही नैसर्गिक बाब आहे. म्हणजे निसर्गालाही व्यसन लागू शकते. अशी व्यसनं आम्हीच माणसांनी निसर्ग- पर्यावरणाला लावली आहेत. एखादा माणूस आपल्या शेजारी सिगारेट ओढत असेल तर त्याची बाधा आपल्यालाही होत असते. त्याला समजावे अशा भाषेत ‘पॅसीव्ह स्मोकिंग ’ असे म्हणतात. तसलेच पॅसीव्ह स्मोकिंग निसर्गाबाबत झाले आहे. कारखान्यातला कार्बन निसर्गात गेला अन्‌ मग आता निसर्ग- पर्यावरणाला त्याचे व्यसनच लागले. आता निसर्ग असा नशेत तर्र झाल्यावर त्याची पावले वेडी-वाकडी पडणारच ना... त्यामुळे आता पावसाळ्यात ऊन्ह असतात आणि हिवाळ्यात पाऊस असतो... यंदा तसेच झाले. नशेतल्या निसर्गाला अचानक जाग आली. दारू प्यायलेल्या बापाला रात्री-बेरात्री मग आपल्या बाप असण्याच्या कर्तव्याची जाणीव होते आणि तो मग त्याच्या शाळेत जाणार्‍या झोपलेल्या लेकराचा त्याला गाढ झोपेतून उठवून अभ्यास घेतो, तसलाच प्रकार झाला आहे. मृग नक्षत्रावर आणि नंतर आषाढातल्या हस्तापर्यंत पाऊस आलाच नाही अन्‌ मग त्याला एकदम आपल्या कर्तव्याची जाणीव सप्टेंबरात झाली. नशेत तर्र असताना कर्तव्याची अशी जाणीव होणे घातकच असते. मग तो बाप झोपलेल्या पोराला अभ्यास का करत नाही म्हणून झोडपतो. पावसाने मग झोडपून काढले शेतकर्‍यांना. ही झाली नशेची बात. या व्यसनी निसर्गाने शेतकर्‍यांचे नुकसान केलेच आहे.
आता हे असे सुरू असताना नशेचा, व्यसनांचा दुसरा प्रकार इकडे सुरू होता. ऐन दिवाळीत, दसर्‍यांत कापूस वेचण्याच्या अन्‌ सोयाबीन सोंगनीच्या काळात बदाबदा पाऊस पडत होता अन्‌ इकडे वेगळी नशा सुरू होती. निवडणुकांचा मोसम होता. तीदेखील नशाच. मोठ्ठे व्यसन! सगळेच प्रचारात होते. निवडणुकीच्या राजकारणात होते. तिकीट मिळवणे, कुणाचे कापणे, नाही मिळाले तिकीट तर बंडखोरी करणे, पक्षांनीही कधी बंडोखोरांवर कारवाईची भाषा करत त्यांना आतून पाठिंबा देणे, असले प्रकार सुरू होते. त्यात देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांना भेटून आले. ‘जाणते राजे’ही (!) पावसांत भिजत प्रचार करीत राहिले अन्‌ हळूच बांधावर जाण्याची बातमी करत राहिले... आता ते व्यसन संपले आहे, तर सत्ताप्राप्तीची वेगळी नशा सुरू झालेली आहे. ‘आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आहे,’ असे म्हणत, लोक आता वेळकाळ पाहून नको त्या लोकांशी लगट करत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकरी जेव्हा बोलावत होते ‘या बांधावर’ तेव्हा कुणालाच वेळ नव्हता. आता मात्र सगळेच बांधावर धावू लागले आहेत. शरद पवारांनी धाव घेतली. मग उद्धव ठाकरेंनाही वाटले की, अरेच्चा! आपण तर शेतबांधावर गेलो नाही. शेतकर्‍यांच्या दीनवाण्या चेहर्‍यासोबत आपले फोटो वर्तमानपत्रांत छापून आले नाहीत, चॅनलवर बातमी आलेली नाही. त्यामुळे तेही मग मराठवाड्यात धावले अन्‌ आता सांगलीत जाऊन आले. तिकडच्या बातम्या आल्या अन्‌ शेतकरी या बातम्या बघत असताना ते आपले अजब सरकार स्थापनेचे गजब स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गी लागले आहेत. त्यांनी म्हणे त्यांच्या वडिलांना शब्द दिला होता की, तुमच्या नातवाला एक दिवस मुख्यमंत्री करूनच दाखवीन... त्यांनी शेतकर्‍यांनाही शब्द दिला होता का? त्यांना तो आठवतो का?
 
मात्र, एक नक्की की आता शेतकर्‍यांना एक सवय जडली आणि आता तर तिचे व्यसनांत रूपांतर झाले आहे. रोज कुणीतरी सेलिब्रेटी शेताच्या बांधावर आला पाहिजे अन्‌ त्या निमित्ताने तो यायच्या आधी आणि नंतर टीव्ही चॅनलवाल्यांनी दोन-चार (अति)सामान्य शेतकर्‍यांचे बाईटस्‌ वाहिनीवीरांनी घ्यायचे अन्‌ ते मग प्रसारित करायचे. आताचा जमाना हायफाय झाला असल्याने अन्‌ चॅनलचा टीआरपी वाढण्याच्या क्लुप्त्या म्हणून वाहिनीवालेही त्या शेतकर्‍याला त्याची लिंक पाठवितात अन्‌ तो शेतकरीही ती लिंक फॉरवर्ड करतो, ‘आज अमक्या चॅनलवर मी दिसणार...’ अशी काय काय गंमत गंमत सुरू आहे. फडणवीसांनी सांगितल्यावर नवे आमदार आणि काही जुने नव्याने झालेले आमदार शेताच्या बांधावर धावले. सोबत पत्रकारांना नाहीतर आपल्या छायाचित्रकाराला नेले. फोटो अन्‌ बातमी ‘पेपरांत’ येईल, याची काळजी घेतली. शासनाला मागणी करेल, अशी ग्वाही दिली. ‘लयच नुसकान झालं हाय’ असे साहेब म्हणाले. त्याच्या बातम्या झाल्या. पीएने कात्रणं फाईलला लावले. फेसबुक पेजवर टाकले. शासनच नाही तर मागणी कुणाकडे करणार? नसत्या हट्टानं शासन निर्माण होईना. हे पीक गेलं पाण्यात अन्‌ हे नेते बातम्यांचं पीक घेत आहेत. कोरड्या सहानूभूतीचं पीक आलं आहे.
 
शेतकर्‍यांविषयी सहानुभूती दाखविण्याचंही आपलं एक व्यसनच आहे. आता तर शेताच्या बांधावर धावत गेले भाऊ, दादा, ताई म्हटलं की प्रसिद्धीची सुगीच आली आहे. त्यामुळे जो उठला तो शेताच्या बांधावर धावतो आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करतो आहे. मुंबई- पुणे महानगराच्या बाहेर ज्यांचं राजकारण गेलंच नाही अन्‌ मुंबई मनपाची सत्ता म्हणजे ज्यांच्या पोपटाचा प्राण आहे, असेही नेते, ज्यांना कापूस जमिनीखाली येतो की वर, हेही माहिती नाही, असेही शेताच्या बांधावर जावू लागले. दहा वर्षे देशाचे कृषी मंत्री असलेले शरद पवारही शेताच्या बांधावर उगाच जाऊन आले. दीर्घकाळ सत्ता असताना त्यांनी काय केले, हा प्रश्न आता विचारायचा नाही कारण त्यांनी पावसांत भिजून सारेचं पापं धुवून टाकल्याची त्यांच्या भक्तांची भावना आहे. आता मात्र ते तिकडे बैठका लावतात अन्‌ इकडे विदर्भात येतात. नाशिककडे जातात. मराठवाड्यात जातात. ज्यांनी ऊस गोड लागला म्हणून तो कारखान्यांसह मूळासकट खाल्ला त्यांना आता कापूसवाला शेतकरी आठवला. बरे हे करणार काय? तर पावसानं बुडविलेल्या शेतकर्‍याला कोरडी सहानुभूती दाखविणार. राज्यपालांकडे अन्‌ केंद्र सरकारकडे मागणी करतो, असे सांगणार... आता हा ट्रेंड आला आहे. अगदी तालुका स्तरावरचा डिपॉझीट जप्तच्याही खालची लायकी असलेला नेताही शेतबांधावर जाऊ लागला आहे. भेटी घेऊन ज्यमन तिथं छापून आणू लागला आहे. जनसेवेची फाईल फुगविणे एवढाच कार्यक्रम. आता झेडपीच्या निवडणुका आहेत. तिकीट मागताना ही फाईल कामाला येते.
 
आता रोजच कुणी तरी भाऊ, दादा, ताई, आक्का शेताच्या बांधावर येऊ लागले आहेत. पिकावर मावा- तुडतुडे यावेत असे नेते भेटायास येती काढत्या पायासवे, अशी स्थिती आहे. त्याची शेतकर्‍यांना सवय झाली. आता त्याचे व्यसन लागले. त्यामुळे आता कुणीच ‘शेलिब्रेटी’ (विथ कॅमेरा) आला नाही तर शेतकर्‍यांना अस्वस्थ वाटतं. पीक पाण्यात गेलं की असल्या कोरड्या सहानुभूतीदारांच्या पाहण्यात गेलं, हेच कळेनासं झालं आहे... तरीही कास्तकार बांधावर उभे राहतात अन्‌ म्हणतात, या बांधावर! फुकट प्रसिद्धी नेत्यांच्या स्वागतासाठी बांध अनावर झाले आहेत.
----
@@AUTHORINFO_V1@@