विचारवंताचा सत्कार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |



भारतीय इतिहास, संस्कृतीची परंपरा, जागतिकीकरणाच्या संदर्भात भारताचे स्थान आणि पुढील काही वर्षांतील आव्हाने, यावर आपल्या पाच ग्रंथांमधून प्रकाश टाकणाऱ्या आणि त्याआधारे जगात सतत चळवळ सुरू ठेवणाऱ्या डॉ. राजीव मल्होत्रा यांना दि. १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात 'भीष्म पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या ग्रंथसंपदेचा आणि विशेषत्वाने गाजलेल्या 'ब्रेकिंग इंडिया' पुस्तकातील विचारांचे हे चिंतन...


'भीष्म पुरस्कार' आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिती आणि 'भास्कराचार्य प्रतिष्ठान'चे प्रमुख डॉ. श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला. पाच लाख रुपयांच्या पुरस्काराची ही योजना स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 'श्री ज्ञानेश्वर गुरुकुला'द्वारे प्रत्यक्षात आली आहे. यात यावर्षीचा पुरस्कार मिळालेले डॉ. मल्होत्रा हे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात भारतीय अभ्यास केंद्राचे संचालक आहेत आणि दिल्लीतील 'जेएनयु'मध्ये अभ्यागत प्राध्यापक आहेत. भारतातील आणि भारताबाहेरील अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक असलेल्या डॉ. मल्होत्रा यांनी त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी 'इन्फिनिटी फाऊंडेशन' या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची आणि संपादित केलेल्या विषयांच्या ज्ञानकोशांची संख्या मोठी आहे. त्यांचे 'ब्रेकिंग इंडिया' हे पुस्तक २०१२ साली माझ्या वाचनात आले. जबरदस्त पल्ला असलेल्या या पुस्तकातील मी फक्त दोन मुद्दे निवडले व त्यावर 'पांञजन्य' या राष्ट्रीय साप्ताहिकात दोन वर्षे क्रमाने १०० लेख लिहिले. ६०० पानी पुस्तक असणाऱ्या त्या ग्रंथाचे अगदी सारांशाचे वाचन करता यावे, यासाठी त्यावर ५० पानी पुस्तिका लिहिली. त्यातील हिंदीच्या तर काही आवृत्त्या निघत आहेतच, पण अन्य भाषांमध्येही आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. त्या मूळ पुस्तकाच्या प्रा. मल्होत्रा यांच्या संस्थेनेच अनेक भाषांमध्ये आवृत्त्या प्रकाशित केल्या. ६०० पानाचे हे पुस्तक भारताच्या गेल्या पाच शतकांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे आहेच; पण पुढील पाच शतकात घडण्याची शक्यता असणाऱ्या घटनांवरही प्रभाव टाकणारे आहे. ग्रंथलेखनासाठी आवश्यक असणारा त्यांचा आवाकाही प्रचंड. कामाचा मोठा व्याप उभा करून ते विषय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची क्षमताही मोठी आहे. त्यांचे 'बिईंग डिफरंट' हे पुस्तक भारतीयांचे मानस गेल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीत कसे घडले आहे, यावर प्रकाश टाकते. अन्य धर्माचे लोक आपल्या विचारासाठी टोकाचे आग्रही असतात व त्याच्या प्रसारासाठी महायुद्धे करून लाखालाखांचे नरसंहार करायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या धर्मविषयक चिंतनाकडेही आपण साम्यतेतून बघतो, हा त्यांचा विषय जगात स्वीकारला गेला. 'इंद्राज नेट' हा सांस्कृतिक पातळीवरील ग्रंथ आहे.

 

'बॅटल फॉर संस्कृत' या पुस्तकात संस्कृतचे जागतिक भाषांच्या संदर्भातील सामर्थ्य आणि वैशिष्ट्य यावर विचार केला आहे. संस्कृत ही भाषा जुनी आहे म्हणून जुनाट आहे, असा जगातीलच काय, पण भारतातील अनेक विचारवंतांनी करुन घेतलेला गैरसमज. पण, जागतिक पातळीवर सर्व भाषांना सामावून घेणारी आणि जगातील महत्त्वाच्या साऱ्या आव्हानांना पुरी पडू शकणारी अशी संस्कृत भाषा असल्याचे त्यांनी त्यात स्पष्ट केले आहे. 'अ‍ॅकॅडेमिक हिंदूफोबिया' या ग्रंथाचे नावच त्याच्या पल्ल्याची व्याप्ती स्पष्ट करते. या ग्रंथसंभारातील फक्त एकाच पुस्तकातील केवळ दोन मुद्दे मी माझ्या लेखनासाठी निवडले. साऱ्या पुस्तकात तेच मला आवडले किंवा तेच मला लिहिता येतील असे वाटले, असे कारण मुळीच नाही. त्या दोन मुद्द्यांचा पुढील पाच शतकांवर परिणाम होणार आहे, असे माझे आणि अनेक जाणकारांचे मत असल्यामुळे मी त्यांची निवड केली. त्यातील पहिला मुद्दा असा की, 'आर्य बाहेरून आले' या विषयावर त्यांनी तीनशे वर्षांपूर्वीच्या युरोपीय स्थितीतून प्रकाश टाकला आहे. आर्य युरोपातून किंवा मध्य आशियातून आले, असा सिद्धांत प्रामुख्याने इ. सन १८५० पासून मांडला जाऊ लागला. त्यापूर्वी युरोपात आणि प्रामुख्याने जर्मनीत असाच इतिहास मांडला जायचा की, भारतातून आर्य विचारवंतांचे गट गेली तीन-चार हजार वर्षे युरोपात येत आहेत. ते प्रथम जर्मनीत आले आणि नंतर काही शतकांनंतर रोमला पोहोचले. तेथे संस्कृती म्हणून जे काही होते, ते आर्यांनी भारतातून आणले. पण, एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला युरोपची अशी स्थिती होती की, तीन चतुर्थांश जगावर युरोपीय देशांची पकड भक्कम बसली होती.

 

निम्म्या जगावर त्यांचे राजकीय नियंत्रण प्रस्थापित होऊन बरेचसे देश पारतंत्र्याच्या छायेत गेले. प्रत्येक देशातून शेकडोंच्या संख्येने १०० टन्स ते ५०० टन्स जहाजे रोजच्या रोज लूट घेऊन येत होती. त्या त्या बोटीतील लूट उतरवायलाही आठ-आठ दिवस तेथे 'बंदरावरील धक्के' म्हणजे जेट्टी मिळत नसे. ही लूट मिळण्याचा अधिकार आपल्याकडे अबाधित राहावा म्हणून 'आम्हीच जगाचे मालक' असे दाखवण्यासाठी काही सिद्धांत पुढे आणले. त्यात त्यांना बायबलमधील 'नोहा स्टोरी' मिळाली. बायबलमधील त्या कथेच्या आधारे बायबलचा संदेश घेऊन युरोपीय लोक जगभर गेले. जगातील प्रत्येक देशाची संस्कृती, भाषा ही बायबलमधील 'टॉवर ऑफ बेबल'पासून सुरू होते. त्या 'महास्टोरी'चा भाग म्हणून जगातील प्रत्येक देशात त्यांनी अशाच काल्पनिक टोळ्या पाठवल्या. त्याच कथेचा भाग म्हणून त्यांनी 'भारतात आर्य पाठवले.' ही समस्या फक्त भारताची मुळीच नव्हती. जगातील प्रत्येक देशाची होती. जगभर त्यांचीच सत्ता असल्याने त्या दीड ओळीच्या कथेवर जगातील पाच हजार विद्यापीठे हाच जगाचा इतिहास म्हणून संशोधन करू लागली. जगातील ८० टक्के देशांना तो प्रकार 'इतिहास' म्हणून स्वीकारावा लागला. तेच 'तर्कट' तेथील अभ्यासक्रमातही गेले आणि तेच 'तर्कट' शासकीय इतिहासाचा भाग झाला. त्याच्या आधारे त्यांनी 'आर्य-अनार्य' असे वाद निर्माण करून देश तोडण्याची कारस्थानेही रचली. पण, ही स्थिती फक्त भारताची मुळीच नव्हती, तर युरोपीय वर्चस्वाखाली आलेल्या प्रत्येक देशाची होती. अशाच वादाच्या परिसीमेतून जवळ जवळ प्रत्येक देशात त्यांनी दोन भाग तयार केले व त्यांच्यात युद्धे खेळवली. त्यातील अलीकडचे युद्ध म्हणजे आफ्रिकेतील रवांडा देशात १९९४ मध्ये एका जमातीने दुसऱ्या जमातीच्या दहा लाख लोकांना अवघ्या १०० दिवसांमध्ये संपवून टाकले. 'आर्य आले' हा इतिहास भारतात आल्यावर व त्याला शासकीय दर्जा मिळाल्यानंतर साऱ्या देशालाच हादरा बसला. त्यावर संशोधने सुरू झाली व उत्तरही दिली गेली. पण, ते उत्तर प्रामुख्याने बचावात्मक असल्याचे दिसू लागले. प्रा. मल्होत्रा यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, 'नोहा स्टोरी'च्या आधारे ही कल्पना युरोपात कशी विकसित झाली, ही बाब त्यांनी युरोपीय इतिहासाच्या आधारे मांडली. त्याचा परिणाम असा झाला की, भारताप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये तेथे युरोपीय वर्चस्व कधीच नव्हते, अशी भूमिका सांगणारा इतिहास बचावात्मक पद्धतीने मांडला जायचा. आता साऱ्यांनाच एक नवे बळ आले आहे. अर्थात, यावर अजून बरेच काम करावे लागणार आहे.

 

'आर्य आले' या भाकडकथेवर प्रकाश पाडणाऱ्या संशोधनाबरोबर अजून एक मुद्दा त्यांनी मांडला आहे. तो म्हणजे, भारतातील जिहादी माओवादी आणि चर्चवाले यांच्या दहशतवादी संघटना भारतात परस्परांच्या सहकार्याने येथे कारवाया करत आहेत. वास्तविक, जिहादी आणि चर्चवाले जगभर अनेक शतके एकमेकांविरोधात लढले आहेत. त्यांनी एकमेकांचे लाखांच्या पटीत संहारही केले आहेत. माओवाद्यांचा इतिहास त्यामानाने अलीकडचा आहे. तरीही हे तीनही घटक जगभर एकमेकांचे 'कट्टर शत्रू' या यादीत येतात. तरीही त्या त्या देशातील अशा दहशतवाद्यांना एकत्र करून त्यांचा समन्वय घडवून त्या देशाच्या एकजिनसीपणाला आव्हान देणाऱ्या घटना कशा संघटित केल्या जातात, याची अनेक देशातील उदाहरणे त्यांनी दिली आहेत. सोव्हिएत युनियनला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने ओसामा बिन लादेन उभा केला, हे झाले जगाला मान्य असलेले मोठे उदाहरण. युरोपीय देशांच्या नियंत्रणात २००-३०० वर्षे घालून ७०-७५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या कोणाही देशाला अजून स्वत:चा आत्मविश्वास आलेला नाही. कारण, प्रत्येक देशातील अतृप्त घटकांना एकत्र करून त्यांच्या संघटना बांधून त्यांना शस्त्रे आणि खर्चाची व्यवस्था करून तेथे दहशतवाद निर्माण केला जात आहे. भारतात तर या प्रत्येक दहशतवादी संघटनेने काही राजकीय पक्ष आणि काही संघटना म्हणजे कामगार संघटना, काही 'ह्युमन राईट्स' संघटना यांना हाताशी धरले आहे. या साऱ्यांना अमेरिकी पैसा मिळतो, याचे मार्गच डॉ. मल्होत्रा यांनी दाखवून दिले आहेत. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एक गोष्टीची प्रचिती येते की, भारतातील मुस्लीम राजकीय पक्ष, साम्यवादी राजकीय पक्ष, काँग्रेससारखा ७० वर्षे सत्तेवर असणारा पक्ष आणि काही प्रादेशिक पक्ष यांच्यात एक एकजिनसीपणा आहे. त्यांच्यातील परस्परातील समन्वयाची आपल्यालाही कल्पना येते. या कटकारस्थानाने प्रसारमाध्यमांनाहीनियंत्रणात ठेवले आहे. भारतातील त्या दहशतवाद्यांनी हा देश आपापल्यात वाटून घेतला आहे. या 'ब्रेकिंग इंडिया' स्वरुपाच्या कारस्थानावर प्रकाश टाकणे हा 'ब्रेकिंग इंडिया' पुस्तकाचा विषय आहे. अन्य विषयांच्या तुलनेत हे विषय देशाच्या राजकारण्यांच्या, समाजकारण्यांच्या आणि नागरिकांच्याही ऐरणीवरील विषय झाले पाहिजेत, अशा दृष्टिकोनातून मी ते निवडले आणि त्याला देशभर चांगला प्रतिसादही मिळाला. अर्थात, डॉ. राजीव मल्होत्रा हे या विषयाचे संशोधक आहेत आणि त्यासाठी ते सर्व सामर्थ्यांशी लढत आहेत. अशा विचारवंताचा पुण्यात 'भीष्म पुरस्कार' देऊन सत्कार झाला, ही अतिशय आनंदाची बाब म्हणावी लागेल.

 

- मोरेश्वर जोशी

@@AUTHORINFO_V1@@