अवकाळीची नुकसानभरपाई तातडीने देण्याचे राज्यपालांचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |



मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना मदत वितरीत करण्यास सुरुवात करण्याचे आदेश शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जारी केले. खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टर आठ हजार रुपये आणि बागायतीसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई राज्यपालांनी घोषित केली आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयांचे परीक्षा शुल्कही माफ करण्याचे आदेश त्यांनी शनिवारी दिले. या मदतीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना केंद्रीय आपत निधीची मदत आणि ज्यांनी पीकविमा काढला आहे, त्यांना विम्याची मदत मिळणार आहे. या मदतीचे वितरण तातडीने व्हावे, असे आदेश राज्यपालांनी राज्य प्रशासनाला दिले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने अखेरच्या दिवसात अवकाळी पावसाच्या फटका बसलेल्या शेतकऱ्यांना ही मदत जाहीर केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात राज्य विधानसभेची मुदत संपली आणि नवीन सरकार अजून बनू शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाली. या प्रशासकीय स्थित्यंतरामुळे शेतकऱ्यांची मदत लालफितीत अडकली होती. शुक्रवारी भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने ही जाहीर केलेली मदत वितरीत करण्याची विनंती केली होती. अभाविपने राज्यपालांना अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची विनंती केली होती.

 

काँग्रेस महाआघाडी शनिवारी राज्यपालांची शेतकरी मदतीसंदर्भात भेट घेणार होती. मात्र, तत्पूर्वीच राज्यपालांनी मदत वितरण सुरू करण्याचे आदेश काढल्याने महाआघाडीने राज्यपालांची भेट घेणे टाळले. ठरलेल्या वेळेआधी केवळ पाऊण तास आधी ही भेट आघाडीकडून रद्द करण्यात आली. मात्र, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे नेते मुंबईबाहेर असल्याने पुढील आठवड्यात पुन्हा राज्यपालांची वेळ गफहेण्यात येईल, असे पत्रकारांना कळवले. या तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगाकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात आहेत, असे कारण एकनाथ शिंदेंनी दिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@