लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |



'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्रित करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली,' असे छापील वाक्य शाळाशाळांतून शिकवले जाते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जितावस्था आणण्यात या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वाटा लाखमोलाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव जवळ येऊ लागला की, लोकमान्य टिळकांनी नव्हे, तर भाऊसाहेब रंगारी यांनी हा उत्सव सुरू केला, असा दावा काही लोकांतर्फे केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक कोण, यावरून वाद माजवले जातात. अशाने ज्यांना टिळक हे गणेशोत्सवाचे जनक आहेत हे शिकवलेले असते, त्या सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. कोण बरे हे भाऊसाहेब रंगारी? असा प्रश्न उभा राहतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कशी झाली? कुणी केली? याबद्दल लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावेत, या हेतूने काही दुर्लक्षित मुद्द्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न पुढील काही भागांतून करूया...


सोसायटीचा राजीनामा दिल्यानंतर टिळकांनी सार्वजनिक कामात विशेषत्वाने लक्ष देण्यास सुरुवात केली. सोसायटी सोडल्यानंतरच्या दोन-तीन वर्षांमध्ये हिंदूंना राग आणतील असे काही प्रश्न उभे राहिल्याने टिळकांनी त्याबद्दल आपली भूमिका मांडली आणि पुण्यातल्या पुढारी वर्गात आपले वेगळे असे अस्तित्व सिद्ध केले. पंडिता रमाबाईंच्या 'शारदासदन'चा वाद याच काळात गाजला. 'संमती वया'च्या प्रश्नावरील बिलाविरुद्ध टिळकांनी हिंदू समाजाचे नेतृत्व केले. धर्मव्यवहारात सरकारने कायदा करून लक्ष घालू नये, अशी लोकांची भूमिका टिळकांनी उत्तम रीतीने उचलून धरली आणि धर्मनिष्ठांची मने जिंकली. दरम्यानच्या काळात 'चहाग्रामण्य' प्रकरण घडून गेले. हे सगळे सामाजिक वाद आणि त्यावरील टिळकांच्या भूमिका याबद्दल 'टिळक आणि समाजसुधारणा' या प्रकरणात अधिक सखोल विश्लेषण करू, तूर्त या तीन-चार वर्षांच्या काळात पुण्यात आणि आसपास घडलेल्या बऱ्याच घटनांमध्ये टिळकांनी लक्ष घातले आणि हळूहळू टिळकांचे नेतृत्व प्रस्थापित होऊ लागले, हे लक्षात घेणे महत्त्वाचे. १८९३च्या सुमारास खरा राजकीय प्रश्न उभा राहिला, तो हिंदू-मुसलमान दंग्यांच्या रूपाने. प्रभासपट्टणम येथून सुरू झालेल्या या दंग्याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटायला सुरुवात झाली होती. जुनागढच्या मुस्लीम संस्थानाने यावर प्रतिबंध घालण्याऐवजी याला प्रोत्साहन दिले. 'गोहत्या' किंवा 'मशिदीवरून वाद्य वाजवणे' अशी कारणे हिंदू-मुसलमान दंगलीकरिता कुठल्याही काळात पुरेशी ठरतात. याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. त्यामुळे इथेही कारण फारसे निराळे नव्हतेच. दरम्यान, मुंबईत काही सभा भरल्या, मुसलमानांनी धुडगूस घातला, वाद्यांच्या गजरावरून दंगली पेटल्या. मुसलमानांचा हा पूर्वनियोजित कट असल्याने त्यांची सरशी झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुंबईतील गिरणी कामगार रस्त्यावर उतरल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. सरकारला जादा पोलीस पाचारण करावे लागले.

 

खरंतर या सगळ्या प्रकरणात सरकारने हिंदू किंवा मुसलमान यापैकी कुणाही एकाची बाजू न घेता तटस्थपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे होते. इतर पुढाऱ्यांच्यावतीने नेहमीप्रमाणे हिंदूंना शांत करण्याचे प्रयत्न त्याही काळात केले जात होतेच. मात्र, सरकार संपूर्णपणे मुसलमानांची बाजू सावरण्याच्या प्रयत्नात दिसत होते, अशा वेळी सगळ्याच प्रमुख वर्तमानपत्रांनी हिंदूंची बाजू उचलून धरली. कारण, चूक मुसलमानांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या ब्रिटिश सरकारची होती. दंगल मुसलमानांनी सुरू केली असल्याने आत्मसंरक्षणार्थ हिंदूंना त्यात पडावे लागले. मात्र, तरीही इंग्रज सरकार मुसलमानांचीच बाजू उचलून धरणार असेल, तर हा वाद फक्त 'हिंदू-मुसलमान' असा दुहेरी नाही तर 'हिंदू-मुसलमान आणि ब्रिटिश सरकार' असा तिहेरी आहे, असे टिळकांचे म्हणणे होते. सरकार जर अशीच भूमिका घेणार असेल तर मग आपल्या संरक्षणासाठी आता आपल्यालाच पुढे व्हावे लागेल, अशी टिळकांची भूमिका होती. वेळ आलीच तर जाहीर सभा घेऊनही लोकांना धडे देण्याची, शहाणे करण्याची त्यांची तयारी होती. पुण्यात अशी सभा भरावी ही इच्छा रावबहाद्दूर रानडे आणि आणखी काही मंडळींची होती, अशी शक्यता दिसते. मात्र, एकूणच याचे परिणाम काय होतील, ब्रिटिश सरकारला खपेल का? रुचेल का? असे प्रश्न त्यांना पडले असावेत. त्यातच 'टाईम्स'सारख्या वर्तमानपत्राने याबद्दल नापसंती दर्शवल्याने आणखीनच एक पाऊल मागे पडले होते. या लोकशक्तीला एकत्र आणण्यासाठी या वातावरणाचा नेमका उपयोग करण्याचे टिळकांनी ठरवले आणि सर्वशक्तीनिशी ते मैदानात उतरले. पुण्यातल्या अनेकांच्या विरोधाला न जुमानता १० सप्टेंबर, १८९३ रोजी शनिवारवाड्याच्या पटांगणावर टिळकांनी सभा भरवली. सार्वजनिक सभेला बरोबर घेऊनच ही सभा भरवायची, असे त्यांनी ठरवले आणि रावबहाद्दूर रानड्यांवर टीकेची झोड उठवली. टिळक खऱ्या अर्थाने मैदानात उतरले. पुण्यात झालेली ही सभा युगप्रवर्तक ठरली. या सभेबद्दल सदानंद मोरे यांनी केलेली नोंद फार महत्त्वाची आहे. ते लिहितात, "...सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला की तो दिवस पुण्यातील रानडे युगाची समाप्ती होऊन टिळकांच्या नेतृत्वाची नांदी करणारा ठरला. 'रानडे बोले आणि पुणे हाले' अशी पुण्याची परिस्थिती आता राहिली नसल्याचे लोकांना कळून चुकले." (कर्मयोगी लोकमान्य-१६६)

 

हिंदू-मुसलमान दंग्यांच्या काळात टिळक वर्तमानपत्रातून आपली भूमिका सातत्याने मांडत होते. टिळकांची काही वाक्ये यासंदर्भात 'ठोशास ठोसा द्यावा' हेच सांगणारी आहेत. टिळक लिहितात, "आम्ही जो जो जास्त गरिबी दाखवतो तो तो शिष्टाचार मोडल्याचा पुन्हा आमच्यावर मुसलमान लोक व सरकार आरोप करतात हे लक्षात ठेवले पाहिजे. श्रीकृष्णांनी असाच उपदेश केला आहे. 'ये यथा मां प्रपद्यन्ते तान्स्तथैव भजाम्यहम् ।" न. र. फाटक यांनी यासंदर्भात केलेली नोंद महत्त्वाची आहे. ते लिहितात, "....या दंग्यासंदर्भात टिळकांनी जे धैर्य दाखवले ते चिरस्थायी महत्त्वाचे आहे. टिळकांच्या लेखसंग्रहाचा पहिला राजकीय खंड पाहिल्यास त्यात या विषयाचे लेख आढळतील व टिळकांची दृष्टी कशी कडकडीत स्वाभिमानाची व नि:पक्ष पाताची होती याचा जिज्ञासूंना साक्षात्कार घडेल." (लोकमान्य - न. र. फाटक-८५) तर हिंदू-मुसलमान दंगे आता महाराष्ट्रभर पसरले होते. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी ते आवरणे पोलिसांनाही मुश्कील झाले. हिंदू सणांच्या दिवशी दंग्यांना उत येऊ लागला. श्रावणात मशिदीसमोरून वाजत गाजत मिरवणूक नेण्यास पोलिसांनी अडवणूक केली. सगळा प्रकार इतका टोकाला गेला की, पंढरपूरला निघालेल्या ज्ञानोबांच्या पालखीवर दर्ग्यातून जोडा फेकला गेला. आता मात्र शांत बसणे मूर्खपणाचे ठरले असते. इतकी वर्ष धार्मिक सलोखा टिकून राहावा म्हणून हिंदू लोक मोहरमच्या उत्सवात, मिरवणुकीत भाग घेत असत. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे हिंदूंनी मोहरमच्या उत्सवात भाग घेण्यास स्पष्ट नकार दिला. मोहरमबद्दल हिंदूंच्या मनातील आस्था कमी झाली. ही पोकळी भरून काढण्याचे आणि स्वतःचा अनोखा एकोपा दाखवण्याचे नवे साधन दरम्यानच्या काळात लोकांसमोर आले होते, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने!

 

हिंदू धर्माची मूलभूत शक्ती इतके वर्ष परधर्माच्या उत्सवात व्यय होत होती. त्या शक्तीचा ओघ स्वधर्माकडे वळवणे गरजेचे आहे, हे टिळकांनी ओळखले आणि गणेशोत्सवाची योजना केली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेची बीजे या हिंदू-मुसलमान दंग्यांच्या काळात टिळकांच्या मनात पेरली गेली आणि गणेशोत्सवाची खरी गरज टिळकांना यामुळेच वाटू लागली, असे काही अभ्यासकांचे मत आहे. १८९३ साली या उत्सवाची सुरुवात झाली असे मानतात, तसा एक उल्लेख 'केसरी'च्या अंकातही आढळतो. २६ सप्टेंबर, १८९३ चा 'केसरी' म्हणतो, "यंदा येथे गणपति पोचविण्याचा समारंभ सालाबादपेक्षा निराळ्या रीतीने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे. गणपति सर्व प्रकारचे हिंदू पुजतात. तेव्हा गणपति पोचविण्याचा समारंभ झाल्यास त्यापासून लोकसमाजात एकदिलाने कामे करण्याची जी प्रवृत्ति तीसहि थोडीबहुत मदत होईल." 'केसरी'तील हा मजकूर ओघाने गणेशोत्सवाच्या आरंभाबद्दल बोलून जातो. ही झाली एक बाजू, लोकांना यातील बरेच ज्ञात असण्याची शक्यताही आहे. इतिहास पहिला तर लक्षात येते की, टिळकांनी स्वतः मात्र १८९४ साली गणपती विंचूरकरांच्या वाड्यात सार्वजनिक गणपती बसवला. मग १८९३ साली पुण्यात सुरू झालेला गणेशोत्सव कोणता होता? या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा कोपऱ्यातून आजकाल चर्चा ऐकू येतात की, १८९३च्या पूर्वी एक वर्ष भाऊसाहेब रंगारी यांनी हा गणेशोत्सव सुरू केला, तेव्हा मात्र अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. यामागील नेमके तथ्य काय असा प्रश्न पडू लागतो. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी 'भाऊसाहेब रंगारी' आणि त्या अनुषंगाने या प्रकरणात टिळकांचा प्रवेश होण्याआधीचा गणेशोत्सव नेमका कसा होता हेही जाणून घ्यायलाच हवे!(क्रमशः)

 

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@