गुंतवणूकीचे ४ 'P'लर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |




काही वाचकांचे प्रश्न कम आज्ञा गमतीशीर असतात. ई-मेल किंवा 'WhatsApp' वर मेसेज करतात म्युच्युअल फंडाची अजून माहिती पाठवा. अजून माहिती म्हणजे काय? मी एका वाचकाला उलट मेसेज केला. आपण फोनवर बोलू असे देखील कळवले. उत्तर आले मला वेळ असेल तेव्हा फोन करेल. तुम्ही आता फक्त अजून माहिती पाठवा.

 

मी समजलो “मी पुन्हा मेसेज करेन”, तू लिहीत राहा आणि माहिती पाठवित राहा. आम्ही आमच्या जबाबदारीपासून पळ काढणार नाही पण वाचकांनी देखील जबाबदारीपूर्वक आपला आर्थिक स्तर उंचावत न्यावा, म्हणजे आमच्या प्रयत्नपूर्वक प्रबोधनाला न्याय मिळेल हि माफक अपेक्षा.
 

गुंतवणूक करतांना किमान ४ Pलर अनुकरणीय असतात.

Participation – सहभाग

Provision – तरतूद

Protection – जोखमीचे सरंक्षण

Profit – परतावा

आता वरील मुद्द्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो.

Participation – सहभाग

 

आपला सहभाग कुठल्याही प्रकरणात कसा असतो? याचा विचार केला तर रात्र थोडी सोंग फार असे होईल. कारण अभ्यास कर... असं शाळेपासून आपल्याला सांगावं लागतं. तेव्हा गुंतवणूक कर हे सुद्धा कुणी सांगितलेच तर समोरच्याची यत्ता काय? इथून सुरुवात होते. कारण कळ दाबली कि जागो मोहन प्यारे मधील मोहिनी सारखी भुरळ घालणारी माहिती हजर. बरं माहितीचे रुपांतर ज्ञानात करायचे तर कुठली तरी परीक्षा दिली पाहिजे. पण आपण मरावे परी वाचीत जावे... एवढं वाचत जातो. सहभाग किती? सहभाग नसतो असे अजिबात नाही. स्वतः सल्लागार, स्वतःच विश्लेषक, स्वतः गुंतवणूकदार आणि स्वतःच श्रीमंत असा आपला एकपात्री रंगमंच प्रत्येकाला सादर करायचा असतो.

 

Provision – तरतूद

बुधवारी स्वतःची AMC असलेल्या खाजगी क्षेत्रातील अव्वल नंबरच्या बँकेत कामानिमित्ताने जाण्याचा योग आला. तिथे एक गुंतवणूकदार SIP बंद करा म्हणून अजिजी करत होता. आणि त्याला टेबल नंबर ३ व्हाया ८ वरून ११ अशा चकरा माराव्या लागत होत्या. मी त्याला विचारले SIP बंद का करताय? तो म्हणाला, माझे बचत खाते या बँकेत आहे. किमान शिल्लक रकमेपेक्षा ३,००० रुपये जास्त ठेवत होतो. बँकेतून गोड आवाजात फोन करून SIP सुरु करा म्हणजे बचत खात्यावरील व्याजापेक्षा जास्त परतावा मिळेल, असे सांगितले. अपूर्ण माहितीच्या आधारावर केलेली गुंतवणूक उणे १७% परतावा दाखवत आहे. भुलले रे मन माझे.... यापेक्षा दुसरे काय आठवले असेल मला?

 

Protection – जोखमीचे सरंक्षण

वरच्या उदाहरणावरून अजून एक गोष्ट लक्षात आली असेल. आपली जोखीम क्षमता माहित नसल्यास तेल हि गेले अन तूप हि गेले हाती आले धुपाटणे अशी अवस्था होवू शकते. माझ्या माहितीतल्या एक महिला गुंतवणूकदार आहेत. त्यांना त्यांच्या पालकांनी मुदत ठेव आणि जमीन या दोनच गोष्टींमधे गुंतवणूक करण्याचा सल्ला लहानपणापासूनच दिलाय. त्यामुळे बहुतेकदा आपली जोखीमांक चाचणी घरातच होत असते. सशुल्क जोखीमांक चाचणी करण्याची तयारी नसेल तर मोठया परताव्याच्या हव्यासापायी जोखीम घेण्यापूर्वी किमान कुटुंबियांशी एकदा नक्की चर्चा करा.

 

Profit – परतावा

ऑफिस सुटल्यानंतर एकदा एका माणसाची बस चुकते. डोळ्यासमोरून जाणारी बस पाहतांना तो बसच्या मागे धावत सुटला. बस पकडण्यासाठी. मग त्याच्या लक्षात आले कि आपण छानपैकी पळू शकतो. मग कशाला बस पकडा? तो तसाच घरी पोहचला. बायकोला सांगू लागला कि आज मी १५ रुपये वाचविले. बायको म्हणाली त्यात काय एवढे? तुम्ही २०० रुपये वाचवू शकला असतात. त्याने विचारले कसे? टॅक्सीच्या मागे धावत आला असतात तर जास्तीचे पैसे वाचले नसते का?

 

केलेल्या गुंतवणूकीवर नफा मोजण्याची पद्धत खूपदा अशीच काहीशी लादली जाते. चक्रवाढ पद्धतीची सगळेच जण स्तुती करतात परंतु केव्हा? नफा दिसत असला तरच. पण परताव्यात वाढ होण्यासाठी चक्र तर फिरले पाहिजे ना? साडे आठ वर्षात दामदुप्पट योजनेसाठी थांबणारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीवर भांडवली नफा मिळविण्यासाठी साडे आठ महिने सुद्धा थांबण्यास तयार होत नाही.

 

८ वर्षे निवृत्तीसाठी असलेल्या एका संभाव्य गुंतवणूकदार गृहस्थांनी त्यांच्या बचती –गुंतवणूका - निवृत्ती कोश याबद्दल चर्चा केली. पुढील ८ वर्षात साधारण १ कोटी रुपये नियोजनबद्धरीत्या गुंतवणूक करण्याचा मानस बोलून दाखविला. मला त्यांच्या गरजा, वय, जबाबदाऱ्या यांची माहिती असल्याने जोखीमांक चाचणी करून गुंतवणूकीचे नियोजन – परतावा व येणाऱ्या पैशातून निवृत्तीचे आयुष्य वयाच्या (किमान) ८५ पर्यंत कसे घालविता येईल याची चर्चा केली.

 

परंतु त्यांनी त्यांच्या चर्चेची सुरुवात Profit पासून सुरु केली. मला किमान २०% वार्षिक परतावा मिळाल्यास गुंतवणूकीचा निर्णय मी घेईन. या केसमधे त्या गृहस्थांचं Participation आहे, त्यांच्याकडे पुरेशी Provision सुद्धा आहे परंतु त्यांना त्यांची जोखीम घेण्याची क्षमता समजून देखील Protection करण्याची तयारी नाही. मग अशा ठिकाणी पाचवा Pलर कायम डोके वर काढतो आणि तो असतो Procrastination म्हणजेच निर्णय घेण्यास चालढकल करणे.

 

हॅम्लेटचा सुप्रसिद्ध संवाद To be or not to be… जीवन जगत असतांना आपण कधीतरी आपसूक स्वगीतासारखा म्हणतच असतो. तसाच संवाद To P or not to P आर्थिक निर्णय घेतांना देखील इथून पुढे अंगीकारला जाईल असे वाटते.

- अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

9423187598

[email protected]

(लेखक सशुल्क जोखीमांक चाचणी करून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुचवितात.)

@@AUTHORINFO_V1@@