आक्षेप आहे, आक्षेप आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019   
Total Views |
 


माझ्यासमोर साक्षात 'ते.' अतिशय चिडलेले, बिथरलेले. "इतके रागावलात का?" असे विचारल्यावर त्यातील एक पूज्यनीय म्हणाले, "या महाराष्ट्रप्रांती माझ्या नावाची टिंगलटवाळी चाललेली आहे म्हणे. अरे, खुशाल शकुनीची भूमिका करणार्‍यांना तुम्ही माझे नाव देता. शकुनीचे आणि माझे त्या काळातही काही देणेघेणे नव्हते. या काळातही नाही. तरी तुम्ही शकुनीमामासारखी कारस्थाने करणार्‍यांना माझे नाव देता? अपमान.... घोर अपमान. मी उतूनमातून खोटे बोललो नाही की सत्तेसाठी माजोरडेपणा केला नाही. तरी माझे नाव? महाराज युधिष्ठिर जे विचारायचे त्यावर, जे पाहिले तेच मी सांगायचो. माझ्या मनातलं सांगायचो का? सांगा सांगा? माझा आक्षेप आहे." एकंदर महाभारतातून दिव्यदृष्टीचे 'संजय' काही लोकांसमवेत माझ्यासमोर उभे होते तर! त्यांचे म्हणणेही बरोबरच होते म्हणा, जे सत्य पाहिले तेच संजय सांगायचे. रणांगणावर द्विधा मनोवस्थेत आहेत ते ५६ सैनिक आणि मुद्दाम राजाची दिशाभूल करण्यासाठी आपले १७५ सैनिक आहेत महाराज, असे खोडसाळपणे म्हणत महाराजांची आणि समस्त जनतेची दिशाभूल या संजयांनी केलीच नसती. खोटे बोलून वर "आम्हाला शहाणपणा शिकवू नका," म्हणण्याइतका बेतालपणाही संजय करूच शकले नसते. इतक्यात, संजय यांच्या बाजूच्या माणसाने मखलाशीचे भाषण सुरू केले. त्याचे डोळे लबाड होते आणि चेहर्‍यावर खोटारडे हासू होते. हातात काहीतरी खेळवत (सोंगटे का लेखणी हे आठवत नाही) ती व्यक्ती म्हणाली,"अरे महाभारतात मी एकटा होतो. आज या महाराष्ट्रात माझ्यासारखे एक नाही दोन दोन शकुनीमामा आहेत. इतकी 'पवार' नाही नाही 'पॉवर' तर मला त्या काळातही नव्हती. पुतण्यांना खड्ड्यात ढकलण्याचे माझे पेटंट त्यांनी का घेतले? वर माझे 'कॅरक्टर' निभावणार्‍या व्यक्तीला या संजयचे नाव द्यावे, यावरही माझा आक्षेप आहे. सगळीकडून आक्षेप आहे, आक्षेप आहे." ऐेकू येऊ लागले. त्यांच्या गदारोळात वाटले की, आज प्रत्यक्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब असते तर ते म्हणाले असते, "महाराष्ट्रात सत्तेसाठी जे काही चाललंय, त्याला माझा आक्षेप आहे, आक्षेप आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करणारे आम्ही. आज सत्तेसाठी लाचारी पत्करून एक हजार टक्के राजकारण करण्यांवर माझा आक्षेप आहे."

 

महाराष्ट्र विसरणार नाही!

 

"बाळासाहेबांची आठवण येत नाही, असा एकही दिवस नाही." बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त छगन भुजबळ रडत म्हणाले. शिवसेनेला 'सवर्ण समाजाचे ठेकेदार' म्हणत याच छगन भुजबळांनी नव्वदीच्या दशकात शिवसेना सोडली होती. २००० साली बाळासाहेबांना अटक झाली. त्या निर्णयावरही मोठ्या तोर्‍यात आणि सूड घेतल्याच्या आवेशात सही करणारे गृहमंत्री होते छगन भुजबळ. त्यावेळी त्यांना बाळासाहेबांची आठवण झाली होती का? महाराष्ट्र सदन, मनी लॉण्ड्रिंग वगैरे वगैरेचे घोटाळे दिलखुलासपणे करताना बाळासाहेबांनी सांगितलेले २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे सूत्र भुजबळांना कधी आठवले का? भुजबळ जुलै २०१९ मध्ये शिवसेनेत पुन्हा येणार अशी चर्चा होती. यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "बाळासाहेबांना अटक करण्याची चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेऊन अजित पवारांनी सांगावे. विभागाच्या प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही." तसेच छगन भुजबळांच्या पुन्हा शिवसेना वापसीवर उद्धव म्हणाले होते की,"बाळासाहेबांनी सुडाने कारवाई करणार्‍यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती." भुजबळ यांच्या शिवसेना वापसीबद्दल मुंबईतील शिवसैनिकांनी बॅनर लावले होते. 'केसात गजरा आणि गावभर नजरा' अशा काहीतरी नावाचे पूर्वी वगनाट्य व्हायचे. त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे भुजबळांशी मिळतेजुळते वाटते. साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरू शकत नाही. आपण आहे तिथेच राहा. आज नोव्हेंबर २०१९ मध्ये हेच छगन भुजबळ बाळासाहेबांच्या आठवणीशिवायय एक दिवस जात नाही म्हणत अश्रू गाळतात, तेव्हा वाटते इतकी कमालीची अभिनय प्रतिभा यांच्यामध्ये येते कुठून? नाही म्हणजे तुरुंगात गेले की छातीत दुखते. आजारी म्हणून बाहेर आले की मात्र ताजेतवाने? असो. महाराष्ट्रात कुणा गद्दारांना शासन करायचे असेल तर आजही शाखेतला सैनिक अभिमानाने सांगतो,"तुझा 'छगन भुजबळ' करू. छगन भुजबळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाही बाळासाहेबांच्या अटकेचा विसर पडला असावा. मात्र, बाळासाहेबांना श्रद्धास्थान मानणारा महाराष्ट्र ते विसरलेला नाही. नाटकी नेत्यांना कोण सांगणार की, जनतेला मूर्ख समजण्याचे दिवस गेले.

@@AUTHORINFO_V1@@