आठवणीतले बाळासाहेब...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |




'बाळासाहेब' एक नाव नव्हते, तर एक वलय होते, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून काढला. गेली पाच दशके तमाम हिंदू आणि मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारे हिंदुस्थानमधील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब! ज्यांच्याएवढी कीर्ती क्वचितच कोणत्या एखाद्या नेत्याला लाभते. आज बाळासाहेबांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...


सत्ताधारी असो वा विरोधक, नेहमीच बाळासाहेबांना बिचकून असायचे. त्यांच्या एका शब्दापुढे मोठे मोठे नेते नांगी टाकायचे. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब एक व्यंगचित्रकार म्हणून उदयाला आले. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी न देणाऱ्या 'फ्री प्रेस' वृत्तपत्राला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी १३ ऑगस्ट, १९६० मध्ये 'मार्मिक' या साप्ताहिकाची स्थापना केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक नव्या संघर्षाची नांदी झाली. किंबहुना, एका भगव्या सूर्याचा उदय झाला. 'मार्मिक'मधून प्रसिद्ध होणारी व्यंगचित्रे ही प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचारावर आधारित असल्याने अल्पावधीतच बाळासाहेब प्रकाशझोतात आले. येथून पुढे थंड पडलेल्या, ग्लानी आलेल्या लाखो मराठी बांधवांना चेतवून त्यांचा एका मोठा लढा उभारण्याचे शिवधनुष्य बाळासाहेबांनी पाच दशके लिलया पेलले. अर्थात, यामागे त्यांची महाराष्ट्राप्रति असलेली नितांत श्रद्धा आणि तगमग हीच खरी शक्तिस्थानं होतीच.

 

दाक्षिणात्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत होती. याची चीड तर सगळ्याच मराठी बांधवांना येत होती. पण, या विरुद्ध आवाज उठवणार कोण? आणि अशा वेळी बाळासाहेबांनी 'मार्मिक'मधून मराठी माणसाला 'आवाज' दिला आणि शेकडो तरुण पेटून उठले. याच पेटून उठलेल्या तरुणांना बाळासाहेबांनी नेतृत्व दिले आणि १९ जून, १९६६ 'शिवतीर्था'वर 'शिवसेने'चा जन्म झाला. 'संयुक्त महाराष्ट्रा'चा लढा असो किंवा 'उठाव लुंगी बजावो पुंगी'सारख्या आंदोलनांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला, तो अजूनपर्यंत शांत झालाच नाही, हेच बाळासाहेबांचे मोठे यश आहे. २३ जानेवारी, १९८९ रोजी 'सामना' या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार अनेक शिवसैनिकांपर्यंत नुसते पोहोचवलेच नाही, तर रुजवलेदेखील. आपल्या अमोघ आणि प्रतिभाशाली वक्तृत्वाने त्यांनी लाखो-लाखो जनसमुदायाच्या सभा अगदी सहज जिंकल्या. सभेला आलेल्या तरुणांना नेमके काय हवे, याची नस ओळखून बाळासाहेब अतिशय मार्मिक आणि शेलक्या शब्दांमध्ये देशातल्या भल्या भल्या नेत्यांचा आपल्या 'ठाकरी' शैलीत खरपूस समचार घेत. त्यांची ही वृत्ती जनमानसात प्रचंड लोकप्रिय झाली. पुढे त्यांच्या भाषणाचा कैफ असाच वाढत गेला आणि दिवसेंदिवस महाराष्ट्राचे बाळासाहेबांवरचे प्रेम वृद्धिंगत होत गेले, यात शंका नाही.

 

गेली पाच दशके बाळासाहेब 'शिवसेनाप्रमुख' म्हणून आजही अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत. बाबरी ढाँचा पाडणाऱ्या शिवसैनिकांची जाहीर पाठ थोपटणारे बाळासाहेब अल्पावधीत अवघ्या देशातल्या हिंदूंच्या गळ्यातले ताईत बनले. त्यामुळे त्यांना 'हिंदुहृदयसम्राट' ही उपाधी बहाल झाली. मराठीबरोबरच हिंदुत्वाला प्राधान्य देणाऱ्या बाळासाहेबांनी 'पोटात एक आणि ओठात एक' अशी भूमिका आयुष्यात कधीच घेतल्याचे आठवत नाही. पाकिस्तानला मुंबईत खेळण्यास घातलेली बंदी असो किंवा पाकधार्जिण्या पाकड्यांवर केलेले थेट भाष्य असो किंवा बांगलादेशी घुसखोरांवर घेतलेली भूमिका असो, यामुळे जागतिक पातळीवरदेखील बाळासाहेबांचे नाव आदराने घेतले जाई. जातपात विरहित राजकारण, त्यातही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही सूत्रे देऊन लाखो शिवसैनिक घडवणारा हा नेता काही निराळाच!! बाळासाहेब एक झुंजार नेते, वक्ते तर होतेच. त्यांच्या जीवनप्रवासात त्यांनी अनेक मित्र, कार्यकर्ते, शिवसैनिक जोडले. दिवसेंदिवस शिवसेनेचे तेज वाढत गेले. याच तेजातून अनेक दिग्गज नेते जन्माला आले. किंबहुना साहेबांनी ते घडवले! यातले काहीनिष्ठावंत राहिले, तर काही फितुर झाले. पण, बाळासाहेबांनी त्याची पर्वा कधी केली नाही. ते एका व्रतस्थ योध्याप्रमाणे फक्त प्रामाणिकपणे लढा देत राहिले. अखेर १९९५ मध्ये तो दिवस उजाडला. शिवसेनेचा भगवा ध्वज अखेर विधानसभेवर फडकला आणि बाळासाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य झाले. नंतर शिवसेनेच्या हातातून सत्ता निसटली. एका धीरोदात्त योध्याप्रमाणे नाना अडचणींवर मात करीत बाळासाहेब आपला ठाकरी बाणा जोपासत लढत राहिले, कधी आप्तस्वकियांशी तर कधी विरोधकांशी...

 

बाळासाहेब एक रसायन होते. एकदा ते बोलायला लागले की, आपोआप रक्त गरम होई आणि माणूस पेटून उठे. वय वाढत होते, शरीर हालचालींवर बंधने येत होती. पण, तरीही बाळासाहेबांच्या विचारांचे चक्र सुरुच होते. कशाचीही पर्वा न करता, बाळासाहेबांना नेहमीच मैदानात उतरून विरोधकांच्या चारी मुंड्या चित करण्याचे वेगळेच तंत्र अवगत होते. तमाम हिंदुस्तानाचे दुर्दैव की, सलग चार दिवस मृत्यूला झुंजत ठेवणारे बाळासाहेब काळाच्या स्वाधीन झाले. आपल्या ८६ वर्षांच्या कारकिर्दीत एक राजनेता, मुत्सद्दी सेनापती, द्रष्ट्रा नेता, धुरंधर वक्ता, कुशल व्यंगचित्रकार, निर्भीड पत्रकार अशा अनेक पदव्या ज्याच्या पायाशी लोळण घालत होत्या, कोट्यवधी शिवसैनिकांच्या हृदयात ते मानाने विराजमान झाले होते. याची प्रचिती अवघ्या जगाला त्यांच्या अंतयात्रेवेळी आलीच असेल. ३० लाखांच्या जमावाने साश्रुनयनांनी आणि त्यांना निरोप दिला. 'न भूतो न भविष्यति।' असा नेता होणे शक्य नाही. अवघ्या महाराष्ट्राला बाळासाहेबांची पोकळी पुढची काही दशके नक्कीच जाणवेल. जनमानसावर आपल्या कर्तृत्वाचा वेगळाच ठसा उमटवणाऱ्या एकमेव बाळासाहेब ठाकरे या तेजोवलयाला माझा त्रिवार मुजरा....!!

 

- प्रशांत गडगे

@@AUTHORINFO_V1@@